Monday 3 October 2016

जलयुक्त शिवार

अंदरसूलला जलयुक्त शिवारमुळे दुष्काळ झाला दूर
प्रशासन आणि नागरिकांच्या समन्वयातून अनेक वर्षानंतर शिवारात पाणी

नाशिक दि.3-येवला तालुक्यातील अंदरसूल गावचा मेळनाला दुथडी भरून वाहतोय. बंधावरून पाणी वाहतांना पाहून शेतकरी आनंदीत झाले आहेत. परिसरात हिरवीगार पिके उभी राहीलेली दिसतात. विहिरींना जमिनीलगत पाणी लागल्याचे चित्र परिसरात आहे. प्रशासनाचा पुढाकार आणि लोकसहभागातून जलयुक्त शिवार योजना यशस्वीपणे राबविली गेल्याने यंदाचा रब्बी हंगामही चांगला जाणार असल्याचा विश्वास शेतकऱ्यांना आहे.

येवला तालुक्यातील शेतकरी गेल्या काही वर्षात दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे. अंदरसूल गावाला तर उन्हाळ्यात टँकरशिवाय पर्याय नव्हता. पिण्याच्या पाण्याची समस्या असताना शेतीसाठी पाणी मिळणे कठीणच होते. मेळाचा नाल्यावरील जुन्या बंधाऱ्यात वर्षानुवर्षे गाळ साचल्याने फारसा पाणीसाठा होत नव्हता. बंधाऱ्याची उंची यशवंत ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत  वाढवूनही साचलेल्या गाळामुळे फारसा लाभ झाला नाही. त्यामुळे परिसरातील वाड्यांनाही तीव्र पाणीटंचाई जाणवत असेशेतकऱ्यांची सर्व भिस्त खरीपावर होती.

 ही परिस्थिती बदलण्यासाठी उपविभागीय अधिकारी वासंती माळी यांच्या मार्गदर्शनाखाली  बाजार समितीचे संचालक मकरंद सोनवणे आणि इतर ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत  जलयुक्त शिवार योजने अंतर्गत  गाळ काढण्याचे काम हाती घेतले.

कोळगंगा आणि मन्याड या दोन प्रवाहांचा मेळ होत असल्याने हा नाला मेळाचा नाला म्हणून ओळखला जातो. या नाल्याची एकूण क्षमता 42 टीसीएम होती. मात्र गाळामुळे केवळ 10 टीसीएम पाणीसाठा होत असे. जलयुक्त शिवार योजने अंतर्गत एबीबी कंपनीने सीएसआर अंतर्गत दोन पोकलॅाड यंत्र उपलब्ध करून दिले. डिझेलसाठी योजनेअंतर्गत 2.80 लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले.

नाल्याच्या 670 मीटर पात्राचे खोलीकरण आणि रुंदीकरणे करण्यात आले. गाळ काढण्यात आल्याने 32 टीसीएम पाणीसाठा वाढला. एवढ्या क्षमतेचा बंधारा बांधण्यासाठी किमान 12 लाख खर्च आला असता, असे उपअभियंता हरिश्चंद्र पवार  यांनी सांगितले.

 शेतकऱ्यांनी बंधाऱ्यातून काढलेला गाळ शेतासाठी उपयोगात आणला. या गाळाने झालेल्या भरावावर काही ठिकाणी तूर आणि भुईमुग लागवडदेखील करण्यात आली आहेकोळगंगा पात्रावर असलेल्या टेकेश्वरी बंधाऱ्याची उंची वाढवून त्याठिकाणीदेखील गाळ काढल्याने पाणी साठवण क्षमता 19.81 टीसीएमने वाढली आहे. याठिकाणी 9 दिवसात 450 मीटर नदीपात्रातील गाळ काढण्यात आला. शासनातर्फे डिझेलसाठी 2 लाख 91 हजार रुपये उपलब्ध करून देण्यात आले.

पाणीसाठा वाढल्याने परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. अंदरसूल बरोबरच गवंडगाव आणि बोकटे शिवारालाही या पाण्याचा उपयोग होणार आहे. एकूण 500 एकर शेती यामुळे बहरणार आहे. या पाण्यावर दुसरे आणि शक्य झाल्यास उन्हाळ्यात भाजीपालादेखील घेता येईल, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला. अत्ंयत कमी खर्चात मोठा पाणीसाठा उपलब्ध झाल्याने जलयुक्तशिवार योजनेचे महत्वदेखील अधोरेखित झाले आहे.
चंद्रकांत देशमुख, शेतकरी-पूर्वी पावसाच्या भरवशावर रहायचो. जलयुक्तचं  लय भारी काम झालं. आधी असं काम पाहिलं नव्हतं. कामे मस्त झाली आहेत. उन्हाळी कांदा घेणे आता शक्य होणार आहे.

वासंती माळी, उपविभागीय  अधिकारी-हे यश  लोकसहभागाचे आहे. स्थानिक नागरिकांनी खुप मेहनत घेतली. काहींनी आर्थिक योगदानही दिले. कायम दुष्काळाच्या छायेत रहाणाऱ्या या भागात आता पाणी टंचाई रहणार नाही, असा विश्वास वाटतो. अनेक वर्षानंतर गाळ काढण्याचे काम झाले आहे. प्रशासन आणि नागरिक एकत्र आले तर योजना चांगल्या पद्धतीने राबविता येते याचे अंदरसूल उत्तम उदाहरण आहे.






No comments:

Post a Comment