Friday 26 October 2018

दुष्काळ आढावा


पीक विमा भरण्यासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा- प्रा.राम शिंदे


          नाशिक, दि.26-  शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी त्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा हप्ता भरण्यासंदर्भात मार्गदर्शन करावे, असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे यांनी केले.
          पंचायत समिती सिन्नर येथे दुष्काळसदृश्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे, आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. , उपविभागीय अधिकारी महेश पाटील, पंचायत समिती सभापती भगवान पसवे, उपसभापती जगन्नाथ पाटील-भाबड,तहसीलदार नितीन गवळी, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार आदी उपस्थित होते.

          प्रा.शिंदे म्हणाले, पीक परिस्थितीचा अहवाल सादर करतांना विविध विभागांनी परस्पर समन्वयाने वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याची दक्षता घ्यावी. जनतेला गरजेनुसार पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी टंचाईग्रस्त गावात टँकरचे योग्य नियेाजन करावे.
          महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत  गावनिहाय कामे शेल्फवर ठेऊन त्याची माहिती जनतेला द्यावी. मागणी झाल्यानंतर तीन दिवसात काम उपलब्ध करुन द्यावे त्यासाठी कामाच्या मान्यता वेळेवर घ्याव्यात. रोहयोतून तलावातील गाळ काढण्याचे आणि शेतरस्त्याची कामे घेण्यात यावीत, असे त्यांनी सांगितले.

          ते म्हणाले, दृष्काळसदृश्य परिस्थिती घोषीत केलेल्या गावातील पाणीपुरवठा योजनेचे वीज कनेक्शन तोडले जाणार नाही. दुष्काळावर मात करण्यासाठी विविध यंत्रणांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी उपाययोजना करण्यात विलंब करु नये. पशुधन वाचविण्यासाठी पाणी आणि चाऱ्याचे नियोजन आतापासून करण्यात यावे.
          जिल्हाधिकारी  म्हणाले, शेतकऱ्यांनी पीक पेऱ्याची नोंद केली नसेल तर त्यांना माहिती देऊन नोंद अद्ययावत करुन घ्यावी. पिण्याच्या पाण्याचे नियोजन करताना टँकरबाबत दररोज आढावा घ्यावा. पीक परिस्थितीचा आढावा घेतांना विमा प्रतिनिधींना उपस्थित रहाण्याविषयी सूचित केल्याची माहिती त्यांनी दिली. शासनाने दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषीत केलेल्या गावात आठ प्रकारच्या सवलती दिल्या आहेत. त्या अंतर्गत शेती पंपाचे वीज कनेक्शन तोडू नये, असे त्यांनी सांगितले.

          यावेळी कृषी , लघुपाटबंधारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पंचायत समिती, तहसील कार्यालय, वन विभागामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस विविध विभागाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
          तत्पूर्वी प्रा.शिंदे यांनी वावी आणि मुसळगाव शिवारातील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी या भागात पीकाच्या नुकसानीची पाहणी केली. संकटाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
0000

No comments:

Post a Comment