Tuesday 25 October 2016

जिल्हा क्रीडा सप्ताह

डिसेंबरमध्ये जिल्हा क्रीडा सप्ताहाचे आयोजन

नाशिक, दि.25- जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा परीषद आणि विविध क्रीडा संघटनांच्या संयुक्त विद्यमाने डिसेंबर अखेर जिल्हा क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे.
क्रीडा सप्ताहाची रुपरेषा ठरविण्यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस सहाय्यक जिल्हाधिकारी विनय गौडा, क्रीडा उपसंचालक डॉ.जयप्रकाश दुबळे, डॉ.भीष्मराज बाम, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस, नरेंद्र छाजेड, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, प्रशिक्षक विजयेंद्र सिंग आदी उपस्थित होते.

क्रीडा सप्ताहांतर्गत विविध क्रीडा प्रकारात अधिका‍धिक नागरिक सहभागी होण्यासाठी क्रीडा संघटनांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. यावर्षी क्रीडा महोत्सवाच्या स्वरुपात आयोजन करण्यात येऊन पुढील वर्षी स्पर्धा स्वरुपात आयोजन करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.

विविध क्रीडा संघटनांना एकत्र आणून जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी या सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. सप्ताहांतर्गत 10 किमी धावणे, सायकलींग, हेरीटेज वॉक आदि विविध क्रीडा प्रकार आयोजित करण्यात येणार आहेत. स्पर्धा पुर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
 स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करावी आणि प्रत्येक क्रीडा संघटनांचे दोन प्रतिनिधींचा समावेश असलेल्या समितीने तातडीने कार्यक्रमाची रुपरेषा अंतिम करावी, अशा सुचना श्री.राधाकृष्णन यांनी दिल्या.
                  बोधचिन्ह व शिर्षकासाठी स्पर्धा जाहीर
        क्रीडा सप्ताहाचे अधिकृत बोधचिन्ह (लोगो) आणि शिर्षक स्पर्धेच्या माध्यमातून निश्चित करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी आपल्या प्रवेशिका जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात 15 नोव्हेंबर 2016 पर्यंत सादर करावेत. सर्वोत्तम बोधचिन्ह आणि शिर्षकाचा उपयोग क्रीडा सप्ताहासाठी करण्यात येणार असून विजेत्याला सन्मानित करण्यात येणार आहे. सर्व वयोगटातील इच्छुकांसाठी स्पर्धा खुली आहे.
क्रीडा परिषदेची बैठक संपन्न
        जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा स्पर्धेची बैठक संपन्न झाली. बैठकीत यावर्षी होणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली. राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरील एखादी स्पर्धा जिल्हा क्रीडा सप्ताहाच्यावेळी आयोजित करणे शक्य असल्यास त्यादृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
        यावर्षी नाशिक येथे राज्यस्तर जलतरण स्पर्धेचे आयोजन 3 ते 7 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. त्याचबरोबर टेबल टेनिस राज्यस्तर, राष्ट्रीय स्तर मैदानी स्पर्धा आणि बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजनदेखील नाशिक येथे होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
        गतवर्षी शालेय स्पर्धेतील विविध 82, राजीव गांधी खेल अभियान अंतर्गत 10 आणि महिला स्पर्धेंतर्गत 12 क्रीडा प्रकार मिळून जिल्ह्यातील 52 हजार 711 खेळाडू  सहभागी झाले होते. यावर्षी आतापर्यंत 55 हजार खेळाडुंची नोंदणी झाली आहे, अशी माहिती श्री.सबनीस यांनी दिली.
                                        000000

                                                000000

          

Monday 24 October 2016

एकोणीसवी जागतिक शांतता परिषद

शिक्षणाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी व्हावा- राज्यपाल सी.विद्यासागर राव

नाशिक, दि.24- नागरिकांना शिक्षणाच्या माध्यमातून सत्याचा शोध घेण्यासाठी सक्षम करणे आणि शिक्षणाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करणे हे शैक्षणिक संस्थांचे मुख्य उद्दीष्ट असून शैक्षणिक क्षेत्रात त्या दिशेने सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्न व्हावेत, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.

इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ एज्युकेटर्स फॉर वर्ल्ड पीस आणि गोखले एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 19 व्या जागतिक शांतता परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पद्मविभुषण डॉ.अनिल काकोडकर, युजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर, गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एस.बी.पंडीत, सचिव  डॉ.एम.एस.गोसावी, प्राचार्या डॉ.दिप्ती देशपांडे, प्राचार्य व्ही.एन.सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले, विद्यापीठ आणि महाविद्यालयातून शिक्षण घेऊन मोठ्या संख्येने पदवीधर बाहेर पडत आहेत. मात्र त्यातील बहुतांशी शिक्षणाचा उपयोग समाजासाठी करताना दिसत नाहीत. या बाबीचा गांभिर्याने विचार करून नैतिक मुल्यांचीं सांगड शिक्षणाशी घालण्याबाबत गांभिर्याने विचार करणे गरजेचे आहे. राज्यातील विद्यापीठांनी शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे, संशोधनाला चालना देणे, कौशल्य विकास, अध्यापन, संशोधन तसेच प्रशासकीय पदावर महिलांचा सहभाग वाढविण्यावर भर द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

          शिक्षण क्षेत्रातील नवे प्रवाह अध्यापकांपर्यंत पोहोचविणारे अभ्यासक्रम तयार करणे आणि नाविन्यपुर्ण अध्यापन पद्धती विकसीत करणे आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठांसाठी चांगले शिक्षक तयार करूनच गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे शक्य होईल. भविष्यात गुणवत्ता नसलेल्या शैक्षणिक संस्थांचे महत्व कमी होईल आणि कदाचित त्या बंद पडण्याची शक्यता आहे.


 इंटरनेट आणि स्मार्ट फोनच्या युगात ज्ञानप्रसारासाठी डिजीटल क्लासरूम महत्वाचे आहे. अशा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामाजिक आणि आर्थिकदृष्टीने मागास घटकांना शिक्षण उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण माहिती पोहोचवली जावी. शिक्षणाद्वारे उद्योजकतेवर विशेष भर शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांचा उद्योजक होण्याकडे कल वाढावा यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्री. विद्यासागर राव यांनी केले. भारत महासत्ता होण्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील वैचारिक नेतृत्व आपल्याला विकसित करावे लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

ते म्हणाले, प्राचीन काळी अनेक ऋषीमुनींनी ‘वसुधैव कुटुंबकम्’ हे तत्वज्ञान जगाला दिले. भारतीय संस्कृतीने संपुर्ण जगाला अनेक शतके प्रभावित केले आहे. नव्या पिढीला प्रोत्साहीत करण्यासाठी मुल्याधारीत शिक्षणाच्या आधारे आपले सांस्कृतिक वैभव त्यांच्यापर्यंत पोहोचवितांना शिक्षणक्षेत्रातील प्रत्येक घटकाने आपल्या ज्ञानाचा उपयोग  समाजहित आणि मानवतेसाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.

नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे विचार समोर ठेऊन गोखले एज्युकेशन सोसायटीने चांगली वाटचाल केली आहे. आदिवासी कल्याणासाठी उच्च शिक्षणाच्या माध्यमातून संस्थेने चांगले कार्य केले आहे, असे नमूद करून पालघर जिल्ह्यात कुपोषणसारख्या समस्यांवर मात करण्यासाठी  संस्थेच्या कार्याला सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

समाजात दहशतवादाचे आव्हान असताना संपूर्ण जगाला शांततेच्या विचारांची गरज आहे. त्यासाठी ही परिषद उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चांगले शासन शैक्षणिक संस्थांसह विविध संस्थांच्या प्रयत्नातून साकार होते, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना डॉ.काकोडकर म्हणाले, विज्ञान-तंत्रज्ञान आणि अणूऊर्जा क्षेत्रात संशोधन तसेच विकासाला चालना देताना नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षणपद्धतीत बदल घडवून आणणे आवश्यक आहे.  जागतिक दर्जाचे संशोधन समाज आणि देशाच्या विकासासाठी उपयुक्त ठरणारे आहे.

आर्थिक आणि सामाजिक विचार करताना मुल्यांच्या विकासाकडे लक्ष देणे तेवढेच महत्वाचे आहे. मनुष्यबळाच्या विकासाद्वारे आर्थिक आणि सामाजिक बदल घडवून आणणे शक्य आहे. उन्नत ज्ञानाच्या आधारे असे बदल घडवून आणता येतील, असे त्यांनी सांगितले. देशात सुरक्षेचे वातावरण निर्माण करण्यासाठी जागरूक समाज निर्माण होणे महत्वाचे असल्याचे ते म्हणाले.

