Saturday 15 October 2016

दिंडी चालली चालली

दिंडी चालली चालली...
          समाजात वाचनसंस्कृती रुजविण्यात ग्रंथालयांची मोलाची भूमिका आहे. ग्रंथालयांच्या माध्यमातून विविध देश, प्रांत, संस्कृती आणि समाजातील नवनवीन विचार वाचकांपर्यंत पोहोचविले जातात. ग्रंथालय ही केवळ एक ग्रंथ उपलब्ध करून देणारी इमारत नसते, तर ते सांस्कृतिक चळवळीचे केंद्र असते. राज्यातील अनेक ग्रंथालयांनी आपल्या कार्यातून हे सिद्ध केले आहे. वाचन संस्कृतीची पताका खांद्यावर घेऊन ही दिंडी गेल्या अनेक वर्षापासून अव्याहतपणे सुरू आहे.
          अमेरिकेतील माहितीशास्त्राचे तज्ज्ञ जेस्सी शेरा यांनी ग्रंथालयांना ‘सांस्कृतिक परिपक्वतेची निर्मिती’ असे म्हटले आहे. सुसंस्कृत समाजाद्वारे समाजाच्या वैचारिक भरणपोषणासाठी उभारण्यात येणारे ग्रंथालय मूल्य आणि विचारांना समाजमनावर बिंबविण्याचे काम करीत असते. नव्या युगाकडे झेप घेणाऱ्यांसाठी पंखात बळ आणण्याचे केंद्र म्हणूनदेखील ग्रंथालये काम करीत असतात.
          ग्रंथालयाचे महत्व विषद करताना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक एस.आर. रंगनाथन यांनी ‘ग्रंथालयात भौतिक समृद्धी, मानसिक समाधान आणि  आध्यात्मिक आनंद देण्याचे सामर्थ्य असते, ती प्रत्येकाला स्वयंअध्ययनाची साधने उपलब्ध करून देणारी सामाजिक संस्था असते’ असे ग्रंथालयाचे सुंदर वर्णन केले आहे. वस्तुस्थितीदेखील तशीच आहेत. समाजात ग्रंथालयात अभ्यास करून प्रतिकूल परिस्थितीतून पुढे गेलेल्या अनेक व्यक्ती आहेत. ज्यांच्या जन्मदिनी ‘वाचन प्रेरणा दिवस’ साजरा होत आहे असे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.जी.जे. अब्दुल कलाम यांनीदेखील ग्रंथालयाचे महत्व वेळोवेळी मांडले आहे.
          युनेस्कोने 1949 मध्ये जाहीर जाहीर केलेल्या सार्वजनिक ग्रंथालांबाबतच्या घोषणापत्रात  सार्वजनिक ग्रंथालयांचे ‘शिक्षण, संस्कृती आणि माहितीसाठी ऊर्जादायी केंद्र तसेच जनता व राष्ट्रात शांतता आणि समन्वय जोपासणारा दुवा’ असे वर्णन केले आहे. केवळ वाचन चळवळ पुढे न नेता समाज घडविण्याच्या प्रक्रीयेत ग्रंथालयांचे विशेष असे महत्व आहे.
 भारतात सहाव्या शतकापासून नालंदा, तक्षशिला अशा‍ विद्यापीठात हस्तलिखित ग्रंथांचा संग्रह असल्याचे संदर्भ आहेत. ब्रिटीश काळात आणि स्वातंत्र्यानंतरही ग्रंथालयांच्या विकासासाठी अनेक निर्णय घेण्यात आले. राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान आणि नॅशन बुक ट्रस्ट या संस्थांनी ग्रंथ प्रसारात आणि ग्रंथालय चळवळीच्या विकासात महत्वाची भूमीका अदा केली आहे.
राज्यात सार्वजनिक ग्रंथालयांच्या सुनियोजित व्यवस्थापनासाठी 2 मे 1968 मध्ये ग्रंथालय संचालनालयाची स्थापना करण्यात आली. राज्यात  43 शासकीय ग्रंथालये आज विविध भागात कार्यरत आहेत. मार्च अखेर 12 हजारावर सार्वजनिक ग्रंथालयांना मान्यता देण्यात आली आहे. त्यातील 329 ‘अ’ वर्ग, 2068 ‘ब’ वर्ग आणि इतर ‘क’ तसेच ‘ड’ वर्ग ग्रंथालये आहेत. विवधि संशोधन संस्थांच्या 37 ग्रंथालयांचादेखील यात समावेश आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागापर्यंत ही चळवळ पोहोचली आहे.
