Wednesday 21 September 2016

डेंग्यू नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करा
-पालकमंत्री गिरीष महाजन

          नाशिक, दि.21 :- शहराबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामिण भागात डेंग्यूच्या आजारावर नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने करण्यात यावी, असे निर्देश  राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी प्रशासनाला  दिले.
          डेंग्यु, मलेरिया व चिकनगुनिया संदर्भात शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., महानगरपालिका आयुक्त अभिषेक कृष्णा, पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.सुनिल  जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे, आदी उपस्थित होते.

          श्री.महाजन म्हणाले,  औषधांची उपलब्धता वाढवणे, डास निर्मुलनाचे उपाय करणे आणि आजाराबाबत जनजागृतीसाठी विशेष कृती कार्यक्रम हाती घेण्यात यावेत.  जिल्ह्यात डेंग्यु रुग्ण आढळत असल्याने योग्य औषधोपचारावर लक्ष देण्यात यावे. पाणी साठवण्याच्या ठिकाणी  डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. डेंग्युसारखे आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणेतने सतर्क रहावे, असे निर्देश त्यांनी दिले.
          यावेळी नाशिक विभागातील 45 गावे संवेदनशील आहेत. यात नाशिक जिल्ह्यात 24 व अहमदनगर जिल्ह्यातील 15 गावांचा समावेश आहे. जानेवारी ते  ऑगस्ट या कालावधीत विभागतील 2614 रुग्णांचे रक्त नमुने तपासले असता 832 नमुने पॉझिटीव्ह असल्याचे दिसून आले आहेत. नाशिक शहराबरोबरच जिल्ह्यातील इगतपूरी, दिंडोरी, निफाड व नांदगाव हे तालुके यादृष्टीने संवेदनशील असून आरोग्य यंत्रणांकडून आवश्यक उपाय केले जात आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
          आरोग्य विभाग, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या वतीने विशेष कृती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी आवश्यकते नुसारी तपासणी कक्ष वाढवणे, औषधांचा पूरेसा साठा राखणे व वैद्यकिय अधिकारी कर्मचारी उपलब्ध राहावेत यासाठी काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. डास नियंत्रणासाठी स्वच्छता, धुर फवारणी, कचरा राहू  नये, यासाठी घंडागाडीचा वापर वाढवण्यात येत आहे.  

                                                                               000000

No comments:

Post a Comment