श्री.निगवेकर म्हणाले, तंत्रज्ञानामुळे देशा-देशातील सीमारेषा पुसट होत आहेत. प्रत्येक व्यक्ती तंत्रज्ञानामुळे परस्परांशी जोडला जातोय. अशावेळी एकविसाव्या शतकाचा बदलते चित्र पाहणाऱ्या नव्या पिढीला एकतेच्या सुत्राने परस्परांशी जोडणे महत्वाचे आहे.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते प्राचार्य टी.ए.कुलकर्णी यांचे चरित्र, महावस्त्र ऑफ महाराष्ट्र-पैठणी या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते डॉ.अनिल काकोडकर यांना ‘डॉ.एम.एस.गोसावी एक्सलन्स ॲवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. तसेच डॉ.गोसावी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री.गोसावी यांनी शांतता परिषद समाजाची गरज पुर्ण करण्याच्यादृष्टीने विद्यापीठांना मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. श्रीमती देशपांडे यांनी प्रास्ताविकात परिषदेविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाला देश-विदेशातील प्रतिनिधी, अधिकारी, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
            
            राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे नाशिक येथे स्वागत

          राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे आज त्यांच्या पत्नी श्रीमती सी.विनोधा यांचे समवेत पोलिस कवायत मैदान येथे आगमन झाले. यावेळी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी प्रशासनाच्यावतीने त्यांचे स्वागत केले.
          विशेष पोलिस महानिरीक्षक विनय कुमार चौबे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल, जिल्हा पोलिस अधिक्षक अंकुश शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर आदी यावेळी उपस्थित होते.
                                                          000000
                                                          000000

          

Saturday 22 October 2016

पदवीधर मतदारसंघ मतदार नोंदणी

विभागीय आयुक्तांकडून विशेष मतदार नोंदणी मोहिमेचा आढावा

       नाशिक, दि.22- विभागीय आयुक्त तथा नाशिक पदवीधर मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी एकनाथ डवले आणि जिल्हाधिकारी तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी राधाकृष्णन बी. यांनी विविध मतदार नोंदणी केंद्रांना भेट देऊन विशेष मतदार नोंदणी मोहिमेची माहिती घेतली.

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार नाशिक पदवीधर मतदारसंघाची 1 ऑक्टोबर 2016 पासून मतदारनोंदणी सुरु झाली आहे. मतदार नोंदणी कार्यक्रमाला गती देण्यासाठी नाशिक विभागातील सर्व पदनिर्देशित अधिकारी यांच्या कार्यालयात तसेच महसूल मंडळ कार्यालयात 22 व 23 ऑक्टोबर या शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी जास्तीत जास्त मतदार नोंदणी होण्याच्या दृष्टीने विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. 

श्री.डवले यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह सातपूर येथे मंडळ अधिकारी राजेश मोरे यांचेकडून विशेष मोहिमेची माहिती घेतली. त्यांनी मतदार नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांशी चर्चा केली. तसेच त्यांनी विविध ठिकाणी भेट देऊन मतदार नोंदणीबाबत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.
ही विशेष मोहिम रविवार 23 ऑक्टोबर रोजी देखील सुरू राहणार असून अधिकाधिक नागरिकांनी यात सहभाग घेऊन नोंदणी करावी, असे आवाहन श्री.डवले आणि श्री.राधाकृष्णन बी. यांनी  केले आहे.
                                                ****

Friday 21 October 2016

पदवीधर मतदार नोंदणी विशेष मोहिम

पदवीधर मतदार नोंदणीबाबत विशेष मोहिम
नाशिक दि-21 भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 नोव्हेंबर 2016 या अर्हता दिनांकावर आधारीत पदवीधर मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यात 22 व 23 ऑक्टोबर 2016 रोजी मंडळ अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालयातील मतदार मदत केंद्र, धान्य वितरण अधिकारी कार्यालय, नाशिकरोड व शिक्षणकर वसुली अधिकारी कार्यालय, तलाठी कार्यालय येथे पदवीधर मतदार नोंदणी बाबत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. विशेष मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेऊन उत्स्फुर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहा. मतदार नोंदणी अधिकारी, नाशिक पदवीधर मतदारसंघ, नाशिक यांनी केले आहे.
-----

