Saturday 5 November 2016

कृषीथॉन 2016

                   कृषी संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचविण्याची गरज
                                                               -सदाभाऊ खोत


          नाशिक दि.5 :- शेती क्षेत्रात वेगाने बदल होत असून या क्षेत्रातील संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचविण्याची गरज आहे, असे मत कृषी आणि फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.
कृषीथॉन 2016’ या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या प्रसिद्धीसाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषी विकास अधिकारी हेमंत काळे, जिल्हा ॲग्रोडिलर्स संघटनेचे अध्यक्ष दिपक पगार, संजय न्याहारकर, विजूनाना पाटील आदी उपस्थित होते.

श्री. खोत म्हणाले शेतीची वाटणी आणि नवी पिढी शेतीकडे वळण्यास उत्सुक नसल्याने कृषीक्षेत्र कमी होत आहे. वातावरण बदल, पाण्याची उपलब्धता, शेत मालाचे दर याचाही परिणाम या क्षेत्रावर होत आहे. त्यामुळे प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. प्रदर्शनाद्वारे नवे तंत्रज्ञान  शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्यास त्यांना प्रोत्साहन मिळून शेतकरी आत्महत्या रोखता येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बियाणे ही  शेतीसाठी  मूलभूत बाब असल्याने त्यात संशोधन करुन बदलत्या  वातावरणात टिकणाऱ्या आणि अधिक उत्पादन देणाऱ्या जाती तयार करणे आवश्यक आहे. राष्ट्रसंत तुकडोजी  महाराज  कृषी  ग्राम सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपयुक्त  माहिती देण्यासाठी लोकचळवळ उभी करण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री. खोत यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाच्या प्रसिद्धीसाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचे उद्घाटन करण्यात आले.
                  

                                ***********

No comments:

Post a Comment