Sunday 18 September 2016

जनावरांच्या संसर्गजन्य रोग निदान चाचणीमुळे मानवी आरोग्याचे रक्षण
                                                                -महादेव जानकर

    नाशिक दि.18- जनावरांच्या संसर्गजन्य रोग निदान चाचणीमुळे मानवाच्या आरोग्याचे रक्षण होणार  आहे, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले.
        निफाड तालुक्यातील चितेगाव येथे आयोजित जनावरातील संसर्गजन्य गर्भपात व क्षयरोग निदान चाचणीच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे, पंचायत समिती सभापती सुभाष कराड, विभागीय पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ.धनंजय परकाळे,जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.संजय विसावे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.प्रशांत फालक, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, प्रादेशिक दुग्धविकास अधिकारी डॉ.एन.व्ही.राठोड, सरपंच सुभाष गाडे आदी उपस्थित होते.

         श्री.जानकर म्हणाले, जनावरांना झालेला रोगाचा संसर्ग पशुपालकास होण्याची शक्यता असते. चाचणीद्वारे वेळीच निदान करून जनावरांसह मानवी आरोग्याचे रक्षण करण्याचा प्रयत्न शिबिराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. रोग निदान शिबिराची सुरूवात चितेगाव येथून होत असल्याचे नमूद करून त्याची अंमलबजावणी राज्यभर होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पशुसंवर्धन व दुग्धविकास क्षेत्रातील प्रगती राज्यातील  शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याने या क्षेत्रातील योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात, असे त्यांनी सांगितले.  शेतीचा विकास करण्यासाठी शेती सोबत एखादा जोडधंदा विकासित करावा, असे आवाहन त्यांनी केले.

 चितेगांव येथील तनिष्का महिला बचत गटाने सुरु केलेल्या दुग्ध संकलन व विक्रीकेंद्राचे कौतुक मंत्री महोदयांनी केले. बचतगटाच्या महिलांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जनावर लसीकरण शिबीराची त्यांनी पाहणी केली.
         शिबिरात डॉ.डी.के.चौधरी, डॉ.एम.एम.ठाकूर, डॉ.एस.एस.वेंदे, डॉ.एस.एच.महाजन, डॉ.मिलिंद भपके यांनी सांसर्गिक गर्भपात चाचणी, क्षयरोग चाचणी आणि विविध जनावरांना होणाऱ्या रोगाची लागण या विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास गावतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                

No comments:

Post a Comment