Wednesday 19 October 2016

मतदारनोंदणी विशेष मोहिम

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ मतदारनोंदणी
येत्या शनिवार-रविवारी विशेष मोहिम

नाशिक दि. 19 – नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार मतदारनोंदणी अभियान सुरु असून या अभियानाला गती देण्यासाठी  येत्या शनिवार- रविवारी (दि. 22 व 23 ऑक्टोबर) रोजी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा नाशिक पदवीधर मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी श्री. एकनाथ डवले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
नाशिक विभागातील सर्व पदनिर्देशित अधिकारी यांच्या कार्यालयात तसेच महसूल मंडळ कार्यालयात दि. 22 व 23 ऑक्टोबर या शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी जास्तीत जास्त मतदार नोंदणी होण्याच्या दृष्टीने हे अभियान राबविण्यात येणार आहे. 
नाशिक पदवीधर मतदारसंघाची 1 ऑक्टोबरपासून मतदारनोंदणी सुरु झाली आहे. मात्र, दि. 15 ऑक्टोबरपर्यंत झालेली मतदार नोंदणी पाहता मतदारजागृती अभियानांतर्गत विशेष मोहिम हाती घेऊन अधिकाधिक मतदार नोंदणी केली जाणार आहे.
पात्र मतदारांनी  (दि. 1 नोव्हेंबर 2013 पूर्वी पदवी/पदविका प्राप्त असेल असे) मतदार नोंदणी करण्यासाठी नमुना क्र. 18 मध्ये अर्ज करुन अर्जासोबत पदविका/पदवीधर असल्याबाबत राजपत्रित अधिकारी यांनी साक्षांकित केलेले विद्यापीठाचे प्रमाणपत्र, फोटो असलेले निवडणूक ओळखपत्र असल्यास त्याची प्रत, रहिवास पुरावा आणि पासपोर्ट साईज फोटो जोडून संबंधित पदनिर्देशित अधिकारी यांच्या कार्यालयात अथवा संबंधित तहसील कार्यालयात अथवा जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच शासकीय/निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, बॅंका या कार्यालयातील कार्यालयप्रमुख यांनी त्यांचे कार्यालयात कार्यरत असलेल्या पात्र पदवीधर अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून फॉर्म क्र. 18 भरुन घ्यावेत आणि आवश्यकत त्या कागदपत्रांसह साक्षांकन करुन कार्यालयामार्फत संबंधित उपजिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय अथवा तहसील कार्यालय वा महसूल मंडळ कार्यालय यापैकी कोणत्याही एका ठिकाणी अर्ज जमा करावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.
                                                ****


Tuesday 18 October 2016

निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी

निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी
                                  -राधाकृष्णन बी.

नाशिक, दि.18-राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील सहा नगर परिषदांच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर केल्याने संपूर्ण जिल्ह्यात निवडणूक आदर्श आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिले.
          जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर, अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, दिलीप स्वामी, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी गंगाधरन, मंजू लक्ष्मी, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे आदी उपस्थित होते.
          श्री.राधाकृष्णन म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणे आदर्श आचारसंहितेची अंमजबजावणी करण्याबाबत आयोगाच्या स्पष्ट सुचना आहेत. त्यानुसार निवडणुका निर्भय आणि शांततेच्या वातारणात पार पाडल्या जातील याची दक्षता निवडणूक अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी घ्यावी.
 निवडणुकांसाठी मतदारसंघातील प्रत्येक प्रभागाला भेट देऊन सुक्ष्म नियोजन करावे. निवडणुकांच्यादृष्टीने आवश्यक पथके तयार करावीत. मतदार जागृतीवर विशेष भर देण्यात यावा. नगर परिषदेच्या ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापीत करण्यात यावा. आदर्श आचारसंहिता 28 नोव्हेंबर पर्यंत लागू राहील, अशी माहिती  त्यांनी दिली. विविध यंत्रणांचे अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांनी बैठक घेऊन अधिनस्त अधिकाऱ्यांना आदर्श आचारसंहितेच्या पालनाबाबत माहिती द्यावी, असेही श्री.राधाकृष्णन यांनी सांगितले.
कोणत्याही प्रकारची सभास्थळ अथवा इतर कोणत्याही  परवानगी देताना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य आणि सर्व उमेदवारांना समान न्याय या तत्वाचे पालन करण्यात यावे. धार्मिक स्थळाच्या ठिकाणी आणि रात्री दहा वाजेनंतर सभांना परवानगी देऊ नये. महामंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था, बाजार समिती आदींकडील पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेली वाहने ताब्यात घेण्यात यावीत. प्रचार सभा किंवा जाहिरातीतून सामाजिक तेढ निर्माण करणारे संदेश प्रसारीत होणार नाहीत यावर बारीक लक्ष द्यावे. शासकीय विश्रामगृहाचा उपयोग राजकीय बैठकासांठी करता येणार नाही, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी श्री.बगाटे, श्री.स्वामी, श्री.खेडकर आणि श्री.मंगरुळे यांनीदेखील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगर परिषदांचे मुख्याधिकारी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
----


