Tuesday 9 October 2018

आपत्ती निवारण प्रात्यक्षिक


आपत्ती निवारण सप्ताहाच्या निमित्ताने प्रात्यक्षिकांचे आयोजन


नाशिक, दि.9 : सकाळची साधारण अकरा वाजेची वेळ….जिल्हा परिषदेत नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असताना अचानक बंदुकीच्या फैरी झाडल्याचा आवाज…..सर्व कर्मचारी घाबरून एकमेकांकडे विचारणा करतात…ध्वनीक्षेपकावरून खुर्ची किंवा टेबलखाली बसण्याच्या सुचना दिल्या जातात…..काही वेळाने हे प्रात्यक्षिक असल्याचे कळल्यावर सर्वकाही पूर्ववत होते.

          आपत्ती निवारण सप्ताहाच्या निमित्ताने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे आयोजित प्रात्यक्षिकांचा हा प्रसंग. जिल्हा परिषद परिसरात या प्रात्यक्षिकांचे आयोजन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

          तीन आतंकवादी जिल्हा परिषद परिसरात असल्याची सुचना जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षास देण्यात आली. तात्काळ शहर पोलीस दलाला याबाबत कळविण्यात आले. त्यानुसार क्युआरटी आणि बॉम्ब शोधक पथक जिल्हा परिषदेत दाखल झाले. भद्रकाली पोलीस स्टेशनचे अधिकारी, वाहतूक पोलीस, रुग्णवाहीका आणि अग्निशमन पथकांचे सहकार्य परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मिळाले.

कर्मचाऱ्यांना पूर्वकल्पना दिली नसल्याने आपत्तीच्या वेळी द्यावयाच्या प्रतिसादाविषयी त्यांना यानिमित्ताने जाणून घेता आले. ध्वनीक्षेपकावरून त्यांनी सावधानतेच्या सुचना देण्यात आल्या. बॉम्ब्‍ शोधक पथकाने काही वेळानंतर बॉम्ब निकामी केला. आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने यावेळी प्रात्यक्षिकातील घटनांची नोंद घेतली.

          या प्रात्यक्षिकात शिघ्र कृती दल, बॉम्ब शोध पथक, आसीपी, अग्निशमन विभाग, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि बचाव पथकांनी सहभाग घेतला.
          आपत्ती निवारण सप्ताहाच्यानिमित्ताने अशा प्रात्यक्षिकांचे आयोजन करून नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यात येणार आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन आराखड्याचे योग्यप्रकारे अंमलबजावणी हेाण्याबाबतही मार्गदर्शन होणार आहे.

No comments:

Post a Comment