Tuesday 9 October 2018

लासलगाव उद्धाटन


आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षण महत्वाचे-रामदास आठवले

          नाशिक, 9 : आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी शिक्षण सर्वात महत्वाचा घटक आहे. त्यामुळे जीवनाचा पाया भक्कम करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणावर भर देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व अधिकारीता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
          लासलगाव येथील श्री महावीर कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रशासकीय कार्यालय इमारत, कनिष्ठ महाविद्यालय इमारत व डिजिटल कक्ष उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार किशोर दराडे, छगन भुजबळ, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे सरपंच संगिता शेजवळ, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, तहसिलदार दिपक पाटील, श्री महावीर विद्यालयाचे अध्यक्ष सुनिल आब्बड, कार्याध्यक्ष जव्हेरीलाल ब्रह्मेचा आदी उपस्थित होते.

          श्री. आठवले म्हणाले, प्रत्येक मुलाला शिक्षणाचा हक्क मिळावा तसेच शिक्षणात प्रत्येकाला समान संधी मिळावी याकरीता महात्मा फुले, राजर्षी शाहु आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठे योगदान दिले आहे. आज जगात विकासाचा वेग प्रचंड असताना माहिती व तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. या क्षेत्रातीलज क्रांतीमुळे शिक्षण क्षेत्रातदेखील मोठे बदल घडून येत आहेत. शैक्षणिक विकासाला चालना देण्यासाठी शासनदेखील प्रयत्नशील आहे, असे त्यांनी सांगितल.
          कार्यक्रमाच्या प्रांरभी श्री.आठवले यांनी कोनशिलांचे अनावरण करुन कनिष्ठ महाविद्यालय इमारत, प्रशासकीय कार्यालय इमारत व डिजिटल कक्षाचे उद्घाटन केले. त्यानंतर महाविद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व पदाधिकारी , कर्मचारी व शिक्षकवृंद यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
00000

No comments:

Post a Comment