Saturday 5 November 2016

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

        देशाच्या विकासासाठी पायाभुत सुविधांचा विकास आवश्यक
                                                                                    -नितीन गडकरी

       नाशिक दि- 5 :, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभुत सुविधांचा विकास आवश्यक असून त्यासाठी केंन्द्र सरकार विशेष प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन केन्द्रीय रस्ते वाहतुक, महामार्ग आणि पोत मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

       के.के.वाघ महाविद्यालय येथे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण(रस्ते वाहतुक आणि राज मार्ग मंत्रालय) तर्फे आयोजित नाशिक परिक्षेत्रातील विविध कामांच्या कोनशीला समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार हरिशचंद्र चव्हाण, हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, नरहरी झिरवाळ, सीमा हिरे, स्नेहलता कोल्हे, डॉ.राहुलआहेर, अपूर्व हिरे, महापौर अशोक मुर्तडक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य महाव्यवस्थापक अतुलकुमार आदि उपस्थित होते.

          श्री. गडकरी म्हणाले, विविध भागाना जोडणारे रस्त्यांमुळे समृद्धी येते.  त्यामुळे देशातील 96 हजार किलोमीटरचे महामार्ग 2 लाख किलोमीटरपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून 12 द्रुतगती मार्ग तयार करण्यात येणार आहे. औद्योगिकरण झपाट्याने वाढत असल्याने हे महामार्ग उपयुक्त ठरतील, असे त्यांनी सांगितले. 

          देशात अपघातामुळे अनेकांना जीव गमवावा लागत असल्याबाबत खंत व्यक्त करुन श्री. गडकरी म्हणाले, अनेकदा रोड इंजिनियरींग मधील चुकांमुळे अपघातांचे स्थळ निर्माण होतात. त्यात सुधारणा करण्याची सरकारची जबाबदारी आहे.  अधिकाऱ्यांना त्यादृष्टिने सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र त्याच बरोबर नागरिकानादेखील कायद्याबद्दल सन्मान आणि भीती असणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

          तंत्रज्ञानात वेगाने बदल होत असून तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग केल्यास अधिक वेगाने विकास करता येईल. पोत मंत्रालयातर्फे इंदोर-मनमाड-ईगतपुरी-जेएनपीटी असा रेल्वे मार्ग विकसित करण्यात येणार असल्याने औद्योगिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी केला. नाशिक प्रगतीशील जिल्हा असून येथील यशस्वी शेतकऱ्यांनी द्राक्षाची जगभरात निर्यात करण्यासाठी प्रयत्न करावेत. केंद्र सरकारतर्फे त्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

खासदार चव्हाण आणि खासदार गोडसे यांनी महामार्गाच्या कामांमुळे वाहतुकीची समस्या दूर होईल, असा विश्वास व्यक्त केला. आमदार सानप यांनी शहरातील वाहतुकीची समस्या दूर करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे महामार्गाची विविध कामे करण्यात येत असल्याचे सांगितले.

प्रास्ताविकात श्री.अतुलकुमार यांनी राष्ट्रीय महामार्ग क्र.3 वरील चिंचखेड जंक्शन-पिंपळगाव येथे तीन उड्डाणपुलाचे निर्माण, ओझर येथील गदाख कॉर्नर आणि साईखेडा जंक्शन येथे उड्डाणपुलाचे बांधकाम, के.के.वाघ कॉलेज ते जत्रा हॉटेल उड्डाणपुल/ एलेव्हेटेड स्ट्रक्चर चे निर्माण, विल्होळी येथे व्हीयुपी आणि पीयूपीचे निर्माण, नाशिक शहरात भुयारी पादचारी मार्ग आदी रस्ता सुरक्षा कामे आणि गोदावरी नदीवरील पुलाची पुन्हा बांधणी करणे आदि विविध कामे हाती घेण्यात येत असल्याचे सांगितले.

                                                                        ****

No comments:

Post a Comment