Saturday 15 October 2016

ग्रंथ आमुचे साथी


ग्रंथ आमुचे साथी...

           ग्रंथ आमुचे साथी...
          वाचन हा एक उत्तम संस्कार आहे. माणसाचा व्यक्तिमत्व विकास आणि एकूणच जीवनातील यशासाठी मजबूत आधार निर्माण करण्याचे कार्य वाचनाद्वारे होत असते. माणसाचा दैनंदीन व्यवहार आणि अभ्यास यातून विकसीत होणारे अनुभवक्षेत्र तसे पाहता मर्यादीतच असते. ते अधिक व्यापक करण्याचे कार्य ग्रंथ करतात. लेखकाच्या कल्पना आणि अनुभवाचा सुंदर समन्वय असणारे साहित्य वाचनाचा आनंद तर देतेच शिवाय आपल्या ज्ञानकक्षा रुंदावण्यास कारणीभूत ठरत असते.
          ‘वाचन कशासाठी’ हा विचार करताना  ज्ञानप्राप्ती हे त्याचे मुलभूत उद्दीष्ट असले तरी तेवढेसे परिपूर्ण नाही. तसे बऱ्याचदा ‘वेळ जाण्यासाठी वाचन’ ही संकल्पनाही प्रवास करताना आढळते. मात्र वाचनातून मिळणारा आनंद, हेच खरे उद्दीष्ट आहे. अंतरंगात आनंदलहरी निर्माण झाल्या तर ज्ञान मिळविणे सहज घडते, रसास्वाद घेता येतो, मनावर संस्कार शक्य होतात, एखाद्या प्रसंगाचा कल्पनाविश्वातील आनंद घेता येतो. त्यासाठी ग्रंथाची निवड आणि साहित्य प्रकारही तेवढाच महत्वाचा ठरतो. केवळ रंजनासाठी असणाऱ्या पुस्तकातून असा अनुभव येईलच याची शाश्वती नसते.
          वाचनाचे एक वैशिष्ट्य आहे, इथे भाषेचे बंधन नसते. त्यामुळे विविध संस्कृती आणि देशातील विचार आपल्यापर्यंत सहज पोहोचू शकतात. अनुवादीत साहित्य त्यासाठी उपलब्ध आहे. मराठी भाषेत समृद्ध ग्रंथसंपदा उपलब्ध आहेत. अनेक महान साहित्यिकांनी मोलाची ग्रंथसंपदा आपल्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. त्याचे वाचन तर हवेच पण त्याचबरोबर इतरही भाषेतून प्रकट होणारे समाजाचे विविध पैलू, जीवनाची विविध अंगे, संघर्ष, मुल्य आदीबाबतचे विचारही आत्मसात करणे तेवढेच महत्वाचे आहे. त्यासाठी ‘अष्टावधानी वाचन’ महत्वाचे आहे.
काय वाचावे, हा नेहमी उपस्थित केला जाणारा प्रश्न आहे. याचे उत्तर सोपे आहे, विविधांगी वाचन हवे. संत वाङ्मयापासून कोश वाङ्मयापर्यंत, बाल वाङ्मयापासून विज्ञानकथेपर्यंत,अनुवादीत साहित्य, ग्रामीण साहित्य, चरित्र, इतिहास, भाषा, कथा, कादंबरी, ललित, नियतकालिके, नाटक आणि अगदी वृत्तपत्र वाचनही तेवढेच महत्वाचे आहे. यातून प्रत्येकवेळी नव्या गोष्टींचे आकलन होत असते.
          ग्रंथांच्या सहवासात एकटेपणा कधीच जाणवत नाही. जीवनाचा प्रवास अधिक सहज करण्यासाठी, त्यातील दु:ख-वेदना बाजूला सारण्यासाठी, समस्यांवर उपाय शोधण्यासाठी ग्रंथ सहकार्य करीत असतात. चांगल्या मित्राप्रमाणे ते आपल्याला मार्गदर्शनदेखील करतात. भूतकाळातील जगाचे वर्तमानात दर्शन घडताना भविष्याची चाहूलही ग्रंथातून पहायला मिळते. चरित्रग्रंथातून जीवनाला दिशा आणि इतिहास वाचताना प्रेरणा मिळते, ललित वाङ्मयातून जीवनाचे विविध पैलू डोकावतात, प्रवासवर्णनातून जगाची  भटकंती होते, कथा-कवितेतून रंजन होते, विज्ञान ग्रंथातून नव्या युगाची स्पंदने कळतात, आध्यात्मिक ग्रंथातून मूल्याचे संस्कार होतात. एकूणच माणसात नव्या जाणिवांची निर्मिती करण्यात ग्रंथांचे महत्वाचे योगदान असते.
          अनुकूल बदल घडवून आणण्यासाठीदेखील ग्रंथवाचन महत्वाचे ठरत असते. शालेय जीवनात त्यामुळेच वाचनाला अधिक महत्व आहे. भाषेवरील प्रभुत्व, बोलण्यातील ओघ, नव्या विषयांची माहिती, उच्चारातील स्पष्टता, बोलण्यातला विश्वास, व्यापक शब्दसंग्रह आदी बाबींचा विकास वाचनामुळे होत असतो. बालवयातच व्यक्तिमत्वाला अनुकूल आकार देण्याचे कार्य वाचनामुळे होते. स्पर्धेच्या युगात आवश्यक असणारे विविध विषयांचे ज्ञान  आणि नवनवीन संदर्भ ग्रंथवाचनातून मिळत असल्याने वाचन हा शिक्षण प्रक्रीयेचा अविभाज्य घटक आहे. दुर्दैवाने डिजीटल क्रांतीच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये ही सवय कमी होत चालली आहे.