Monday 17 October 2016

नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान

212 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी 27 नोव्हेंबर, 14, 18 डिसेंबर व 8 जानेवारीला मतदान
192 नगरपरिषदांच्या थेट अध्यक्षपदांसाठीदेखील मतदान
- राज्य निवडणूक आयुक्तांची घोषणा


            मुंबई, दि. 17: राज्यातील एकूण 192 नगरपरिषदा व 20 नगरपंचायतींच्या (एकूण 212) सार्वत्रिक निवडणुकांसाठी चार टप्प्यांत 27 नोव्हेंबर, 14 व 18 डिसेंबर 2016 आणि 8 जानेवारी 2017 रोजी मतदान होणार आहे. त्याचबरोबर यातील 192 नगरपरिषदांच्या थेट अध्यक्षपदांच्या निवडणुकांसाठीदेखील संबंधित दिवशी मतदान होईल आणि मतदानानंतर लगेच दुसऱ्या दिवशी संबंधित ठिकाणी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.
            श्री. सहारिया यांनी सांगितले की, यात मुदत संपणाऱ्या 190 नगरपरिषदा व 4 नगरपंचायती; तर  नवनिर्मित 2 नगरपरिषदा व 16 नगरपंचायतींचा समावेश आहे. या सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रात आणि त्याचबरोबर ज्या जिल्ह्यात चार किंवा त्यापेक्षा जास्त नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत असल्यास त्या संपूर्ण जिल्ह्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आचारसंहिता लागू झाली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणीची आचारसंहिता संपुष्टात येईल.
नामनिर्देशनपत्रांसाठी संगणक प्रणाली
        नगरपरिषदांसाठी बहुसदस्यीय पद्धतीनुसार आणि थेट अध्यक्षपदांसाठी निवडणुका होतील; तर नगरपंचायतींच्या निवडणुका एकसदस्यीय पद्धतीने होतील. या निवडणुकांसाठी उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रे सहजरितीने भरता यावे, यासाठी एक संगणक प्रणाली विकसित केली आहे. त्यासाठीच्या संकेतस्थळावरील नामनिर्देशनपत्रे आणि शपथपत्रात आवश्यक ती सर्व माहिती भरून त्याची प्रत काढावी (प्रिंट आऊट) आणि त्यावर सही करून ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे विहित वेळेत सादर करणे आवश्यक राहील, असे त्यांनी सांगितले.
जात वैधता प्रमाणपत्राचा पुरावा
        राखीव प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे; परंतु जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची पोच पावती नामनिर्देशनपत्रासोबत सादर करण्याची मूभा देण्यात आली आहे. अशा उमेदवारांना निवडून आल्याचे घोषित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे, अन्यथा त्यांची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द करण्याची संबंधित अधिनियमात तरतूद करण्यात आली आहे, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.
निवडणुका होत असलेले जिल्हे
नगरपरिषदा/ नगरपंचायतींची संख्या
नामनिर्देशनपत्रांची कालावधी
मतदानाची तारीख
मतमोजणीचा दिनांक
25 जिल्हे
147 नगरपरिषदा व 18 नगरपंचायती
24 ते 29 ऑक्टोबर 2016
27 नोव्हेंबर 2016
28 नोव्हेंबर 2016
2 जिल्हे
14 नगरपरिषदा
11 ते 19 नोव्हेंबर 2016
14 डिसेंबर 2016
15 डिसेंबर 2016
4 जिल्हे
20 नगरपरिषदा व 2 नगरपंचायती
19 ते 25 नोव्हेंबर 2016
18 डिसेंबर 2016
19 डिसेंबर 2016
2 जिल्हे
11 नगरपरिषदा
9 ते 17 डिसेंबर 2016
8 जानेवारी 2017
9 जानेवारी 2017

