Sunday 14 October 2018

अनरिव्हेल नाशिक


पर्यटनाद्वारे अर्थव्यवस्था गतिमान करावी- चंद्रकांत पाटील

         
 नाशिक दि.14 : निसर्गाचे वरदान लाभलेल्या ठिकाणांचा पर्यटनाच्या क्षेत्रात समावेश करून जास्तीत जास्त पर्यटनाचे पर्याय लोकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात यावा आणि पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

हॉटेल गेट वे येथे नाशिक जिल्हा प्रशासनामार्फत तयार करण्यात आलेल्या ‘अनरिव्हेल नाशिक’ या संकेतस्थळाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, अनिल कदम, विभागीय आयुक्त राजाराम माने, पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलिस अधिक्षक संजय दराडे, अपर जिल्हाधिकारी निलेश सागर, जिल्हा नियोजन अधिकारी योगेश चौधरी आदी उपस्थित होते.

 श्री श्री. पाटील म्हणाले, नाशिक जिल्ह्यातील परिचित व अपरिचित अशा सर्व पर्यटनस्थळांची  सवितस्तर व परिपूर्ण माहिती यासंकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आल्याने पर्यटकांना ऐच्छिक ठिकाणी पर्यटनासाठी जाणे सहज शक्य होणार आहे. या माध्यमातून रोजगार उपलब्धतेबरोबर जिल्ह्याची आर्थिक प्रगतीदेखील होईल, असे त्यांनी सांगितले.

श्री. महाजन म्हणाले, कृषी, धार्मिक, ऐतिहासिक, नैसर्गिक, साहसी अशा विविध पर्यटनांचे पर्याय जिल्ह्यात उपलब्ध आहेत. या पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या आर्थिक विकासासोबतच रोजगाराच्या संधीदेखिल मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. त्याअनुषंगाने जिल्ह्याच्या पर्यटनास चालना मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमप्रसंगी श्री. सिंगल यांचा ‘आर्यन मॅन’ पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि संकेतस्थळ निर्मितीत सहकार्य करणाऱ्या व्यक्तिंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतना श्री.सिंगल यांनी संकेतस्थळाच्या माध्यमातून पर्यटनास जागतिक पातळीवर चालना मिळणार असल्याचे सांगून उपक्रमास शुभेच्छा दिल्या.  

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी राधाकृष्णन म्हणाले, संकेतस्थळाच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील पर्यटनस्‍थळांची माहिती जागतिक पातळीवर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच या संकेतस्थळावर तीर्थक्षेत्रे, जैव विविधता, ऐतिहासिक वास्तू, द्राक्षप्रक्रीया केंद्र, जिल्ह्याचे जीवनमान, येथील संस्कृती व खाद्य पदार्थ अशा विभागात माहिती देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याच्या पौराणिक व ऐतिहासिक वारशाची सखोल व सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असल्याचेही  त्यांनी सांगितले.
----



No comments:

Post a Comment