Friday 30 September 2016

लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान

लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान सजावट स्पर्धा
विभागस्तरावर भडगाव येथील जागृती मित्र मंडळ प्रथम
नाशिक, दि.30-लोकमान्य टिळक गणेशोत्सव अभियान 2016 अंतर्गत विभागस्तरावरील निकाल जाहीर करण्यात आले असून प्रथम क्रमांकासाठी जळगाव जिल्ह्यातील भडगावच्या जागृती मित्र मंडळाची  निवड करण्यात आली आहे.
गणेशोत्सव काळात शासनातर्फे तालुकास्तर, जिल्हास्तर आणि विभागस्तरावर शासनाच्या लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध मंडळांनी यानिमित्ताने आयोजित सजावट स्पर्धेत सहभाग घेतला होता. नाशिक, धुळे, जळगांव, नंदूरबार आणि अहमदनगर जिल्ह्यातून प्राप्त  प्रथम तीन प्रस्तावातून  शिक्षण उपसंचालक नाशिकचे अध्यक्ष रामचंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने विभागस्तरावरील प्रथम तीन मंडळांची निवड केली आहे. नाशिकच्या राजीव नगर येथील युनिक गुपची द्वितीय तर कासारे जि.धुळेच्या हरिभक्त लेनिन मंडळाची तृतीय क्रमांकासाठी निवड करण्यात आली आहे.
निवड समितीत स.संचालक दिलीप गोविंद, शास्त्र सल्लागार एम.एन.पाटील, मुख्याध्यापक राजेंद्र निकम, प्राचार्य अनिल अभंगे, एन.एस.एस.विभागीय समन्वयक अशोक सोनवणे, प्रा.दत्तात्रय मुळे, प्रा.संजय साबळे आदींचा समावेश होता. समितीने प्रथम तीन मंडळांची गुणानुक्रमे निवड केली आहे.

---

‘जलयुक्त शिवार लय भारी’

‘जलयुक्त शिवार लय भारी’
शिवारात पाणी आल्याने पांजरवाडीच्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

नाशिक,दि. 30: येवला तालुक्यातील पांजरवाडी गावात जलयुक्त शिवार योजने अंतर्गत कोळगंगा नदीच्या अकराशे मीटर लांब पात्रातील गाळ काढण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. टँकरवर अवलंबून राहणाऱ्या या भागात दुसऱ्या पिकांची तयारी सुरू असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

 कोळगंगा नदीवरील चार बंधारे गाळाने भरल्याने नदीपात्र उथळ झाले होते. पावसाळ्यात पूराचे पाणी शेतात शिरून नुकसान होत असे. तर दुसरीकडे पावसाळ्यानंतर पाणीसाठा न झाल्याने विहिरी कोरड्या पडून शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नव्हते. खरीप हंगामानंतर इथले शेतकरी उन्हाळी कांदा घेण्यासाठी येसगाव किंवा कोपरगावला स्थलांतरीत होत असत.

उपविभागीय अधिकारी वासंती माळी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थानी जलयुक्त शिवार योजना राबविण्याचे निश्चित केले. आर्ट ऑफ लिव्हींगतर्फे पोकलँड यंत्र उपलब्ध करून देण्यात आले. डिझेलसाठी 2 लाख 85 हजार खर्च योजने अंतर्गत करण्यात आला. डिझेलची रक्कम येण्यापूर्वी काम थांबू नये यासाठी लघुपाटबंधारे विभागाचे उप अभियंता हरिश्चंद्र पवार यांनी स्वत: जबाबदारी घेऊन डिझेल उपलब्ध करून दिले.

शाखा अभियंता प्रशांत जगताप यांनी ग्रामस्थांना तांत्रिक मार्गदर्शन केले. गाळ काढण्याच्या कामात उत्स्फुर्त लोकसहभाग लाभला. शेतकऱ्यांनी  35 ट्रॅक्टरच्या सहाय्याने 23 हजार घनमीटर गाळ गाढला. त्यामुळे 23 टीसीएमने पाणीसाठ्याची क्षमता वाढली. पहिल्या पावसानंतर दोन दिवस नदीतील पाणी बघण्यासाठी गर्दी झाल्याचे स्थानिक नागरीक सांगतात.

एक बंधाऱ्याचीदेखील दुरुस्ती करण्यात आल्याने पाणीसाठ्यात आणखी वाढ झाली आहे. 300 एकर शेतीला याचा लाभ होणार असून अडीचशे ते तीनशे विहिरींच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. परिसरात मका आणि बाजरीची पीके उभी असून यानंतर गहू, कांदा, हरबरा आदी पिके घेण्याची  शेतकऱ्यांची तयारी आहे. गावात ठिकठिकाणी  शेतकरी प्रशासनाचे कौतुक करताना दिसतात.

