Tuesday 18 October 2016

निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी

निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी
                                  -राधाकृष्णन बी.

नाशिक, दि.18-राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील सहा नगर परिषदांच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर केल्याने संपूर्ण जिल्ह्यात निवडणूक आदर्श आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिले.
          जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर, अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, दिलीप स्वामी, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी गंगाधरन, मंजू लक्ष्मी, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे आदी उपस्थित होते.
          श्री.राधाकृष्णन म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणे आदर्श आचारसंहितेची अंमजबजावणी करण्याबाबत आयोगाच्या स्पष्ट सुचना आहेत. त्यानुसार निवडणुका निर्भय आणि शांततेच्या वातारणात पार पाडल्या जातील याची दक्षता निवडणूक अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी घ्यावी.
 निवडणुकांसाठी मतदारसंघातील प्रत्येक प्रभागाला भेट देऊन सुक्ष्म नियोजन करावे. निवडणुकांच्यादृष्टीने आवश्यक पथके तयार करावीत. मतदार जागृतीवर विशेष भर देण्यात यावा. नगर परिषदेच्या ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापीत करण्यात यावा. आदर्श आचारसंहिता 28 नोव्हेंबर पर्यंत लागू राहील, अशी माहिती  त्यांनी दिली. विविध यंत्रणांचे अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांनी बैठक घेऊन अधिनस्त अधिकाऱ्यांना आदर्श आचारसंहितेच्या पालनाबाबत माहिती द्यावी, असेही श्री.राधाकृष्णन यांनी सांगितले.
कोणत्याही प्रकारची सभास्थळ अथवा इतर कोणत्याही  परवानगी देताना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य आणि सर्व उमेदवारांना समान न्याय या तत्वाचे पालन करण्यात यावे. धार्मिक स्थळाच्या ठिकाणी आणि रात्री दहा वाजेनंतर सभांना परवानगी देऊ नये. महामंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था, बाजार समिती आदींकडील पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेली वाहने ताब्यात घेण्यात यावीत. प्रचार सभा किंवा जाहिरातीतून सामाजिक तेढ निर्माण करणारे संदेश प्रसारीत होणार नाहीत यावर बारीक लक्ष द्यावे. शासकीय विश्रामगृहाचा उपयोग राजकीय बैठकासांठी करता येणार नाही, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी श्री.बगाटे, श्री.स्वामी, श्री.खेडकर आणि श्री.मंगरुळे यांनीदेखील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगर परिषदांचे मुख्याधिकारी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
----


No comments:

Post a Comment