Tuesday 25 October 2016

जिल्हा क्रीडा सप्ताह

डिसेंबरमध्ये जिल्हा क्रीडा सप्ताहाचे आयोजन

नाशिक, दि.25- जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा परीषद आणि विविध क्रीडा संघटनांच्या संयुक्त विद्यमाने डिसेंबर अखेर जिल्हा क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे.
क्रीडा सप्ताहाची रुपरेषा ठरविण्यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस सहाय्यक जिल्हाधिकारी विनय गौडा, क्रीडा उपसंचालक डॉ.जयप्रकाश दुबळे, डॉ.भीष्मराज बाम, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस, नरेंद्र छाजेड, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, प्रशिक्षक विजयेंद्र सिंग आदी उपस्थित होते.

क्रीडा सप्ताहांतर्गत विविध क्रीडा प्रकारात अधिका‍धिक नागरिक सहभागी होण्यासाठी क्रीडा संघटनांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. यावर्षी क्रीडा महोत्सवाच्या स्वरुपात आयोजन करण्यात येऊन पुढील वर्षी स्पर्धा स्वरुपात आयोजन करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.

विविध क्रीडा संघटनांना एकत्र आणून जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी या सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. सप्ताहांतर्गत 10 किमी धावणे, सायकलींग, हेरीटेज वॉक आदि विविध क्रीडा प्रकार आयोजित करण्यात येणार आहेत. स्पर्धा पुर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
 स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करावी आणि प्रत्येक क्रीडा संघटनांचे दोन प्रतिनिधींचा समावेश असलेल्या समितीने तातडीने कार्यक्रमाची रुपरेषा अंतिम करावी, अशा सुचना श्री.राधाकृष्णन यांनी दिल्या.
                  बोधचिन्ह व शिर्षकासाठी स्पर्धा जाहीर
        क्रीडा सप्ताहाचे अधिकृत बोधचिन्ह (लोगो) आणि शिर्षक स्पर्धेच्या माध्यमातून निश्चित करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी आपल्या प्रवेशिका जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात 15 नोव्हेंबर 2016 पर्यंत सादर करावेत. सर्वोत्तम बोधचिन्ह आणि शिर्षकाचा उपयोग क्रीडा सप्ताहासाठी करण्यात येणार असून विजेत्याला सन्मानित करण्यात येणार आहे. सर्व वयोगटातील इच्छुकांसाठी स्पर्धा खुली आहे.
क्रीडा परिषदेची बैठक संपन्न
        जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा स्पर्धेची बैठक संपन्न झाली. बैठकीत यावर्षी होणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली. राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरील एखादी स्पर्धा जिल्हा क्रीडा सप्ताहाच्यावेळी आयोजित करणे शक्य असल्यास त्यादृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
        यावर्षी नाशिक येथे राज्यस्तर जलतरण स्पर्धेचे आयोजन 3 ते 7 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. त्याचबरोबर टेबल टेनिस राज्यस्तर, राष्ट्रीय स्तर मैदानी स्पर्धा आणि बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजनदेखील नाशिक येथे होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
        गतवर्षी शालेय स्पर्धेतील विविध 82, राजीव गांधी खेल अभियान अंतर्गत 10 आणि महिला स्पर्धेंतर्गत 12 क्रीडा प्रकार मिळून जिल्ह्यातील 52 हजार 711 खेळाडू  सहभागी झाले होते. यावर्षी आतापर्यंत 55 हजार खेळाडुंची नोंदणी झाली आहे, अशी माहिती श्री.सबनीस यांनी दिली.
                                        000000

                                                000000

          

No comments:

Post a Comment