एक दृष्टिक्षेप
·         मुदत संपणाऱ्या 190 नगरपरिषदा व 4 नगरपंचायती;
·         नवनिर्मित 2 नगरपरिषदा व 16 नगरपंचायती
·         एकूण 212 नगरपरिषदा व नगरपंचायती
·         नगरपरिषदेच्या 192 थेट अध्यक्षपदासाठी निवडणूक
·         एकूण प्रगाग 2,485
·         एकूण जागा 4,750
·         महिलांसाठी एकूण आरक्षित जागा 2,445
·         अनुसूचित जातींसाठी एकूण आरक्षित जागा 608
·         अनुसूचित जमातींसाठी एकूण आरक्षित जागा 198
·         नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी एकूण आरक्षित जागा 1,315

महत्त्वपूर्ण उपाययोजना
·         व्हिडिओग्राफी सर्व्हेलियन्स पथक
·         भरारी पथक
·         चेक पोष्टसाठी पथक
·         तक्रार निवारण कक्ष
·         निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती
·         मतदार जागृती अभियान
·         मतदारांना वोटर स्लीपचे वाटप

निवडणूक होणाऱ्या नगरपरिषदा व नगरपंचायतींची नावे
टप्पा क्र. 1:
27 नोव्हेंबर 2016 रोजी मतदान होणाऱ्या नगरपरिषदा व नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे अशी: पालघर: 1) विक्रमगड (नवीन न.पं.), 2) तलासरी (नवीन न.पं.) व 3) मोखाडा (नवीन न.पं.). रायगड: 1) खोपोली, 2) उरण, 3) पेण, 4) अलिबाग, 5) मुरूड-जंजिरा, 6) रोहा, 7) श्रीवर्धन, 8) महाड, व 9) माथेरान. रत्नागिरी: 1) चिपळूण, 2) रत्नागिरी, 3) दापोली न.पं., 4) खेड व 5) राजापूर. सिंधुदुर्ग: 1) वेंगुर्ले, 2) सावंतवाडी, 3) मालवण व 4) देवगड-जामसांडे (नवीन न.पं.). सोलापूर: 1) बार्शी, 2) पंढरपूर, 3) अक्कलकोट, 4) करमाळा, 5) कुर्डूवाडी, 6) सांगोला, 7) मंगळवेढा, 8) मैंदर्गी व 9) दुधनी. कोल्हापूर: 1) इचलकरंजी, 2) जयसिंगपूर, 3) मलकापूर, 4) वडगाव-कसबा, 5) कुरूंदवाड, 6) कागल, 7) मुरगुड, 8) गडहिंग्लज व 9) पन्हाळा. सांगली: 1) इस्लामपूर, 2) विटा, 3) आष्टा, 4) तासगाव, 5) कवठे-महाकाळ (नवीन न.पं.), 6) कडेगाव (नवीन न.पं.) 7) खानापूर (नवीन न.पं.), 8) शिरोळा (नवीन न.पं.) व 9) पलूस (नवीन नगर परिषद). सातारा: 1) सातारा, 2) फलटण, 3) कराड, 4) वाई, 5) म्हसवड, 6) रहिमतपूर, 7) महाबळेश्वर, 8) पाचगणी, 9) कोरेगाव (नवीन न.पं.), 10) मेढा (नवीन न.पं.), 11) पाटण (नवीन न.पं.), 12) वडूज (नवीन न.पं.), 13) खंडाळा (नवीन न.पं.)  व 14) दहिवडी (नवीन न.पं.). नाशिक: 1) मनमाड, 2) सिन्नर, 3) येवला, 4) सटाणा, 5) नांदगाव व 6) भगूर. अहमदनगर: 1) संगमनेर, 2) कोपरगाव, 3) श्रीरामपूर, 4) शिर्डी, 5) रहाता, 6) पाथर्डी, 7) राहुरी व 8) देवळाली प्रवरा. नंदुरबार: 1) शहादा. धुळे: 1) शिरपूर-वरवाडे व 2) दोंडाईचा-वरवाडे. जळगाव: 1) भुसावळ, 2) चोपडा, 3) अंमळनेर, 4) चाळीसगाव, 5) पाचोरा, 6) यावल, 7) फैजपूर, 8) सावदा, 9) रावेर, 10) एरंडोल, 11) धरणगाव, 12) पारोळा व 13) बोदवड (नवीन न.