ग्रंथालयातील मुक्तद्वार कक्ष आणि अभ्यासिका युवावर्गासाठी विशेष उपयुक्त ठरल्या आहेत. काही ग्रंथालयांनी व्याख्यानमाला आणि विविध साहित्यिक उपक्रमाद्वारे समाजात वाचनाची गोडी निर्माण करण्याचे कार्य केले आहे. विविध वयोगटाची अभिरूची लक्षात घेऊन आपली दालने समृद्ध करण्याचे प्रयत्नही होताना दिसतात. शासनाकडून मान्यताप्राप्त ग्रंथालयांना अनुदानही दिले जाते. मात्र त्याचबरोबर समाजातून या चळवळीला सहकार्य मिळणे तेवढेच महत्वाचे आहे.
आज  राज्यभरात ‘वाचन प्रेरणा दिवस’ साजरा केला जात आहे. यानिमित्ताने आपल्याकडील किमान एक पुस्तक ग्रंथालयास भेट म्हणून दिल्यास वाचन आणि ग्रंथालय चळवळीसाठी ते उपयुक्त ठरेल. विशेषत: ग्रामीण भागातील लहान ग्रंथालयांना नव्या विचारांचे ग्रंथ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. या भागातील नव्या पिढीत उंच भरारी घेण्याची इच्छा आहे. त्यांच्या आकांक्षेला प्रेरक ठरणारे नवे विचार, नवे ज्ञान या भागातील ग्रंथालयाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पेाहोचणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा ग्रंथालयांना शहरी भागातील वाचकांनी आपल्याकडील चांगली वाचलेली पुस्तके या दिवसाच्या निमित्ताने भेट दिल्यास या चळवळीत आपले मोलाचे योगदान होईल.
शहरी भागातील ग्रंथालयांनीदेखील ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थ्यांच्या भेट, त्यांच्यासाठी पुस्तकपेढी योजना असे काही उपक्रम राबविल्यास त्याचाही उपयोग होऊ शकेल. नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानने राबविलेले ‘ग्रंथ आपल्या दारी’ आणि ‘बोलकी पुस्तके’ असे उपक्रम वाचनाची अभिरुची वाढविण्यासाठी महत्वाचे आहेत. 175 वर्षाचा वैभवशाली वारसा असलेल्या सार्वजनिक वाचनालयामार्फत अनेक सांस्कृतिक आयोजित करण्यात येतात. अशा उपक्रमातूनच वाचनसंस्कृती आणखी पुढे नेणे शक्य होईल. वाढदिवसाला ग्रंथालयांना पुस्तक भेट देणे, आवडत्या व्यक्तीच्या स्मरणार्थ ग्रंथालयात एखादे दालन उभे करणे आदी माध्यमातूनदेखील ही चळवळ गतीमान करणे शक्य आहे.
नव्या युगातील ज्ञानाधारीत व्यवस्थेत ज्ञानवान आणि तेवढाच सुजाण नागरिक घडविल्यासच तो स्पर्धेला सक्षमपणे सामोरा जाऊ शकेल. नव्या पिढीपर्यंत ग्रंथालयाच्या माध्यमातून ज्ञानगंगा पोहोचविल्यासच हे शक्य आहे. ग्रंथांच्या माध्यमातून त्याच्यात नव्या जाणिवा, आकांक्षा आणि प्रेरणा निर्माण करणे गरजेचे आहे. डॉ.कलाम यांनी म्हटल्याप्रमाणे मुलांचे संगोपन ज्ञानपूरक वातावरणात करणे आवश्यक आहे. तसे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. आज त्यांच्या जन्मदिनी साजरा होणाऱ्या ‘वाचन प्रेरणा दिना’च्या निमित्ताने यासाठी जमेल ते योगदान देत ही दिंडी पुढे नेऊ या!

          -डॉ. किरण मोघे 

No comments:

Post a Comment