Friday 16 September 2016

शेती व शेतकरी समृद्ध करण्याचा सहकार विभागाचा प्रयत्न
-राज्यमंत्री गुलाबराव पाटील       
   
         नाशिक दि.16-कृषि क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार असल्याने शेती आणि शेतकरी समृद्ध करण्याचा प्रयत्न सहकार विभागामार्फत करण्यात येत आहे, असे प्रतिपादन सहकार,पणन व वस्त्रोद्योग राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
         नाशिक विभागातील सहकारी संस्थांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव, एम.डी पाटील आदी उपस्थित होते.
      श्री.पाटील म्हणाले, शेतकऱ्याच्या हितासाठी त्याला कर्ज उपलब्ध करून देणे हा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा गाभा आहे. तसेच राष्ट्रीयकृत बँकांनीदेखील शेतकऱ्यांबाबत सहकार्याची भूमीका घेणे गरजेचे आहे. कर्ज वाटपासाठी राष्ट्रीयकृत बँका प्रतिसाद देत नसल्यास त्यांची स्वतंत्र बैठक घेण्यात यावी, अशी सूचना त्यांनी केली.

                    ते म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बँकेने अधिक सक्षम होण्यासाठी  सभासद संख्या वाढविणे आणि पीक कर्ज पुर्नगठनावर भर द्यावा.  सहकारी संस्थांचे काम अधिक सक्षमपणे होण्यासाठी लवकरच संगणकीकरणावर भर देण्यात येईल.  कर्ज परतफेड न करणाऱ्या पतसंस्थांच्या  संचालकांच्या मालमत्तेवर बोजा चढवून वसूली करावी, असे निर्देश त्यांनी दिले. 
             श्री.पाटील यांनी यावेळी, नाशिक विभागातील मंजूर,भरलेली पदे व रिक्त पदांची माहिती घेतली, शेती कर्ज वाटपातील बँकेच्या अडचणी व उपाययोजना यावर चर्चा केली. तसेच तालुका निहाय पिक कर्ज मेळावे घेवून सुलभ पीक कर्ज वाटप योजनेबाबत माहिती द्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आर्थिक स्थितीची माहिती , विविध कार्यकारी संस्थाचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.
               बैठकिस पाचही जिल्ह्यांचे जिल्हा उपनिबंधक व जिल्हा विशेष लेखा परीक्षक, सहाय्यक निबंधक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

**********

No comments:

Post a Comment