Thursday 11 October 2018

आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक

शिंदे येथे आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिकाचे आयोजन

नाशिक, दि. 11:- आपत्ती निवारण सप्ताहानिमित्त नाशिक-पुणे रोडवरील शिंदे टोलनाक्याजवळ वायुगळती व नियंत्रण आणण्यासंदर्भातील प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले.
          दुपारी साडे अकराच्या सुमारास जिल्हा नियंत्रण कक्षास टोल नाक्याजवळ असलेल्या गॅस टँकरधून वायूगळती होत असल्याचा संदेश देण्यात आला. जिल्हा नियंत्रण कक्षाने सर्व संबंधित यंत्रणांना याबाबत सूचीत केल्यानंतर वायुगळती रोखण्यासाठी औद्योगिक सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून प्रयत्न सुरू केले.

          नाशिक महापालिका, सिन्नर नगरपालिका आणि सिन्नर औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाने मदतकार्यात सहभाग घेतला. वाहतूक पोलिसांनी वाहतूक एकेरी मार्गावरून वळवली. काही काळानंतर वायुगळती रोखल्याचे जाहीर होताच वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
          या प्रात्यक्षिकानंतर उपस्थित निरीक्षकांनी प्रात्यक्षिकाचे विश्लेषण सादर केले.  यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे, औद्योगिक सुरक्षा दलाचे देविदास गोरे, तहसीलदार अरुण शेवाळे, धनंजय गोसावी आदी उपस्थित होते. जिंदाल, बॉश, महिन्द्रा ॲण्ड महिन्द्रा, एनटीपीएस, जिंदालच्या अधिकाऱ्यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले.

 आपत्ती निवारण सप्ताहानिमित्त अशा प्रात्यक्षिकांचे आयोजन विविध ठिकाणी करून आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागरुकता निर्माण करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून शुक्रवार 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांनी रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात  आले आहे.
000

No comments:

Post a Comment