Wednesday 28 September 2016

पदवीधर मतदार संघासाठी मतदार नोंदणीचे आवाहन
नाशिक दि.28-नाशिक विभागीय पदवीधर मतदार संघासाठी मतदार याद्यांचा कार्यक्रम भारत निवडणुक आयोगाने घोषित केला असून पदवीधर नागरिकांनी 1 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2016 पर्यंत मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
मतदार याद्यांच्या पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस उप जिल्हा निवडणूक आधिकारी दीपमाला चौरे, उपजिल्हाधिकारी तथा नोडल ऑफिसर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार (निवडणूक) गणेश राठोड आदी उपस्थित होते.
मतदार नोंदणीसाठी व्यक्ती भारताची नागरिक आणि नाशिक विभाग पदवीधर मतदार संघातील रहिवासी असणे आवश्यक आहे. 1 नोव्हेंबर 2016 पूर्वी किमान 3 वर्ष विद्यापीठाची पदवीधर असावी किंवा त्यांच्याशी समतुल्य असलेली अर्हता धारण केलेली असावी. नोंदणी करतेवेळी फॉर्म नमुना 18 मध्ये नाव, शिक्षण, व्यवसाय, पूर्ण पत्ता, विधानसभा मतदार संघामध्ये नोंदणी झाली असल्यास त्याबाबतचा तपशील, मतदाराचा अलीकडील काळाचा फोटो, मतदाराचे ज्या विधानसभा मतदार संघातील यादीत नाव आहे त्या यादीचा भाग क्रमांक/ वि.सभा मतदार संघ क्रमांक व ओळखपत्र क्रमांक, संपर्क क्रमांक, ई मेल इत्यादी फॉर्मवर भरणे आवश्यक आहे.
 नमुना फॉर्म समवेत रहिवासी पुरावा(वीज बिल, टेलिफोन बिल, मनपा/नपा कडील  घरपट्टी बिलाची झेरॉक्स, ग्रामपंचायतीकडील कर पावती तसेच ज्या कागदपत्रावर ठळकपणे रहिवास दिसेल असा दस्तऐवज यांपैकी कोणतेही एक), निवडणूक आयोगाने तसेच यु.जी.सी. कमिशनने घोषित केलेल्या पदवी प्रमाणपत्राची प्रत, पदवीधर मतदाराचे अलिकडील काळाचे छायाचित्र जोडणे आवश्यक आहे. परिपूर्ण फॉर्म वैयक्तिक संबंधित तहसील कार्यालय अथवा संबंधित  विधानसभा मतदार संघ मदत केंद्र कार्यालय येथे जमा करावे. अपूर्ण फॉर्म स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
प्रारुप मतदार यादी 23 नोव्हेंबर रोजी प्रकाशित करण्यात येणार असून 8 डिसेंबर 2016 पर्यंत दावे व हरकती स्विकारण्यात येतील. 26 डिसेंबर पर्यंत दावे व हरकती निकालात काढून 30 डिसेंबर 2016 रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. पदवीधर  मतदारसंघाच्या मतदार याद्यांच्या पुनरिक्षण कार्यक्रमात जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री.बगाटे यांनी यावेळी केले. बैठकीस  विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
0000000000




No comments:

Post a Comment