या परिसरात टमाटा, बाजरी, तूर, मका आदी पिके उभी असलेली दिसतात. रुक्ष वाटणारा परिसर हिरवागार झाल्याचे पाहून जुन्याजाणत्यांना झालेले समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसते. काही ठिकाणी शेततळे भरून तुषार सिंचनाने दुसऱ्या पिकाची तयारी सुरू असलेली दिसत आहे. नदी प्रवाहीत झाल्याने उन्हाळ्यापर्यंत विहिरींना पाणी राहील असा विश्वास शेतकऱ्यांना आहे. ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या समन्वयातून गावात पाण्याच्यारुपाने समृद्धी आल्याची प्रतिक्रीयाही नागरिकांनी व्यक्त केली.

कचरु गवळी, शेतकरी-लय भारी काम केलं सरकारनं. तुमच्यामुळे आनंद गगनात मावत नाही. शासनाने ही योजना आणली नसती तर हे वैभव बघायला मिळालं नसतं. किती कौतुक करावं, तेवढं थोडं!

शंकर गवळी, शेतकरी-गेल्या 5-10 वर्षापासून कांदा नाही. दुष्काळाचे वर्ष गेले. पाणी अडवलं आहे, आता ते जिरणार आणि संपूर्ण गावाला त्याचा फायदा होईल. खऱ्या अर्थाने लोकांसाठी काम झाले.


-----

Wednesday 28 September 2016

रोहयो अंतर्गत फळबाग लागवडीचा समावेश
            नाशिक दि. 28- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत आंबा, बोर, आवळा, डाळिंब, संत्रा पुरक फळपिकांचा समावेश करुन शेतकऱ्यांच्या मागणीनुसार घन पद्धतीने लागवडीकरीता तसेच कलमे रोपे लागवडीचे प्रति हेक्टरी आधिक सुधारित मापदंडास शासनाने मान्यता दिली आहे.
            फळबाग लागवड कार्यक्रमामुळे लाभार्थ्यांचे उत्पन्नात वाढ होउन सहभागी लाभार्थ्याचे जीवनमान उंचावण्यास मदत होत असल्याने वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत शासनाने ही योजना सुरू केली आहेफळबाग लागवडीच्या कामाकरीता कृषि विभाग अंमलबजावणी यंत्रणा म्हणुन कार्यरत राहणार असून तालुका कृषि अधिकारी यांना शासननिर्णयाने कार्यक्रम अधिकारी म्हणुन घोषित केले आहे.  
मस्टर निर्गमित करणे, भरणे, पारीत करणे, आणि कुशल / अकुशल बाबींचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेतांत्रीक मान्यता देण्याचे अधिकार तालुका कृषि अधिकारी प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार उपविभागीय कृषि अधिकारी यांना देण्यात आले आहेत.
            फळपिकांच्या मजूरी आणि सामुग्रीसाठी तिसऱ्या वर्षापर्यंत आंबा कलमासाठी हेक्टरी 400 झाडांसाठी 1 लाख 87 हजार 570 रुपये, डाळींब कलमे हेक्टरी 740  झाडांसाठी 2 लाख 20 हजार 149 रुपये, आवळा कलमे हेक्टरी 277 झाडांसाठीलाख 60 हजार 19 रुपये, आवळा कलमे हेक्टरी 150 झाडांसाठी 75 हजार 715 रुपये आणि बोर रोपे  हेक्टरी 277 रोपांसाठीलाख 4 हजार 510 रुपये अनुदान मिळणार आहे.
            शेतकऱ्यांनी आपले कार्यक्षेत्रातील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधून मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड योजनेत सहभागी व्हावे,   असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक नाशिक यांनी केले आहे.
00000


