Wednesday 10 October 2018

किर्तांगळीमध्ये बागायती शेती


जलयुक्तमुळे किर्तांगळीमध्ये बागायती शेतीला सुरूवात

       नाशिक दि.10-गावाने एकत्रितपणे निश्चय केल्यावर सकारात्मक बदल कसा वेगाने घडून येतो याचा प्रत्यय सिन्नर तालुक्यातील किर्तांगळी गावात गेल्यावर येतो. गावात जलयुक्त शिवार अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी झाल्याने शिवारातील बाजरी, सोयाबीनसारख्या पिकांची जागा आता टमाटा, द्राक्षे, कांदा पिकाने घेतली आहे.
अत्यंत कमी पर्जन्यमान असलेल्या या गावातील विहिरी पाण्यासाठी 60 ते 70 फूट खोल कराव्या लागतात. पाणी लागेलच याचीही निश्चिती नसे. गाव देवनदी आणि कासारी नाल्याच्या प्रवाहाच्या मधोमध आहे. मात्र नाल्यात पुर्णत: गाळ साचल्याने तो जमीन सपाटीला आला होता आणि पावसाअभावी नदीलाही पाणी पुरेसे नव्हते. त्यामुळे खरिपानंतर दुसरे पीक घेणेही शेतकऱ्यांना शक्य नव्हते.

 गावाची परिस्थितीत बदलण्यासाठी ग्रामस्थांनी  एकत्र येऊन  सरपंच दगू चव्हाणके यांच्या नेतृत्वाखाली गावाने जलयुक्त शिवार अभियनाच्या माध्यमातून विविध कामे केली. ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारयोजनेअंतर्गत  नाला खोलीकरणाचे काम सुरू केले. दोन महिने हे काम सुरू होते. जुने बंधारे गाळमुक्त करण्यात आले. जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागामार्फत 22 हजार घनमीटर आणि मृद जलसंधारण विभागामार्फत 61 हजार घनमीटर गाळ काढण्यात आला.
नाल्यातून निघालेला गाळ शेतकऱ्यांनी स्वखर्चाने वाहून नेला. शाखा अभियंता अविनाश लोखंडे सारख्या उत्साही अधिकाऱ्याचे प्रयत्न आणि उपविभागीय अधिकारी महेश पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे कामाला वेग आला. स्वत: सरपंचांनी आपला व्यवसाय बाजूला ठेऊन पुर्णवेळ कामासाठी दिला. आमदार राजाभाऊ वाजे यांनीदेखील वेळोवेळी कामाला भेट देऊन ग्रामस्थांचा उत्साह वाढविला.

नाल्याचे तीन ते चार मीटर खोलीकरण आणि 30 ते 35 मीटर रुंदीकरण करण्यात आले. एकूण साडेचार किलोमीटर क्षेत्रात हे काम करण्यात आले. नाल्यात असलेले अतिक्रण काढण्यात आले. बऱ्याचदा मध्यरात्रीपर्यंत काम चालले. सोबद बंधाऱ्याची दुरुस्ती आणि भूजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत रिचार्ज शाफ्टचे काम करण्यात आले.
गावात आतापर्यंत केवळ दीडशे मिमी पाऊस झाला आहे. मात्र नाला ओलांडून जाणाऱ्या कडवा कालव्याच्या जलसेतू (ॲक्वाडक) मधून बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे संपुर्ण साडेचार किलोमीटरच्या पात्रात मोठा पाणीसाठा झाला आहे. रिचार्ज शाफ्टमुळे जमिनीत पाणी मुरण्यास मदत झाली. त्यामुळे गावातील दोनशेपेक्षा जास्त विहिरींना फायदा झाला असून विहिरीमध्ये 15 ते 20 फुटावर पाणी आले आहे. गावात दीडशे टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे.

पाणी उपलब्ध झाल्याने पीक पद्धतीत आमुलाग्र बदल घडून आला आहे. टमाट्याचे क्षेत्र 100 एकरने तर द्राक्षाचे क्षेत्र 50 एकराने वाढले आहे. मिरची, ऊस, भुईमुग आदी पिकेदेखील शिवारात दिसू लागली आहेत. टमाट्याचे दोन हजार कॅरेट दररोज बाजारात जातात. ‘जलुयुक्तमुळे जिथे कोरडे गवत आणि झुडपे दिसायची तिथे आता जलसाठा दिसतोय. शिवाराचे बदललेले रुप पाहून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ग्रामस्थांना प्रतिक्षा आहे ती रब्बी हंगामाची.
युवा मित्र संस्थेच्या सहकार्याने लोकसहभागातून काम करण्यात आल्याने केवळ 7  लाख 30 हजार खर्च झाला. कंत्राटदारांकडून हे काम करण्यात आले असते तर 16 लाख आणि प्रचलित दराने केले असते तर 34 लाख खर्च झाला असता. सिमेंट बंधारे बांधून एवढेच पाणी अडविण्यासाठी 85 लाख खर्च झाला असता.


नाल्यातून काढण्यात आलेला गाळ गावातील शेतात टाकण्यात आल्याने शेतजमीन सुपिक होण्यास मदत झाली आहे. गाळ टाकल्याने नाल्याच्या किनाऱ्यावरील आणि शिवाराकडे जाणारे रस्ते तयार झाले आहेत. पावसाळ्यातही आता सहजपणे शिवारात जाता येते.

महेश पाटील, उपविभागीय अधिकारी-स्वयंसेवी संस्था, प्रशासन आणि गाव एकत्र आल्याने दुषकाळग्रस्त भागात पिण्याचे पाणी, शेती आणि चाऱ्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. यामुळे पूरक व्यवसायालाही चालना मिळेल.



No comments:

Post a Comment