Monday 15 October 2018

टंचाईसदृश परिस्थिती आढावा


पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य- गिरीष महाजन

       नाशिक दि. 15- देवळा आणि बागलाण तालुक्यातील बहुतेक भागात कमी पावसामुळे परिस्थिती गंभीर असून या भागातील जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभाक्षेत्र विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.
          बागलाण तहसिल कार्यालय येथे देवळा व बागलाण तालुक्यातील टंचाईसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला आमदार डॉ.राहुल आहेर, दिपीका चव्हाण, पंचायत समिती सभापती विमलताई सोनवणे, उपसभापती शितल खोर, उपविभागीय अधिकारी प्रविण महाजन, तहसिलदार प्रमोद हिले, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, केदा आहेर आदी उपस्थित होते.

          श्री.महाजन म्हणाले,भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी केळझर डावा कालव्यासाठी 4 कोटी 80 लाखाची आणि केळझर चारी क्र.8 ला 4 कोटी 95 लाखाची सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.  ही चारी भाक्षी-मूळाणेपर्यंत मंजूर असून चौगाव, कऱ्हे, अजमीर सौंदाणे, वायगाव असा कालवा वाढविण्यात येणार आहे.

          मापदंडात बसत नाही म्हणून पूर्वी नामंजूर करण्यात आलेला हरणबारी उजवा कालवा मापदंडात बसविण्यात आला असून पारनेरपासून वायगाव-सातमानेपर्यंत वाढविण्यात येणार आहे. या कालव्यामुळे 21 दुष्काळी गावांना लाभ होणार आहे. हरणबारी डाव्या कालव्याचे लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तळवाडे-भामेर एक्स्प्रेस कालव्याचे काम अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

          ते म्हणाले, या भागातील मका, कांदा, भुईमूग पिकाचे बऱ्याचअंशी नुकसान झाले आहे. तर उडीद आणि मुगाचेही काही प्रमाणात नुकसान दिसून येत आहे. पेरणीनंतर पाऊस न आल्याने नुकसानाची तीव्रता अधिक आहे. शासनाने नव्याने पाहणी करण्याच्या सुचना दिल्या असून सर्वेक्षणानंतर शेतकऱ्यांना आवश्यक सहकार्य करण्यात येईल. दुष्काळ सदृश परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री महोदयांनी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाला भेट देऊन आढावा घेण्याच्या सुचना केल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

          तत्पूर्वी श्री.महाजन यांनी दोन्ही तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या चेहळी, मेशी, कुंभार्डे, हरीपाडा,अजमीर सौंदाणे, देवळाणे गावांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि पिकांची पाहणी केली. त्यांनी या भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. पिण्याचे पाणी आणि जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
----
         


No comments:

Post a Comment