Friday 4 November 2016

कृषि प्रदर्शन

                   नव्या तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी कृषि प्रदर्शन उपयुक्त-दादाजी भुसे
       नाशिक दि- 4 : शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक आणि दर्जेदार उत्पादन करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची माहिती देणे आवश्यक असून त्यासाठी कृषि प्रदर्शन उपयुक्त ठरेल, असा विश्वास ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.

  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे सकाळ माध्यम समुह आणि विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेतील कृषि प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या वेळी खासदार हेमंत गोडसे, वनाधिपती विनायकदादा पाटील, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, सकाळचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, आत्माचे प्रमोद वानखेडकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तुकाराम जगताप, उपजिल्हाधिकारी सुरेखा चव्हाण आदी उपस्थित होते.

  वातावरण बदलाचे शेती समोर मोठे आव्हान असून त्याबाबत परिषदेच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना योग्य दिशा मिळेल, असेही श्री भुसे म्हणाले. त्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन विविध दालनांची माहिती घेतली.

          श्री. पाटील म्हणाले शासन साकारात्मकदृष्टिने शेतीकडे पाहात आहे.  देशात कृषि क्षेत्रात वेगाने क्रांती होत असून उपलब्ध पाण्यात अधिक उत्पन्न देण्यासाठी फळबागा हा चांगला पर्याय आहे.  या पार्श्वभुमीवर परिषदेचे आयोजन महत्वाचे आणि तेवढेच मार्गदर्शक आहे.

          खासदार गोडसे यांनी कृषि क्षेत्रात अनुकूल बदल घडवुन आण्यासाठी फलोत्पादन परिषद मार्गदर्शक असल्याचे सांगितले.
          कृषि प्रदर्शनात जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आदीसह विविध माहितीपूर्ण दालने आहेत. या दालनाद्वारे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे.

                                                          ******

No comments:

Post a Comment