Monday 24 October 2016

एकोणीसवी जागतिक शांतता परिषद

शिक्षणाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी व्हावा- राज्यपाल सी.विद्यासागर राव

नाशिक, दि.24- नागरिकांना शिक्षणाच्या माध्यमातून सत्याचा शोध घेण्यासाठी सक्षम करणे आणि शिक्षणाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करणे हे शैक्षणिक संस्थांचे मुख्य उद्दीष्ट असून शैक्षणिक क्षेत्रात त्या दिशेने सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्न व्हावेत, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.

इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ एज्युकेटर्स फॉर वर्ल्ड पीस आणि गोखले एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 19 व्या जागतिक शांतता परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पद्मविभुषण डॉ.अनिल काकोडकर, युजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर, गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एस.बी.पंडीत, सचिव  डॉ.एम.एस.गोसावी, प्राचार्या डॉ.दिप्ती देशपांडे, प्राचार्य व्ही.एन.सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले, विद्यापीठ आणि महाविद्यालयातून शिक्षण घेऊन मोठ्या संख्येने पदवीधर बाहेर पडत आहेत. मात्र त्यातील बहुतांशी शिक्षणाचा उपयोग समाजासाठी करताना दिसत नाहीत. या बाबीचा गांभिर्याने विचार करून नैतिक मुल्यांचीं सांगड शिक्षणाशी घालण्याबाबत गांभिर्याने विचार करणे गरजेचे आहे. राज्यातील विद्यापीठांनी शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे, संशोधनाला चालना देणे, कौशल्य विकास, अध्यापन, संशोधन तसेच प्रशासकीय पदावर महिलांचा सहभाग वाढविण्यावर भर द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

          शिक्षण क्षेत्रातील नवे प्रवाह अध्यापकांपर्यंत पोहोचविणारे अभ्यासक्रम तयार करणे आणि नाविन्यपुर्ण अध्यापन पद्धती विकसीत करणे आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठांसाठी चांगले शिक्षक तयार करूनच गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे शक्य होईल. भविष्यात गुणवत्ता नसलेल्या शैक्षणिक संस्थांचे महत्व कमी होईल आणि कदाचित त्या बंद पडण्याची शक्यता आहे.


 इंटरनेट आणि स्मार्ट फोनच्या युगात ज्ञानप्रसारासाठी डिजीटल क्लासरूम महत्वाचे आहे. अशा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामाजिक आणि आर्थिकदृष्टीने मागास घटकांना शिक्षण उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण माहिती पोहोचवली जावी. शिक्षणाद्वारे उद्योजकतेवर विशेष भर शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांचा उद्योजक होण्याकडे कल वाढावा यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्री. विद्यासागर राव यांनी केले. भारत महासत्ता होण्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील वैचारिक नेतृत्व आपल्याला विकसित करावे लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

ते म्हणाले, प्राचीन काळी अनेक ऋषीमुनींनी ‘वसुधैव कुटुंबकम्’ हे तत्वज्ञान जगाला दिले. भारतीय संस्कृतीने संपुर्ण जगाला अनेक शतके प्रभावित केले आहे. नव्या पिढीला प्रोत्साहीत करण्यासाठी मुल्याधारीत शिक्षणाच्या आधारे आपले सांस्कृतिक वैभव त्यांच्यापर्यंत पोहोचवितांना शिक्षणक्षेत्रातील प्रत्येक घटकाने आपल्या ज्ञानाचा उपयोग  समाजहित आणि मानवतेसाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.

नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे विचार समोर ठेऊन गोखले एज्युकेशन सोसायटीने चांगली वाटचाल केली आहे. आदिवासी कल्याणासाठी उच्च शिक्षणाच्या माध्यमातून संस्थेने चांगले कार्य केले आहे, असे नमूद करून पालघर जिल्ह्यात कुपोषणसारख्या समस्यांवर मात करण्यासाठी  संस्थेच्या कार्याला सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

समाजात दहशतवादाचे आव्हान असताना संपूर्ण जगाला शांततेच्या विचारांची गरज आहे. त्यासाठी ही परिषद उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चांगले शासन शैक्षणिक संस्थांसह विविध संस्थांच्या प्रयत्नातून साकार होते, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना डॉ.काकोडकर म्हणाले, विज्ञान-तंत्रज्ञान आणि अणूऊर्जा क्षेत्रात संशोधन तसेच विकासाला चालना देताना नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षणपद्धतीत बदल घडवून आणणे आवश्यक आहे.  जागतिक दर्जाचे संशोधन समाज आणि देशाच्या विकासासाठी उपयुक्त ठरणारे आहे.

आर्थिक आणि सामाजिक विचार करताना मुल्यांच्या विकासाकडे लक्ष देणे तेवढेच महत्वाचे आहे. मनुष्यबळाच्या विकासाद्वारे आर्थिक आणि सामाजिक बदल घडवून आणणे शक्य आहे. उन्नत ज्ञानाच्या आधारे असे बदल घडवून आणता येतील, असे त्यांनी सांगितले. देशात सुरक्षेचे वातावरण निर्माण करण्यासाठी जागरूक समाज निर्माण होणे महत्वाचे असल्याचे ते म्हणाले.

श्री.निगवेकर म्हणाले, तंत्रज्ञानामुळे देशा-देशातील सीमारेषा पुसट होत आहेत. प्रत्येक व्यक्ती तंत्रज्ञानामुळे परस्परांशी जोडला जातोय. अशावेळी एकविसाव्या शतकाचा बदलते चित्र पाहणाऱ्या नव्या पिढीला एकतेच्या सुत्राने परस्परांशी जोडणे महत्वाचे आहे.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते प्राचार्य टी.ए.कुलकर्णी यांचे चरित्र, महावस्त्र ऑफ महाराष्ट्र-पैठणी या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते डॉ.अनिल काकोडकर यांना ‘डॉ.एम.एस.गोसावी एक्सलन्स ॲवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. तसेच डॉ.गोसावी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री.गोसावी यांनी शांतता परिषद समाजाची गरज पुर्ण करण्याच्यादृष्टीने विद्यापीठांना मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. श्रीमती देशपांडे यांनी प्रास्ताविकात परिषदेविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाला देश-विदेशातील प्रतिनिधी, अधिकारी, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
            
            राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे नाशिक येथे स्वागत

          राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे आज त्यांच्या पत्नी श्रीमती सी.विनोधा यांचे समवेत पोलिस कवायत मैदान येथे आगमन झाले. यावेळी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी प्रशासनाच्यावतीने त्यांचे स्वागत केले.
          विशेष पोलिस महानिरीक्षक विनय कुमार चौबे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल, जिल्हा पोलिस अधिक्षक अंकुश शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर आदी यावेळी उपस्थित होते.
                                                          000000
                                                          000000

          

No comments:

Post a Comment