Wednesday 5 October 2016

महाराष्ट्र पोलीस अकादमी दीक्षांत कार्यक्रम

दीक्षांत कार्यक्रमात 237 अधिकारी पोलीस दलात दाखल
कल्पेशकुमार चव्हाणला उत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा पुरस्कार

नाशिक दि.5-महाराष्ट्र पोलीस अकादमी येथे राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्र. 114 च्या दीक्षांत संचलन समारंभात 237 अधिकारी पोलीस दलात दाखल झाले. कल्पेशकुमार चव्हाण उत्कृष्ट प्रशिक्षणार्थीसाठी देण्यात येणाऱ्यास्वॉर्ड ऑफ ऑनरपुरस्काराचा मानकरी ठरला.

यावेळी अपर पोलीस महासंचालक एस.जगन्नाथन, पोलीस अकादमीचे संचालक नवल बजाज, विशेष पोलीस महानिरीक्षक  विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल, पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे आदी उपस्थित होते.
पोलीस दलात दाखल होणाऱ्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री.माथुर म्हणाले, पोलीस दलाकडून जनतेच्या आणि शासनाच्या अपेक्षा वाढत आहेत. तसेच नवी आव्हाने समोर येत आहेत. त्याला सामोरे जाण्यासाठी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण उपयुक्त ठरेल. प्रबोधिनीत पायाभूत प्रशिक्षण घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी नवनवीन गोष्टी आत्मसात करून आपल्या ज्ञानात भर घालावी आणि सर्वोत्तम कामगिरी करीत जबाबदारी चांगल्या  पद्धतीने पार पाडावीअसे आवाहन त्यांनी केले.

प्रबोधिनीत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शासनाने प्रशिक्षणार्थींसाठी 30 टक्के प्रोत्साहन भत्ता आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या सुविधेला मान्यता दिली आहे. प्रशिक्षणात आवश्यकतेनुसार नवे विषय समाविष्ट करण्यात आले आहेत. उत्तम सुविधांमुळे लवकरच पोलीस अकादमी देशातील प्रशिक्षण देणारी अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पोलीस अधिकाऱ्यांनी त्रितपणे आणि समन्वयाने काम करीत चांगली कामगिरी करावी, असे त्यांनी सांगितले.

श्री.बजाज यांनी आपल्या संदेशात, पोलीस अधिकाऱ्यांनी मनोधैर्य कायम ठेवीत कुटुंब आणि पोलीस दलाला अभिमानास्पद अशी कामगिरी करावी, असे आवाहन केले. आपले सहकारी आणि जनतेशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवीत प्रशिक्षणाचा उपयोग पोलि दलावरील विश्वास वाढविण्यासाठी तसेच जनतेच्या संरक्षणासाठी करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पोलीस अकादमीला स्वायत्तता मिळाल्यामुळे लवकरच अन्य निमशासकीय आणि औद्योगिक संस्थांनादेखील प्रशिक्षण देणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले.

शानदार दीक्षांत संचलनात परेड कमांडर तुषार इक्के आणि सेकंड कामांडर जयेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली 6 प्लाटुन्सच्या 180 अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. सत्र क्र. 114 मध्ये 183 पुरूष आणि 54 महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे. बारा महिन्याच्या प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना कायदे विषयक, गुन्ह्यांचे तपास, अंगुलीमुद्रा विज्ञान, फॉरेन्सिक सायन्स, पोलीस ठाणे व्यवस्थापन, सार्वजनिक शांतता सुव्यवस्था राखणे, गुन्हे प्रतिबंध, सायबर गुन्हे आर्थिक गुन्ह्यांचा तपास, आदर्श पोलीस ठाणे कामकाज, संगणक आणि शारीरिक कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले.

दीक्षांत संचलनानंतर श्री.माथुर यांच्या हस्ते उत्कृष्ट प्रशिक्षणार्थींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. कल्पेषकुमार चव्हाण याला मानाच्यास्वॉर्ड ऑफ ऑनरपुरस्कारासह उत्कृष्ट अष्टपैलू प्रशिक्षणार्थीसाठी असलेल्या स्व.यशवंतराव चव्हाण सुवर्णचषक प्रदान करण्यात आला. राहूल प्रभाकर शिंदे याला कायदेविषय प्रशिक्षणासाठी डॉ.आंबेडकर चषक आणि आंतरवर्ग प्रशिक्षणासाठी सिल्व्हर बॅटन पुरस्कार प्रदान करण्यात आला. छाया भानूदास पाटील सावित्रीबाई फुले चषक आणि अहिल्याबाई होळकर चषकाची मानकरी ठरली. रविकिरण खंडारेने पीटीमध्ये उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी, ड्रीलमध्ये उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी आणि बाह्यवर्ग परिक्षेत उत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा पुरस्कार पटकाविला. याशिवाय अमोल चौधरी- क्रीमीनलॉजी आणि क्राईम विषयात उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी, संदीप काळे- कायदा सुव्यवस्था राखणे या विषयात उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी, अनिल वाघमोडे- रायफल रिव्हॉल्वर शुटींगमध्ये एन.एम.कामठे सुवर्ण चषक, संतोष राठोड- खेळात उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी, आकाश पवार- उत्कृष्ट वर्तणुकीसाठी एस.जी.इथापे पुरस्कार , राहुल थवील-सांस्कृतिक कार्यक्रमात उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी आणि अविनाश नळेगावकर याला द्वितीय उत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाला पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी आणि  प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

------

No comments:

Post a Comment