पदवीधर मतदार संघासाठी मतदार नोंदणीचे आवाहन
नाशिक दि.28-नाशिक विभागीय पदवीधर मतदार संघासाठी मतदार याद्यांचा कार्यक्रम भारत निवडणुक आयोगाने घोषित केला असून पदवीधर नागरिकांनी 1 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2016 पर्यंत मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
मतदार याद्यांच्या पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस उप जिल्हा निवडणूक आधिकारी दीपमाला चौरे, उपजिल्हाधिकारी तथा नोडल ऑफिसर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार (निवडणूक) गणेश राठोड आदी उपस्थित होते.
मतदार नोंदणीसाठी व्यक्ती भारताची नागरिक आणि नाशिक विभाग पदवीधर मतदार संघातील रहिवासी असणे आवश्यक आहे. 1 नोव्हेंबर 2016 पूर्वी किमान 3 वर्ष विद्यापीठाची पदवीधर असावी किंवा त्यांच्याशी समतुल्य असलेली अर्हता धारण केलेली असावी. नोंदणी करतेवेळी फॉर्म नमुना 18 मध्ये नाव, शिक्षण, व्यवसाय, पूर्ण पत्ता, विधानसभा मतदार संघामध्ये नोंदणी झाली असल्यास त्याबाबतचा तपशील, मतदाराचा अलीकडील काळाचा फोटो, मतदाराचे ज्या विधानसभा मतदार संघातील यादीत नाव आहे त्या यादीचा भाग क्रमांक/ वि.सभा मतदार संघ क्रमांक व ओळखपत्र क्रमांक, संपर्क क्रमांक, ई मेल इत्यादी फॉर्मवर भरणे आवश्यक आहे.
 नमुना फॉर्म समवेत रहिवासी पुरावा(वीज बिल, टेलिफोन बिल, मनपा/नपा कडील  घरपट्टी बिलाची झेरॉक्स, ग्रामपंचायतीकडील कर पावती तसेच ज्या कागदपत्रावर ठळकपणे रहिवास दिसेल असा दस्तऐवज यांपैकी कोणतेही एक), निवडणूक आयोगाने तसेच यु.जी.सी. कमिशनने घोषित केलेल्या पदवी प्रमाणपत्राची प्रत, पदवीधर मतदाराचे अलिकडील काळाचे छायाचित्र जोडणे आवश्यक आहे. परिपूर्ण फॉर्म वैयक्तिक संबंधित तहसील कार्यालय अथवा संबंधित  विधानसभा मतदार संघ मदत केंद्र कार्यालय येथे जमा करावे. अपूर्ण फॉर्म स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
प्रारुप मतदार यादी 23 नोव्हेंबर रोजी प्रकाशित करण्यात येणार असून 8 डिसेंबर 2016 पर्यंत दावे व हरकती स्विकारण्यात येतील. 26 डिसेंबर पर्यंत दावे व हरकती निकालात काढून 30 डिसेंबर 2016 रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. पदवीधर  मतदारसंघाच्या मतदार याद्यांच्या पुनरिक्षण कार्यक्रमात जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री.बगाटे यांनी यावेळी केले. बैठकीस  विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
0000000000





मुद्रा योजने अंतर्गत कृषीपूरक व्यवसायासाठी देखील कर्ज
नाशिक,दि. 28: प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षापासून कृषीपूरक व्यवसासासाठी देखील कर्ज उपलब्ध होणार आहे.
मत्स्यपालन, कृषी उत्पादनावर आधारीत उद्योग समूह, पोल्ट्री, पशुपालन, दुग्ध व्यवसाय, मासेमारी, कृषी उद्योग केंद्र, न्न कृषी प्रक्रीया उद्योग आदी उत्पन्न वाढविणाऱ्या व्यवसायांचा यात समावेश करण्यात आला आहेकेवळ पीक कर्ज किंवा सिंचनासारख्या सुविधांचा यात समावेश नाही. परिपूर्ण अर्जासाठी 5 लाखापर्यंतच्या प्रकरणांना दोन आठवड्यात आणि त्यावरील कर्जास तीन आठवड्यात निकाली काढणे आवश्यक आहे. अर्ज नाकारल्यास अर्जावर कारणांची नोंद करण्यात येणार आहेरिझर्व्ह बँकेच्या सुचनेप्रमाणे अग्रणी बँकेकडून संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत विविध कौशल्य प्राप्त करणाऱ्या युवकांनादेखील या योजनेचा लाभ दिला जात आहे. जिल्ह्यातील गरजा ओळखून त्याप्रकारचे उत्पादन करणाऱ्या नव्या उद्योजकांसाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 83 हजार 629 उद्योजकांना 280 कोटी 52 लाखाचे कर्ज मंजूर करण्यात आले असून 275 कोटी 62 लाख वितरीत करण्यात आले आहे. त्यापैकी उद्योगाची सुरूवात करणाऱ्या शिशू घटकांची संख्या 80 हजार 562 आहे. राज्यात मुद्रा योजने अंतर्गत  सर्वाधिक कर्जाचे वितरण करणाऱ्या जिल्ह्यात पुणे, नागपूर, मुंबई आणि कोल्हापूरनंतर नाशिकचा क्रमांक आहे.
होतकरू आणि यशस्वी उद्योजक होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या युवकांना उद्योग-व्यवसायासाठी या योजनेमुळे प्रेात्साहन मिळते आहे. यापुढील काळात विविध कौशल्य प्राप्त करणारे तरुण आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत ही योजनेची माहिती पोहोचविण्यात येणार आहे. अर्जदाराने बँकेत संपर्क करण्यापूर्वी व्यवसाय निश्चिती करून व्यवसायानुरूप जागा, प्रशिक्षण, तांत्रिक अथवा उद्योजकता विकास, व्यवसायास लागणारे विविध परवाने, प्रकल्प किंमत आदी बाबींची खात्री करून घेणे आवश्यक आहे.

00000