Friday 30 September 2016

‘जलयुक्त शिवार लय भारी’

‘जलयुक्त शिवार लय भारी’
शिवारात पाणी आल्याने पांजरवाडीच्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

नाशिक,दि. 30: येवला तालुक्यातील पांजरवाडी गावात जलयुक्त शिवार योजने अंतर्गत कोळगंगा नदीच्या अकराशे मीटर लांब पात्रातील गाळ काढण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. टँकरवर अवलंबून राहणाऱ्या या भागात दुसऱ्या पिकांची तयारी सुरू असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

 कोळगंगा नदीवरील चार बंधारे गाळाने भरल्याने नदीपात्र उथळ झाले होते. पावसाळ्यात पूराचे पाणी शेतात शिरून नुकसान होत असे. तर दुसरीकडे पावसाळ्यानंतर पाणीसाठा न झाल्याने विहिरी कोरड्या पडून शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नव्हते. खरीप हंगामानंतर इथले शेतकरी उन्हाळी कांदा घेण्यासाठी येसगाव किंवा कोपरगावला स्थलांतरीत होत असत.

उपविभागीय अधिकारी वासंती माळी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थानी जलयुक्त शिवार योजना राबविण्याचे निश्चित केले. आर्ट ऑफ लिव्हींगतर्फे पोकलँड यंत्र उपलब्ध करून देण्यात आले. डिझेलसाठी 2 लाख 85 हजार खर्च योजने अंतर्गत करण्यात आला. डिझेलची रक्कम येण्यापूर्वी काम थांबू नये यासाठी लघुपाटबंधारे विभागाचे उप अभियंता हरिश्चंद्र पवार यांनी स्वत: जबाबदारी घेऊन डिझेल उपलब्ध करून दिले.

शाखा अभियंता प्रशांत जगताप यांनी ग्रामस्थांना तांत्रिक मार्गदर्शन केले. गाळ काढण्याच्या कामात उत्स्फुर्त लोकसहभाग लाभला. शेतकऱ्यांनी  35 ट्रॅक्टरच्या सहाय्याने 23 हजार घनमीटर गाळ गाढला. त्यामुळे 23 टीसीएमने पाणीसाठ्याची क्षमता वाढली. पहिल्या पावसानंतर दोन दिवस नदीतील पाणी बघण्यासाठी गर्दी झाल्याचे स्थानिक नागरीक सांगतात.

एक बंधाऱ्याचीदेखील दुरुस्ती करण्यात आल्याने पाणीसाठ्यात आणखी वाढ झाली आहे. 300 एकर शेतीला याचा लाभ होणार असून अडीचशे ते तीनशे विहिरींच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. परिसरात मका आणि बाजरीची पीके उभी असून यानंतर गहू, कांदा, हरबरा आदी पिके घेण्याची  शेतकऱ्यांची तयारी आहे. गावात ठिकठिकाणी  शेतकरी प्रशासनाचे कौतुक करताना दिसतात.

या परिसरात टमाटा, बाजरी, तूर, मका आदी पिके उभी असलेली दिसतात. रुक्ष वाटणारा परिसर हिरवागार झाल्याचे पाहून जुन्याजाणत्यांना झालेले समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसते. काही ठिकाणी शेततळे भरून तुषार सिंचनाने दुसऱ्या पिकाची तयारी सुरू असलेली दिसत आहे. नदी प्रवाहीत झाल्याने उन्हाळ्यापर्यंत विहिरींना पाणी राहील असा विश्वास शेतकऱ्यांना आहे. ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या समन्वयातून गावात पाण्याच्यारुपाने समृद्धी आल्याची प्रतिक्रीयाही नागरिकांनी व्यक्त केली.

कचरु गवळी, शेतकरी-लय भारी काम केलं सरकारनं. तुमच्यामुळे आनंद गगनात मावत नाही. शासनाने ही योजना आणली नसती तर हे वैभव बघायला मिळालं नसतं. किती कौतुक करावं, तेवढं थोडं!

शंकर गवळी, शेतकरी-गेल्या 5-10 वर्षापासून कांदा नाही. दुष्काळाचे वर्ष गेले. पाणी अडवलं आहे, आता ते जिरणार आणि संपूर्ण गावाला त्याचा फायदा होईल. खऱ्या अर्थाने लोकांसाठी काम झाले.


-----

No comments:

Post a Comment