Monday 26 September 2016

सर्वांसाठी पर्यटन…
जगभरात 27 सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटना यानिमित्ताने पर्यटनाच्या विविध पैलूंवर चर्चा घडवून आणते. यावर्षी ‘सर्वांसाठी पर्यटन-जागतिक सुलभतेची पर्वणी’ ( टुरिझ्म फॉर ऑल-प्रमोटींग युनिव्हर्सल ॲक्सेबिलीटी) या संकल्पनेवर विचार केला जाणार आहे. थायलंडमधील बँकाँक शहरात हा कार्यक्रम होणार आहे.

जागतिक पातळीवर 1980 मध्ये प्रथमत: जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला. ‘शांतता, सहअस्तित्व आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी पर्यटन’   ही संकल्पना त्यावेळी चर्चेसाठी घेण्यात आली. त्यानंतर त्यानंतर जीवनमान, विकास, शिक्षण,आदरातिथ्य, माहिती आणि संवाद, पर्यावरण बदल, पाणी  आदी विविध विषयांवर जागतिक पातळीवर चर्चा करण्यात आली. आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि या क्षेत्राशी संबंधितांना मार्गदर्शनासाठी ही चर्चा उपयुक्त ठरली आहे.

 पर्यटनाचा विचार करताना पर्यटकांच्या आवडी-निवडी, सौंदर्य, स्वच्छता, मनोरंजन, आदी विविध बाबींवर विचार करण्यात येतो. मात्र पर्यटनस्थळाला प्रत्येक नागरिकाला भेट देणे शक्य व्हावे, याचा विचार फारसा केला जात नाही. पर्यटकाला त्या स्थळापर्यंत पोहोचणे सहजशक्य होईल याबाबत विचार करणे ही पर्यटनवाढीच्यादृष्टीने महत्वाची बाब आहे. म्हणून पर्यटन दिनाच्या निमित्ताने या पैलूचा विचार करण्यात येत आहे.

अपंग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले सोबत असलेल्या कुटुंबासाठी पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचण्याची सहजता महत्वाची असते. जगातील प्रत्येक व्यक्तीला एखाद्या चांगल्या पर्यटनस्थळाला भेट द्यावी, असे वाटते आणि तो त्याचा अधिकारही आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगातील 15 टक्के नागरिक (एक बिलीयन) कोणत्या ना कोणत्या अपंगत्वासह जीवन व्यतीत करीत आहेत. त्यामुळे शाश्वत पर्यटन विकासाचा विचार करताना अशा व्यक्तिंसाठी सुविधा उपलब्ध करून देणे, हा या विषयाचा गाभा आहे.

प्रत्येक व्यक्तीला पर्यटनाविषयी  योग्य माहिती आणि पोहोचण्यासाठी मार्ग उपलब्ध करून देणे पर्यटन व्यवसायांशी सबंधीत सर्व घटकांचे कर्तव्य आहे, त्याचबरोबर व्यवसाय वाढविण्यासाठी  ती संधीदेखील आहे. समाजातील एका मोठ्या समूहाला त्याच्या अधिकारापासून वंचित न ठेवणे आणि त्याचबरोबर हा मोठा समूह व्यवसायाशी जोडणे, असे या विषयाचे महत्वाचे पैलू आहेत.
सर्वांसाठी पर्यटनाचा विचार करताना या व्यवसायाशी संबंधीत घटकांना पर्यटकांपर्यंत अचूक आणि संबंधित माहिती वेळेवर पोहोचविणे गरजेचे आहे.  अपंग पर्यटकांच्या विशेष गरजेचा विचार करता प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना पर्यटनाविषयी माहिती वेळेवर मिळणे फार महत्वाचे आहे. तरच त्यांना पर्यटनाचा आनंद मोकळेपणाने घेता येईल. त्यासाठी माहिती पुस्तके, मोबाईल ॲप, संकेतस्थळे, रस्त्यावरील फलक उपयुक्त ठरू शकतील.
पर्यटकांना प्रवासाच्या योग्य सुविधा मिळणेदेखील तेवढेच महत्वाचे आहे. राज्य शासन विविध पर्यटनस्थळांना जोडण्यासाठी करीत असलेले प्रयत्न याचाच एक भाग आहे. समृद्धी मार्गानेदेखील अजिंठा, शिर्डी, नाशिक, वेरुळ, लोणार, शेगाव अशी पर्यटनस्थळे जोडली जाणार आहेत. राज्यात इतरही ठिकाणी होत असलेल्या कामांमुळे चांगली वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे. मात्र त्याचबरोबर पर्यटनस्थळाच्या ठिकाणी अशा विशेष पर्यटकांच्या गरजेचा विचारी महत्वाचा आहे. गडकिल्ल्यांवर  ट्रॉलीजची होत असलेली व्यवस्थादेखील यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
राज्यात अनेक उत्तम पर्यटनस्थळे आहेत. धार्मिक, ऐतिहासिक, प्राचीन, नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण अशी अनेक पर्यटनस्थळे विकसीत करण्यात येत आहेत. पर्यटनक्षेत्राशी जोडले गेलेले रोजगारही मोठ्या प्रमाणात आहे. या व्यवसायाशी निगडीत विविध संस्थादेखील आहेत. सर्व घटकांनी यावर्षीच्या संकल्पनेचा विचार केल्यास पर्यटनाच्या अधिकाराचा आंनद प्रत्येकाला घेणे शक्य होईल आणि त्याचबरोबर या व्यवसायाचा अधिक विकासही शक्य होईल.

जगातील वैविध्याचा आनंद घेणे प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. तो अधिकार त्याला मिळवून देणे पर्यटन क्षेत्राशी निगडीत प्रत्येकाचे कर्तव्य आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून दृकश्राव्य सुविधा, वाहतूक सुविधा, सार्वजनिक सेवा आणि योग्य वातावरणाचा विकास केल्यास ‘सर्वांसाठी पर्यटन’ ही संकल्पना प्रत्यक्षात अस्तित्वात येऊ शकेल.

No comments:

Post a Comment