Thursday 30 June 2016

माझे वृक्ष....माझे जीवन
ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढलाय.....प्रदूषण वाढलंय.....काही तरी करायला हवे.....गावात फिरायला हिरवळही नाही.....कुठेतरी कोकण, महाबळेश्वर किंवा कधी सिमला तर कधी जम्मू-काश्मिरची ट्रीप ॲरेंज केल्याशिवाय निसर्ग सौंदर्याचे दर्शन शक्यच नाही.....उन्हात तर जीव लाहीलाही होतो.....आणि पावसाचं तर विचारू नका, सगळं वेळापत्रकच बदललंय...... मुलांना पक्षी-प्राणी दाखवयाचे तर चित्रातच.....

.....या सगळ्या प्रतिक्रीया सामान्य आहेत, नेहमी ऐकू येणाऱ्या. त्याला जोड दिली जाते ती निरस आणि कोरड्या अशा शास्त्रीय चर्चेची.....वनाची टक्केवारी, प्रदूषण, जलचक्र, जमिनीची धूप, मृदसंधारण आणि फारच पुढे गेले तर कार्बन क्रेडीटपर्यंत ही चर्चा जाते. बरेच उपाय सुचविले जातात. शेवटी राहते ते प्रश्नचिन्ह!.....परिणाम काय? यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आली आहे. आपल्याला पर्यावरणाविषयी वाटणारी काळजी कृतीतून व्यक्त करण्याची हीच वेळ आहे. नाहीतर पुढच्या पिढीला आपण काही देत आहोत, असे म्हणण्याचा अधिकार आपल्याला राहणार नाही. म्हणूनच शासनातर्फे 1 जुलै रोजी वन महोत्सवाचे आयोजन आहे आणि दोन कोटी वृक्षांची लागवडही....

वातावरण बदलाच्या दुष्परिणामांना सामोरे जाताना प्रकृतीचे ढासळणारे संतुलन सावरण्याची गरज निर्माण झाली आहे. वृक्षारोपण आणि त्यापेक्षाही वृक्ष संवर्धनाला लोकचळवळीचे स्वरुप येणे आवश्यक आहे. वन महोत्सवातील लोकसहभाग यादृष्टीनेदेखील महत्वाचा आहे. केवळ एक कार्यक्रम म्हणून याकडे न पाहता एक  जागृती संदेश, एक प्रेरणा आणि एक निर्धार म्हणून पाहिल्यास त्याचा गुणात्मक लाभ अधिक होईल. दिवसातून आपण किती सेल्फी काढतो? एक सेल्फी लावलेल्या रोपट्याबरोबर आणि पुढील प्रत्येक वर्षी वाढलेल्या त्याच रोपट्याबरोबर काढून बघू या. जीवनातील आगळ्यावेगळ्या आनंदाचे साक्षीदार आपल्याला होता येईल.

सण, महोत्सव, वाढदिवस अशा विविध दिवसांना वृक्ष संवर्धनाशी जोडून नवी परंपरा सुरू करता येईल. एखाद्या झाडाला मित्र करू या, त्याच्यासाठीही कविता लिहून त्याच्या वाढदिवसाला त्याच्याशेजारी बसून वाचू या, आपल्या कुटुंबाचा-मित्रपरिवाराचा एक घटक बनवू या आणि ते वाढल्यावर नवनिर्मितीतला आनंद घेऊ या!........छे:, अशक्य मुळीच नाही. तुम्ही आम्ही निश्चय केल्यावर काय कठीण? शासनाने तर दमदार पाऊल टाकलेच आहे. साथ आपली हवी आहे....

.......झाड शेतजमीनीची सुपीकता वाढवते, खत देते, जमिनीची धूप थांबविते, प्राणवायू देते, पावसाचे पाणी जमिनीत मुरविते, बाष्पीभवन रोखते, चक्रीवादळाची तीव्रता कमी करते, पशु-पक्ष्यांसाठी भोजन, चारा, आश्रय सर्व त्याच्यामुळेच. त्याच्यामुळे परिसराचे सौंदर्य आहे, शितलता आहे, सभोवती पक्ष्यांचा चिवचिवाट आहे, रसाळ फळे आहे, झोपायला खाट आहे, रहायला घर आहे.....आपलं सर्व जीवन त्याने व्यापले आहे.....आपण त्याच्यासाठी काय करतो? त्याचे जीवन धोक्यात आणून आपण स्वत:चे जीवन आपण संपवणार काविचार प्रत्येकाने करायचा आहे. केवळ स्वत:वर प्रेम करतो म्हणून केवळ भितीपोटी नव्हे तर जाणिवेतून एकत्र येऊ या, सर्व मिळून झाडे लावू या, झाडे जगवू या! कारण माझे वृक्ष.....माझे जीवन!