Monday 3 October 2016

ग्रंथालय कार्यशाळा

सार्वजनिक ग्रंथालयांनी तंत्रज्ञानाच्या वापरावर भर द्यावा-सोमेन सरकार

नाशिक, दि.3-नव्या पिढीला ग्रंथालयाकडे आकर्षित करून ग्रंथालय चळवळीला अधिक व्यापक करण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांनी तंत्रज्ञानाच्या वापरावर भर द्यावा, असे आवाहन  राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानचे उपसंचालक सोमेन सरकार यांनी केले.
महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालय, राजा रामामोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता आणि जिल्हा ग्रंथाय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मु.श.औरंगाबादकर सभागृह येथे आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी  ते बोलत होते. यावेळी राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसंचालक पा.म.ताकटे, ग्रंथालय संचालक किरण धांडोरे, प्रतिष्ठानचे क्षेत्रीय अधिकारी अनंत वाघ, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, जिल्हा कोषागार अधिकारी विलास गांगुर्डे, डॉ.रा.शं.बालेकर, दिपांजन चटर्जी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन जोपुळे आदी उपस्थित होते.

श्री.सरकार म्हणाले, डिजीटल क्रांतीने जीवनातील सर्व क्षेत्र व्यापले आहे. ग्रंथालयांनीदेखील या तंत्रज्ञानाचा उपयोग वाढविणे आवश्यक आहे. विशेषत: नव्या पिढीतील वाचकांसाठी डिजीटल ग्रंथसंपदा आणि सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे नॅशनल व्हर्चुअल लायब्ररी, मॉडेल ग्रंथालय तयार करणे, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन तसेच आजच्या ग्रंथालयाच्या परिस्थितीबाबत सर्वेक्षण अशा चार पातळ्यांवर ग्रंथालय सक्षमीकरणाचे प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.

वाचन संस्कृती रुजविण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांची भूमीका महत्वाची असून या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांनी नव्या बदलांची माहिती करून घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानतर्फे विविध योजनांच्या माध्यमातून ग्रंथालयांना सहाय्य केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

श्री.ताकाटे म्हणाले, ग्रंथालयांनी निश्चित उद्दीष्ट समोर ठेऊन कार्य केल्यास बदलांना  यशस्वीपणे सामोरे जाणे शक्य आहे. सार्वजनिक ग्रंथालयांच्या सक्षमीकरणासाठी शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहेत. ग्रंथालयांनी परस्परात निकोप स्पर्धा केल्यास वाचकांना त्याचा लाभ होईल आणि ज्ञानवान पिढी घडविण्यात ग्रंथालयांचा मोलाचा हातभार लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  चार जिल्ह्यात जिल्हा ग्रंथालयांसाठी जागा उपलब्ध झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.


श्री.धांडोरे म्हणाले, ग्रंथालयांनी काळानुरूप बदलण्याची आवश्यकता आहे. ग्रंथालय संचलनालयातर्फे पहिल्या टप्प्यात 43 शासकीय ग्रंथालयांना डिजीटल सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यात वाय-फाय सुविधा, -ग्रंथसंपदा, -वृत्तपत्रे, किंडल, संगणक आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यानंतरच्या टप्प्यात आणि वर्ग ग्रंथालयांना डिजीटल होण्यासाठी सहाय्य करण्यात येईल. ग्रंथालयांचे सर्व प्रश्न दूर करण्यासाठी संचालनालयामार्फत प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रंथालयांनी वाचकांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध द्याव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यशाळेची सुरुवात रत्नागिरीपासून करण्यात आली असून 35 जिल्ह्यात असे आयोजन झाल्याची माहिती त्यांनी दिली.

श्री.गांगुर्डे यांनी ग्रंथ आणि ग्रंथालयाचे महत्व विषद करताना ही चळवळ पुढे नेण्यात सार्वजनिक ग्रंथालयांची भूमीका महत्वाची असल्याचे सांगितले. ग्रंथालयाशी संबंधीत अनुदान -प्रणालीद्वारे कमी कालावधीत देण्याचा जिल्हा कोषागाराचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते ग्रंथालय संदर्भातविविध योजनांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. ग्रंथालयांच्या संक्षिप्त इतिहास महत्व विषद करणारा माहितीपट यावेळी दाखविण्यात आला. कार्यशाळेत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या विविध योजनांची माहिती आणि सार्वजनिक ग्रंथालयातील अभिलेखाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाला सहाय्यक ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, आ.अ. ढोक, ग्रंथपाल क.सु.महाजन, निरीक्षक अजित पवार, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष रामचंद्र काकड, कार्यवाह दत्ता पगार यांच्यासह सार्वजनिक ग्रंथालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते. 


No comments:

Post a Comment