मुलांना नेहमी भोवतालच्या जगाचा अभ्यास करण्याचे सांगितले जाते. त्यांनी प्रत्येक गोष्ट आत्मसात करावी, अशी अपेक्षादेखील केली जाते. त्याने प्रत्येक स्पर्धेत यशस्वी व्हावे, असा हट्ट धरला जातो. मात्र त्याने जीवनातील प्रत्येक क्षेत्र काबीज करण्यासाठी ज्ञानवान आणि प्रतिभासंपन्न बनावे, असा विचार फारसा होताना दिसत नाही. त्यामुळेच की काय पुस्तकाच्या आधी त्याच्या हातात एखादे डिजीटल खेळणे दिले जाते. त्याचबरोबर त्याला जीवनाची जवळून ओळख करून देणारे आणि जीवन संघर्षाचे विविध टप्पे त्याला त्याच्या भाषेत सांगणारे एखादे पुस्तक दिले गेले तर तो डिजीटल युगातही यशस्वी ठरू शकेल, शिवाय समाजाप्रती त्याची असलेली भूमीका चांगल्याप्रकारे पार पाडण्याची प्रेरणा त्याला मिळेल.
          तंत्रज्ञान युगात पुस्तकांची जागा ई-बुकने घेतली आहे. ‘किंडल’ सारखी नवी साधने वाचनासाठी उपलब्ध झालेली आहेत. ऑनलाईन पुस्तकांनादेखील मागणी वाढते आहे. असे जरी असले तरी वाचनासाठी दिला जाणारा वेळ मात्र कमी होत असल्याचे प्रकर्षाने जाणवते. ज्ञान आणि अनुभवसंपन्न होण्यापेक्षा गुणांच्या स्पर्धेत यशस्वी होण्याचा दबावामुळे कदाचीत विद्यार्थी या आनंदानुभवापासून वंचित रहातात.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या एका व्याख्यानातील एका वाक्यात वाचनाचे महत्व लक्षात येते. ते म्हणतात, ‘पुस्तकांच्या सहवासात मला ज्ञनाबरोबर आनंदही मिळालाय. माझं ग्रंथसंग्रहालय ही माझी सर्वात मौल्यवान ठेव आहे; आणि येथे व्यतीत केलेला प्रत्येक क्षण सर्वात मौजेचा आणि समाधानाचा आहे.’ म्हणूनच असा आनंद विद्यार्थ्यांना  देण्यासाठी आणि उद्याची गुणसंपन्न तसेच सुजाण युवा पिढी घडविण्यासाठी राज्य शासनाने 15 ऑक्टोबर हा डॉ. कलाम यांचा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
                    या दिवसाच्या निमित्ताने शाळांमधून  वाचनाचे उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भेट उपक्रमांतर्गत आपल्याकडील किमान एक पुस्तक ग्रंथालय किंवा शाळेला भेट द्यावे, अशी अपेक्षा आहे. वाचून झालेली बरीच पुस्तके घरात पडून खराब होतात. अशी पुस्तके शाळेला भेट दिल्यास विद्यार्थ्यांना वाचनासाठी ती उपलब्ध होतील. या दिवसाच निमित्ताने मुलांची वाचनाकडे ओढ वाढावी, त्यांचे अवांतर वाचन वाढावे, मोबाईल, टीव्ही, संगणकाच्या युगात त्यांचा वाचनाकडे कल वाढावा, त्यातून संस्कारीत आणि ज्ञानवान पिढी निर्माण व्हावी हा या उपक्रमामागचा उद्देश आहे.
          या उपक्रमाच्या निमित्ताने ग्रंथांचे आणि वाचनाचे महत्व समजावून घ्यावे इतकेच. नव्या गोष्टींचा वेध घेणाऱ्यांनी, तशी इच्छा बाळगणाऱ्यांनी तर सवय म्हणून वाचनाचा स्विकार कराला हवाच. कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी म्हटले आहे-‘ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुचे हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या, अंधाराच्या राती’. एक नवी ऊर्जा मिळविण्यासाठी, नव्या कल्पनांचे पंख पांघरून भरारी घेण्यासाठी, निराशेच्या पलिकडला आनंद मिळविण्यासाठी ग्रंथातली ‘एक तरी  ओळ अनुभवावी’!
-डॉ. किरण मोघे 

No comments:

Post a Comment