Sunday 18 September 2016

शैक्षणिक दर्जा सुधारण्यात शिक्षकांचे योगदान महत्वाचे
                -दादाजी भुसे

            नाशिक दि.18:- शासनातर्फे शैक्षणिक  दर्जा सुधारण्याचा यशस्वी प्रयत्न होत असून यात जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांचे योगदान महत्वाचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी आज केले.
          रावसाहेब थोरात सभागृह येथे आयोहित जिल्हा परिषद गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे, आमदार जयंत पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर,  उपाध्यक्ष प्रकाश वडजे, शिक्षण क्रीडा व आरोग्य सभापती किरणताई थोरे, समाजकल्याण सभापती उषा बच्छाव, शिक्षण, महिला व बालकल्याण सभापती शोभा डोकळे , माध्यमिक शिक्षणाधिकारी नवनाथ अवताडे, प्राथमिक शिक्षणधिकारी प्रविणअहिरे, शिक्षक आदी उपस्थित होते.

श्री.भुसे म्हणाले, शिक्षणक्षेत्रातील उत्कृष्ट कार्यामुळे शिक्षकांचा सन्मान होतो. शैक्षणिक विकासासाठी त्यांच्या चांगल्या कार्याचे आणि उपक्रमांचे अनुकरण इतर शाळांमध्ये करणे आवश्यक आहे. इंग्रजी शाळेत मुलांना पाठविण्याकडे पालकांचा कल वाढत असल्याने त्यातुलनेत जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
 ग्रामस्थांच्या मदतीने  जिल्हा परिषद शाळेत डिजीटल क्लासरूम, -लर्निंगचे प्रकल्प राबविले जात असल्याबद्दल त्यांनी कौतुकोद्गर काढले.  काही गावातील महिलांनी कष्टाने मिळविलेला पैसा शाळेच्या विकासासाठी दिल्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला. आदिवासी क्षेत्रातील शाळांमधील रिक्तपदांचा अनुशेष भरुन काढण्यासाठी  आंतरजिल्हा बदलीमधून पदे भरण्यात येतील, असे श्री. भुसे म्हणाले. शासनातर्फे शिक्षण क्षेत्रातील समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी आमदार श्री.पाटील, श्रीमती चुंभळे, श्री. शंभरकर आदींनी विचार व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते याप्रसंगी जिल्हा परिषद शाळा हाताने येथील शिक्षिका वैशाली भामरे यांनी तयार केलेल्या बालविश्व  या ब्लॉगचे उद्घाटन करण्यात आले

यावेळी श्री.भुसे यांच्या हस्ते शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.  पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांची  नावे पुढीलप्रमाणे दीपक कारभारी खैरनार (बागलाण),  चंद्रभान सुकदेव पवार (चांदवड),  अनंत पुंडलिकराव देवरे (देवळा),  रमेश रामचंद्र मोरे (दिंडोरी), अविनाश दोघू घोलप (इगतपुरी),  जिभाऊ काशिनाथ निकम.( कळवण), राजेंद्र प्रल्हाद दिघे. (मालेगाव),  भाऊसाहेब मोतीराम निकम (नांदगाव), चंद्रकांत रघुनाथ लहांगे (नाशिक),  नवनाथ कारभारी सुडके (निफाड),  संजय लक्ष्मण बागुल (पेठ),  संजय वाळीबा आव्हाड (सिन्नर),  राजाराम उलुशा राऊत (सुरगाणा) ,रवींद्र शंकर देवरे (त्र्यंबकेश्वर), राजेंद्र जयराम कुशारे (येवला) अशी आहेत.
                                                                                0000000000


No comments:

Post a Comment