पं.). जालना: 1) जालना, 2) भोकरदन, 3) अंबड व 4) परतूर. परभणी: 1) गंगाखेड, 2) सेलू, 3) जिंतूर, 4) मानवत, 5) पाथरी, 6) सोनपेठ व 7) पूर्णा. हिंगोली: 1) हिंगोली, 2) बसमतनगर व 3) कळमनुरी. बीड: 1) बीड, 2) माजलगाव, 3) परळी-वैजनाथ, 4) अंबेजोगाई, 5) गेवराई व 6) धारूर. उस्मानाबाद: 1) उस्मानाबाद, 2) परांडा, 3) भूम, 4) कळंब, 5) तुळजापूर, 6) नळदुर्ग, 7) मुरूम व 8) उमरगा. यवतमाळ: 1) यवतमाळ, 2) दिग्रस, 3) पुसद, 4) उमरखेड, 5) वणी, 6) घाटंजी, 7) आर्णी व 8) दारव्हा. अकोला: 1) अकोट, 2) बाळापूर, 3) मूर्तिजापूर, 4) तेल्हारा व 5) पातूर. वाशीम: 1) कारंजा, 2) वाशीम व 3) मंगरूळपीर. अमरावती: 1) अचलपूर, 2) अंजनगावसूर्जी, 3) वरूड, 4) चांदुरबाजार, 5) मोर्शी, 6) शेंदुरजनाघाट, 7) दर्यापूर, 8) चांदूर रेल्वे व 9) धामणगाव. बुलडाणा: 1) शेगाव, 2) नांदुरा, 3) मलकापूर, 4) खामगाव, 5) मेहकर, 6) चिखली, 7) बुलडाणा, 8)  जळगाव-जामोद व 9) देऊळगाव राजा. वर्धा: 1) वर्धा, 2) हिंगणघाट, 3) आर्वी, 4) सिंदी, 5) पुलगांव व 6) देवळी. चंद्रपूर: 1) बल्लारपूर, 2) वरोरा, 3) मूल, 4) राजुरा व 5) सिंदेवाही (नवीन न.पं.) (एकूण 147 नगरपरिषदा व 18 नगरपंचायती).
टप्पा क्र. 2:
14 डिसेंबर 2016 रोजी मतदान होणाऱ्या नगरपरिषदांची जिल्हानिहाय नावे अशी: पुणे: 1) बारामती, 2) लोणावळा, 3) दौड, 4) तळेगाव-दाभाडे, 5) आळंदी, 6) इंदापूर, 7) जेजुरी, 8) जुन्नर, 9) सासवड व 10) शिरूर. लातूर: 1) उदगीर, 2) औसा, 3) निलंगा व 4) अहमदपूर. (एकूण 14 नगरपरिषदा).
टप्पा क्र. 3: 
18 डिसेंबर 2016 रोजी मतदान होणाऱ्या नगरपरिषदा व नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे अशी: औरंगाबाद: 1) वैजापूर, 2) कन्नड, 3) पैठण, 4) गंगापूर व 5) खुल्ताबाद. नांदेड: 1) धर्माबाद, 2) उमरी, 3) हदगाव, 4) मुखेड, 5) बिलोली, 6) कंधार, 7) कुंडलवाडी, 8) मुदखेड, 9) देगलूर, 10) अर्धापूर (न.पं.) व 11) माहूर (न.पं.). भंडारा: 1) पवनी, 2) भंडारा, 3) तुमसर व 4) साकोली (नवीन न.पं.). गडचिरोली: 1) गडचिरोली व 2) देसाईगंज (एकूण 20 नगरपरिषदा व 2 नगरपंचायती).
टप्पा क्र. 4:
8 जानेवारी 2017 रोजी मतदान होणाऱ्या नगरपरिषदांची जिल्हानिहाय नावे अशी: नागपूर: 1) कामटी, 2) उमरेड, 3) काटोल, 4) कळमेश्वर, 5) मोहपा, 6) रामटेक, 7) नरखेड, 8) खापा व 9) सावनेर. गोंदिया: 1) तिरोरा व 2) गोंदिया (एकूण 11 नगरपरिषदा).

०-०-०