Thursday 10 November 2016

मालेगाव शहर स्वच्छता अभियान

मालेगाव शहर स्वच्छता अभियानात नागरिकांनी सहभागी व्हावे-जिल्हाधिकारी

          नाशिक दि.10 :-  स्वच्छ भारत अभियानांतर्गत येत्या 8 डिसेंबर रोजी मालेगाव शहर स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले असून त्यात नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले.
मालेगाव शहर स्वच्छता अभियानाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक  अंकुश शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर, मालेगाव मनपा आयुक्त आर.एस. जगताप, अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपायुक्त रघुनाथ गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाचा हा महत्वाचा कार्यक्रम आहे. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेसाठी काही वेळ देणे अपेक्षित आहे. त्यानुसार नाशिक येथे सतत दोन वर्षे नागरिकांच्या सहभागातून स्वच्छता मोहिम यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. स्वच्छतेत  नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी तालुकास्तरावर मोहिम आयोजित करण्यात येणार आहे. एकत्रित प्रयत्नातून जनतेपर्यंत स्वच्छतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचण्यास यामुळे मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, मालेगाव येथे होणाऱ्या मोहिमेत शेजारील तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होणार आहेत.  विविध विभागांनी सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती आठ दिवसात प्रशासनाकडे सादर करावी. महानगरपालिकेने वातावरण निर्मितीवर अधिक भर द्यावा. स्वच्छता मोहिमेच्या दिवशी वृक्षारोपणदेखील करण्यात यावे. स्थानिक नागरिक आणि सेवाभावी संस्थांनादेखील मोहिमेत सहभागी करून घ्यावे, असे निर्देश त्यांनी दिले.
श्री.शिंदे यांनी स्वच्छता मोहिमेनंतरदेखील शहरात कायमस्वरुपी स्वच्छता राहण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, अशी सुचना केली.
श्री.शंभरकर यांनी जिल्हा परिषदेतर्फे ‘स्वचछ भारत अभियान’ अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असून या अभियानातही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग राहील, अशी ग्वाही दिली.
श्री.गावडे यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित स्वच्छता उपक्रमांची माहिती देताना सुक्ष्म नियोजनासाठी आवश्यक बाबींची माहिती दिली. कचरा उचलण्यासाठी पर्याप्त सुविधा करण्याच्या सुचना त्यांनी केल्या.
श्री.स्वामी यांनी सादरीकरणाद्वारे अभियानाची माहिती दिली. स्वच्छतेसाठी लोकांचा सहभाग वाढविणे आणि शहरातील समस्या जाणून घेणे हा अभियानाचा उद्देश असून अभियानासाठी शहराची 40 विविध भागात विभागणी करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक भागाच्या स्वचछतेची जबाबदारी निश्चित समूहाकडे दिली जाणार असून त्याचे सुक्ष्म नियोजन करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
बैठकीस विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

----

No comments:

Post a Comment