Sunday 9 October 2016

निखळते दुवे

निखळते दुवे...

सृष्टीतील विविधता माणसाला आनंद देणारी अशी आहे. त्यातील वन्यजीव ही निसर्गाची सुंदर देणगी आहे. मात्र वाढत्या शहरीकरणामुळे हे सृष्टीसौंदर्य नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. वन्यजीवांच्या अनेक प्रजाती लुप्त हेात आहे. या वन्यजीवांना वाचविण्यासाठी निसर्गप्रेमी प्रयत्न करीत आहेत. वन्यजीव संरक्षणाचा  एक भाग म्हणून 1 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

शासनाने वन्यजीव संरक्षणासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. सहा व्याघ्र प्रकल्प, सहा राष्ट्रीय उद्याने, 48 वन्यजीव अभयारण्ये आहेत. ताडोबा, पेंच, नवेगाव, मेळघाट या ठिकाणी व्याघ्र संरक्षण समितीची स्थापना करण्यात आली आहे. मानव वन्यप्राणी सहजीवन सुगम करण्यासाठी 322 गावात डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी जन वन योजनेची अंमजबजावणी केली जात आहे. वन्य जीव संरक्षणासाठी प्रयत्न होत असतानादेखील मानवी हस्तक्षेपामुळे काही वन्यजीव लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. पुढच्या पिढीला हे वन्यजीव पाहण्याची संधी मिळावी आणि निसर्गाच्या विविधतेचा आनंद घेता यावा यासाठी त्यांच्या संवर्धनात सर्वांचा सहभाग अपेक्षित आहे.

राजस्थान आणि पंजाबमधील बिश्नॉय समाजातील जनतेचे  वन्यजीव संरक्षणात फार मोठे योगदान आहे. स्वत: उपाशी अथवा तहानलेले राहिले तरी चालेल पण वन्यजीव जगले पाहिजे अशी या समाजाची धारणा आहे. इ.स.1485 मध्ये गुरु जम्भेश्वरजी यांनी  आदर्श जीवनाचे 29 तत्व या समाजाला सांगितले. त्यात प्राणीहत्त्या आणि वृक्षतोड ‍निषिद्ध सांगितली होती.  म्हणूनच हा समाज (बिश (20)+नॉय (9)) बिश्नॉय म्हणून ओळखला जातो. बिश्नॉय बहुल क्षेत्रात म्हणूनच हरणे, काळवीट शेतातही मुक्तपणे वावरतांना दिसतात. ‘तुमच्या जीवनापेक्षा वृक्षाचे संरक्षण जास्त महत्वाचे समजा’ असा संदेश देणाऱ्या अमृतादेवींनी ‘खेजरी’ वृक्षासाठी प्राण दिल्याची गोष्ट प्रसिद्ध आहे. ऑक्टोबर 1996 मध्ये निहालचंद बिश्नोई या युवकाने वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आपला जीव गमावला. या समाजाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सृष्टीतल्या निखळत्या दुव्यांच्या संवर्धनात प्रत्येकाचा सहभाग अपेक्षित आहे.

भारतीय माळढोक
·         आकाराने खूप मोठा, 92-122 सेंमी.
·         सर्व हंगामामध्ये मानेचा रंग करडा किंवा पांढरा, मुकुट तुरा काळा, पृष्ठभागाचा तपकिरी रंग एकसमान आणि पंखाच्या काळ्या पिसांवर पांढरे ठिपके, वरच्या पंखावर पांढऱ्या रंगाचे प्रमाण कमी.
·         नर आकाराने खूप मोठा त्यांच्या छातीवर काळा पट्टा मानेवरच्या करड्या रंगाची वलयांकित सुबक रचना वगळता मानेचा बहुतांश भाग पांढरा.
·         मादीच्या मानेवरच्या करड्या वलयांकित रचनेमुळे मानेचा रंग करडा. मादीला नरासारखा छातीला पट्टा नसतो. झुडूपे असलेल्या शुष्क गवताळ प्रदेशात दिसतो.
·         सोलापूरनजीक नाणज येथे हा पक्षी हमखास पाहावयास मिळतो.

लांबचोचीचे गिधाड
·         प्रौढ पक्ष्याचे शरीर आणि वरच्या पंखांची पिसे रेतीसारखी तपकिरी, डोके मान काळसर मानेच्या मागे खालपर्यंत विरळ पांढरा रंग, मानेच्या बुडाला पांढरी गोंड्यासारखी गळपट्टी, चोच पिवळी.
·         पृष्ठभाग आणि पुठ्ठा पांढरट.
·         कपारीत घरटी करणारा.
·         मोठ्या थव्यात राहणारा.
·         मेलेल्या प्राण्यांना खाणारा वातावरणाची स्वच्छता राखणारा.

शशकर्ण
·         वाळवंट, झुडपी खुरटे जंगल तसेच इतर रूक्ष भागात आढळणारे.
·         मांसभक्षक, दिवसा वावरणारे.
·         शरीराची लांबी- 90 सें.मी.
·         शेपटीची लांबी- 23 सें.मी.
·         मोठे डोके, कानाच्या टोकावर केसांचा पुंजका, शरीराचा रंग लालसर करडा तर खालच्या बाजूला रंग पांढरा.
·         उंदीर, घुशी लहान हरिण प्रजाती, कोल्हे, ससे, लांडोर, कबुतर यासारखे पक्षी हे मुख्य भक्ष.
·         2 ते 4 पिलांना झाडाच्या ढोलीत किंवा कडेकपारीत जन्म.
·         शारीरिक कौशल्य चपळता यामुळे पक्ष्याची शिकार उत्तमपणे करणारे, जमिनीवरील कबुतरांच्या थव्यातील 9 ते 10 पक्षी एकावेळी मारू शकणारे.
·         चित्त्याप्रमाणेच शिकारीबाबत शिक्षण देता येणारे तसेच डोळे पाय यामध्ये उत्कृष्ट सुसूत्रता लाभलेले.

