Friday 12 October 2018

रास्तभाव धान्य दुकानाला भेट


गैरप्रकार करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई - गिरीश बापट

       नाशिक दि. 12- रास्तभाव धान्य दुकानातून गरिबांना त्यांच्या हक्काचे धान्य योग्यप्रकारे मिळावे यासाठी शासन वितरण प्रणालीत सुधारणा करीत असून गैरप्रकार करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल] असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी केले.
         दिंडोरी तालुक्यातील ढकांबे येथे रास्तभाव धान्य दुकानाला भेटीच्या वेळी ते बोलत होते. श्री.बापट यांनी दुकानात पाहणी करुन समाधान व्यक्त केले. आदर्श संकल्पनेतील रेशन दुकान प्रामाणिकपणे चालवित असल्याबद्दल त्यांनी दुकानदार गणपत डोळसे यांचे कौतुक केले.

         श्री.बापट म्हणाले, गरिबाला योग्य वेळी धान्य मिळावे यासाठी गोदामचालक, वाहतुकदार आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कर्तव्यभावनेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. रेशन दुकानातून होणारी धान्यगळती रोखण्यासाठी पॉज मशिनची सुरुवात करण्यात आली. त्यामुळे 3  लाख 80 हजार 500 क्विंटल धान्याची बचत झाली. 12 लाख बोगस शिधापत्रिका शोधून काढण्यात यश आले असल्याचे त्यांनी सांगितले.


  ते म्हणाले,  अन्नावाचून आणि औषधावाचून कोणत्याही व्यक्तीचा मृत्यु होऊ नये असे शासनाचे प्रयत्न आहेत. त्यादृष्टीने सार्वजनिक वितरण प्रणालीतही पारदर्शकता आणण्यासाठी  विविध निर्णय घेण्यात आले आहे. रेशन दुकानदारांचे कमीशन वाढविण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. चांगले काम करणाऱ्या दुकानदारांना प्रोत्साहन देण्यात येईल, असेही श्री. बापट म्हणाले. यावेळी त्यांच्या हस्ते संजय गांधी निराधार योजनेचे कार्डवाटप करण्यात आले. 

          कार्यक्रमाला अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव अभिमन्यू काळे, पुरवठा उपायुक्त प्रविण पुरी, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीनिवास अर्जुन, उपविभागीय अधिकारी उदय किसवे, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, सरपंच दिपक बोटींडे आदी उपस्थित होते.
000

No comments:

Post a Comment