Friday 26 October 2018

शेततळ्यामुळे नुकसान टळले


शेततळ्यामुळे डाळींबाचे नुकसान टळले

          नाशिक दि. 26-सिन्नर तालुक्यात दापूर गावच्या दत्तू आव्हाड यांनीमागेल त्याला  शेततळेयोजनेअंतर्गत शेततळे तयार केल्याने डाळींबाच्या बागेसाठी शाश्वत सिंचन सुविधा  उपब्ध होऊन संभाव्य आर्थिक नुकसान टळले आहे.
          आव्हाड यांची अडीच एकरात डाळींबाची बाग आहे. इतर क्षेत्रात कांदा पीक आहे. यावर्षी परिसरात केवळ दीडशे मिलीमीटर पाऊस पडल्याने परिसरातील शेती संकटात सापडली आहे. मात्र आव्हाड यांची बाग फळधारणेच्या अवस्थेत उभी आहे.

          आपल्या तीन एकर क्षेत्रात गहू, बाजरी, कांदा अशी पिके घ्यायची आणि निसर्गावर अवलंबून रहायचे असे सत्र सातत्याने सुरू होते. विहिरींना पाणीही पुरेसे नसल्याने सिंचनाची समस्या होतीच. मात्र शेततळ्याची योजना आल्यावर आव्हाड यांनी 25 x 45 मीटर आकाराचे शेततळे तयार केले. त्यासाठी त्यांना 50 हजार अनुदान मिळाले. प्लास्टिक आच्छादनासाठी राष्ट्रीय फलोत्पादन कार्यक्रमातून 75 हजार रुपये अनुदान मिळाले.

          शेततळे तयार झाल्यावर गतवर्षी आव्हाड यांनी प्रथमच डाळींब बाग लावली. गतवर्षी दर कमी मिळूनही त्यांना दीड लाख उत्पन्न मिळाले. शिवाय वाल, कांदा अशी पिके जोडीला घेता आली. भोजापूर कालव्याच्या पूरपाण्यातून पाईपलाईनद्वारे त्यांनी शेततळे भरून घेतले असल्याने पिकांचे नुकसान  त्यांना टाळता आले.
                   आज शाश्वत पाणीसाठा उपलब्ध झाल्याने ठिबकद्वारे पिके घेण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. सोबत भाजीपाला उत्पादनाकडे वळण्याचादेखील त्यांचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
दत्तू आव्हाड-यावर्षी पाऊस नसल्याने शेती संकटात आली आहे. शेततळ्यामुळे पाणीसाठा उपलब्ध झाल्याने डाळींबाचे पीक चांगले येण्याची आशा आहे. कांदा आणि भाजीपालादेखील घेण्याचा विचार आहे.

                 ----

No comments:

Post a Comment