Tuesday 29 November 2016

बँक खाते उघडण्यासाठी सुविधा

बँक खाते उघडण्यासाठी निमा हाऊस आणि सिन्नर एमआयडीसी येथे सुविधा
          नाशिक दि.29 :- बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक, युनिअन बँक, देना बँक, आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि बँक ऑफ इंडिया  निमा हाऊस येथे तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडियाने सिन्नर औद्योगिक क्षेत्रात 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान संघटीत आणि असंघटीत क्षेत्रातील कामगारांचे बँक खाते उघडण्यासाठी व्यवस्था केली आहे.
          केंद्र सरकारने संघटीत आणि असंघटीत क्षेत्रातील कामगारांची बँक खाती सुरू करण्याबाबत दिलेल्या सुचनांनुसार जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बँक अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध उद्योग संस्थांच्या सुमारे 45 हजार कामगारांची बँक खाती नसल्याची माहिती देण्यात आली. उपलब्ध माहितीनुसार उद्योग संस्था किंवा कारखान्यातील कामगारांचे खाते सुरू करण्यासाठी नियोजन करण्यात आले.
जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. आणि अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अशोक चव्हाण यांनी इएसआयसी (कर्मचारी राज्य बीमा निगम) आणि निमा कार्यालयाला भेट दिली. बँक ऑफ महाराष्ट्रने सातपूर आणि अंबड येथील इएसआयसी कार्यालयात दोन काऊंटर सुरू केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार श्री.चव्हाण यांनी निमाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून बँक काऊंटर सुरू करण्याचे नियोजन केले आहे.
बँक खाते सुरू करू इच्छिणाऱ्यांनी आधार कार्ड आणि ओळखपत्राची सत्यप्रतीसह तीन  फोटो सोबत आणावेत. दुपारी 12 ते सायंकाळी 8 या वेळेत कामगारांनी सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँक आणि निमातर्फे करण्यात आले आहे.

----

No comments:

Post a Comment