Friday 12 October 2018

जिल्हा पुरवठा आढावा बैठक


लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे- गिरीश बापट

       नाशिक दि. 12- सामान्य जनतेच्या मुलभूत गरजापूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी एकत्रित काम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी केले.
          शासकीय विश्रामगृह येथे आयोजित जिल्हा पुरवठा विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार नरेंद्र दराडे, देवयानी फरांदे, सीमा हिरे, नरहरी झिरवाळ, आसिफ शेख, राहुल आहेर, माजी आमदार जयवंत जाधव, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव अभिमन्यु काळे, उपसचिव श्री.सुपे, पुरवठा उपायुक्त प्रविण पुरी, अपर पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी श्री निवास अर्जुन आदी उपस्थित होते.

          श्री.बापट म्हणाले, अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत सर्वसामान्य जनतेला गुणवत्तापूर्ण अन्नधान्याचा पुरवठा व्हावा यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येत आहे. राज्यात  भेसळमुक्त अन्नधान्याचे वितरण होण्याच्यादृष्टीनेदेखील प्रयत्न करण्यात येत आहेत. बंदी असलेल्या औषधांसंदर्भातदेखील योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे.
          सणासुदीच्या दिवसात सामान्य जनतेला गुणवत्तापूर्ण अन्न पदार्थांचा वापर करण्यात यावा यासाठी छोट्या विक्रेत्यांना तसेच कामगारांना वैयक्तिक व परिसर स्वच्छतेबाबत प्रशिक्षण देण्यात यावे, अशा सुचना त्यांनी दिल्या. पॉज यंत्रामुळे रेशनिंग दुकानात धान्य वितरणाबाबत चांगली सुधारणा दिसून आल्याबद्दल श्री.बापट यांनी समाधान व्यक्त केले.
          शासकीय योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती करण्यावर भर देण्यात यावा. अवैध मार्गाने विक्री होणाऱ्या गुटखा व मादक पदार्थांवर प्रतिबंध आणणसाठी अन्न व औषध प्रशासन, महसुल व पोलीस विभागाने समन्वीतरित्या प्रयत्न करावे, असे निर्देश श्री. बापट यांनी दिले.
          बैठकीदरम्यान मंत्री महोदयांनी  लोकप्रतिनिंधीकडून समस्या जाणून घेतल्या. तत्पूर्वी अन्न व नागरी पुरवठा विभागाची सुनावणी घेण्यात आली. यावेळी विभागातील पाचही जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच संबंधित विभागांचे प्रमुख अन्न व औषध प्रशासन अधिकारी  उपस्थित होते.
0000

No comments:

Post a Comment