Thursday 3 November 2016

प्रधानमंत्री पीक विमा योजना

                         प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन           
                नाशिक दि.3 :- शासनाने रबी हंगाम 2016-17 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतलेला असून या योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग होण्याची अंतिम मुदत राज्यातील सर्व अधिसुचित पिकांकरिता 31 डिसेंबर 2016 अशी आहे.
            कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा बंधनकारक, तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांचा विमा हप्ता बँकेमार्फत भरला जाईल. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विहीत केलेल्या अर्जासह विमा हप्ता विहित कालावधीमध्ये बचत खाते असलेल्या बँकेच्या शाखेमध्ये भरावा लागणार आहे.
            योजनेअंतर्गत गहू बागायतसाठी विमा संरक्षित रक्कम 33 हजार रुपये, गहू जिरायतसाठी 30 हजार रुपये, ज्वारी बागायतसाठी 26 हजार रुपये, ज्वारी जिरायत आणि हरभरासाठी 24 हजार  रुपये, करडई  आणि सुर्यफूलसाठी 22 हजार  रुपये, उन्हाळी भातसाठी 51 हजार  रुपये, उन्हाळी भूईमूगसाठी 36 हजार रुपये, रबी कांदासाठी विमा संरक्षित रक्कम 60 हजार  रुपये आहे.
पिकनिहाय विमा हप्ता दर व विमा हप्ता अनुदार या योजनेअंतर्गत आकारले जाणार आहे. विमा हप्ता दर हा वास्तवदर्शी दराने आकारला जाणार आहे. अन्नधान्य व गळीत धान्य पिकांसाठी शेतकऱ्यांनी विमा सरंक्षीत रक्कमेच्या 1.5 टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जे कमी असेल ते, आणि कांद्यासाठी विमा सरंक्षीत रक्कमेच्या 5 टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जे कमी असेल तेवढा विमा हप्ता भरावयाचा आहे.
            या योजनेअंतर्गत निश्चित करण्यात आलेला पिक निहाय प्रति हेक्टरी विमा हप्ता दर व शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात भरावयाचा विमा हप्ता यामधील फरक हा सर्वसाधारण विमा हप्ता अनुदान समजण्यात येईल आणि हे अनुदान केंद्र व राज्य शासनामार्फत समप्रमाणात दिले जाईल.
            अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके घेणारे (कुळाने अगर भाडेपटटीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. योजनेअंतर्गत 70 टक्के जोखिमस्तर देय आहे.
            प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत राज्यातील सर्व अधिसुचित पिकांकरिता 31 डिसेंबर असून  जास्तीत जास्त संख्येने शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे.  त्याकरिता तात्काळ नजीकच्या विभागीय कृषि सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालय, जवळील बँक  तसेच संबंधीत विमा कंपनीशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक यांनी केले आहे.

                                                                        …..

No comments:

Post a Comment