Saturday 1 October 2016

शेत बहरले...

शेत बहरले...
शेतीला सिंचनाची सुविधा करण्यासाठी नवनाथ कवडे यांनी  मागेल त्याला शेततळे योजनेतून शेततळ्याची निर्मिती केली आहे. शेततळ्यामुळे शेतील पाणी उपलब्ध झाले असून उत्पादन वाढून  कवडे यांच्या  आर्थिक स्थितीत सुधारणा झाली आहे.

          नवनाथ कवडे यांनी शासनाच्या मागेल त्याला शेततळे योजनेतून चांदवड तालुक्यात असलेल्या वाकी बु. या लहानशा गावात शेततळ्याची उभारणी केली आहे.  शेततळे तयार होण्यापूर्वी पाणीटंचाईमुळे त्यांनी रब्बी हंगामात पीके घेताना अडचणी येत होत्या. तसेच खरीपातही दुष्काळामुळे उत्पादनावर परिणाम होत असे.  शेतातले सर्व उत्पादन निसर्गावर अवलंबून होते. पावसाच्या अनिश्चिततेमुळे अनेकदा आर्थिक नुकसानही सहन करावे लगे.

 त्यांना शेततळ्यासाठी कृषि विभागाकडून 50 हजाराचे अनुदान देण्यात मिळाले.  या अनुदानातून त्यांनी 160 बाय 100 आकारात शेततळे तयार केले. शेततळ्यात 40 लाख लिटर एवढा पाणीसाठा झाला आहे. त्याशिवाय पाणी जीरत असल्याने शेतातील वहिरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी पाण्याच्या अभावाने केवळ 30 टक्के उत्पादन घेता आले मात्र यावर्षी पाण्याच्या उपलब्धतेमुळे उत्पादनात वाढ झाली आहे.

शासनाने सुरू केलेल्या या योजनेमुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. पाण्याची चिंता दूर झाल्याने शेतात उत्पादन वाढविण्यासाठी प्रयोग करता येतील. त्याचा आर्थिक फायदाही मिळू शकेल.-नवनाथ कवडे

उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी फेब्रुवारी 2016 मध्ये शासनाने  ”मागेल त्याला शेततळे” योजनेस मंजूरी दिली. नाशिक जिल्ह्यात या योजनेस चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शेततळ्यांपासून मिळणाऱ्या लाभामुळे अनेक शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्सुक आहेत.

  चांदवड तालुक्यात 315 शेततळ्याचे प्रस्ताव मंजूर झाले असून  137 लाभर्थ्यांना 50 हजार प्रमाणे अनुदान प्राप्त झाले आहेत. एकूण 286 शेतकऱ्यांना शेततळ्यांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहे. तालुक्यात विशेषत: कांदा, टोमॅटो आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा विशेष लाभ होणार आहे. त्यामुळेच  योजनेचे शेतकरी वर्गातून स्वागत केले जात आहे.  

No comments:

Post a Comment