चांदी अस्वल किंवा भुईअस्वल

·         अस्वलासारखा दिसणारा तशाच सवयी असलेला, भारतात सर्वत्र आढळणारा.
·         मिश्राहारी, निशाचर, सहासा जोडीने वावरणारा, वाळवंट आणि शुष्क किंवा दमट पानगळीच्या क्षेत्रात वास्तव्य, अति पर्जन्यवृष्टीचे क्षेत्र टाळणारा, डोंगराळ कडाकपारीत तसेच नदीच्या काठावर राहणारा.
·         शरीराची लांबी 60 सें.मी.       
·         शेपटीची लांबी 15 सेंमी
·         सरासरी वजन 9 कि.ग्रँ.
·         नर मादीपेक्षा वजनदार
·         डोक्यापासून शेपटीपर्यंत वरचा भाग पांढरा तर उर्वरित शरीराचा भाग काळसर.
·          पाय जाड पण आखूड, शेपटी लहान, नखे लांब बोथट
·         लहान सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, कीडे तसेच मृत प्राण्यांचे शरीर हे प्रमुख भक्ष्य, फळे मध हे खाद्य, पोल्ट्रीमध्ये घुसून नुकसान करणारे.
·         अत्यंत धाडशी, वेळप्रसंगी स्वसंरक्षणासाठी माणसावर सुध्दा हल्ला चढवणारा.

पाणमांजर
·         तळे, नाले, मोठे तलाव कालव्याच्या आसपास राहणारे, पाण्याचा स्त्रोत कमी झाल्यास जमिनीवरसुध्दा वास्तव्य, जंगलाच्या डोंगराळ भागातील बिळात लपून बसणारे.
·         अन्न पाण्याच्या शोधात खूप दूरवर जाणारे.
·         मांसभक्षक, कळपाने राहून मासेमारी करणारे.
·         शरीराची सरासरी लांबी-  70 सें.मी.
·         शेपटीची सरासरी लांबी 42.5 सें.मी
·         सरासरी वजन 9 कि.ग्रॅ.          
·         तुकतुकीत कातडी, काळसर तपकिरी रंग.
·         खेकडे मासे हे प्रमुख भक्ष्य, परंतू मासे उपलब्ध नसल्यास मारू शकेल असे कोणतेही प्राणी.
·         पिले वर्षाच्या सुरूवातीस दिसून येतात.
·         ओरिसात मासेमारी लोक मासे पकडून घेण्यासाठी याचे पालन करतात.
·         उत्तेजित झाल्यास शीळ देतात.

तणमोर

·         आकाराने लहान उंच मानेचा माळढोक कुळातला सडपातळ पक्षी.
·         विणीच्या हंगामात नराच्या डोक्यावर पळीसारखा तुरा, डोके, मान आणि अंतर्भाग काळा, अग्रपाठीवर पांढरी पट्टी, पंख मिटलेले असताना पिसांच्या पांढऱ्या रंगामुळे पांढरा पट्टा उठून दिसतो.
·         विणीचा हंगाम नसताना नर मादीसारखा दिसतो पण त्याच्या पंखांची पिसे पांढरी तर, मादी अप्रौढ पक्षाचा  रंग वाळूसारखा किंवा दालचिनीसारखा तपकिरी, त्यांच्या पृष्ठभागावर रेषांसारखी भरगच्च रचना.
·         उड्डाणपंखांच्या पिसांवर लालसर तांबूस छटा असते. गवताळ आणि शेतीच्या प्रदेशात दिसतो.
·         मादींना आकर्षित करण्यासाठी नर प्रदर्शन (डिस्प्ले) करतो. त्यावेळेस तो एकाच ठिकाणी स्थिरावून तेथेच दगड वर फेकल्यागत उडतो खाली येतो.

रोहित बिंदु मांजर

·         मोकळी गवताळ जागा किंवा जंगलातील झुडुपांमध्ये अधिवास. झाडावर चढू शकते. दर्शन दुर्मिळ.

  • साधारण मांजरापेक्षा आकाराने लहान
  • पिवळसर तपकीरी मुलायम त्वचेवर लाल आणि तपकीरी ठिपके.
  • लहान जीव आणि पक्षी हे प्रमुख खाद्य.
  • एकावेळी दोन ते तीन पिलांना जन्म देते.
वन्यजीव रक्षणाचे उपाय-
  • विविध संस्था आणि नागरिकांना निसर्गाशी जोडणे
  • वन्यजीव संरक्षणाची भावना समाजात निर्माण करणे
  • वन्यजीव आणि पर्यावरणाविषयी जनजागृतीत सातत्य ठेवणे

या प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांचे योगदान महत्त्वाचे आहे. दुर्मिळ प्रजातींबाबत वनविभागाला माहिती देणे, वन्यजीव विषयक गुन्हे रोखणे, अशा प्रकरणांचा मागोवा घेणे अशा माध्यमातून नागरिकही या प्रयत्नात आपले योगदान देवू शकतात. गुरु जम्भेश्वरजींच्या तत्वांचे अनुसरण करीत सर्व मिळून सहभाग दिल्यास सृष्टीचे हे सौंदर्य पुढील पिढीलाही अनुभवता येईल.
----


No comments:

Post a Comment