Wednesday 10 October 2018

बायसिकल शेअरिंग


स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सार्वजनिक सायकल सुविधेचा शुभारंभ

नाशिक, 10 : पर्यावरणाला अनुकूल, आरोग्य हितकारक आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्यतेसाठी नाशिक म्युनिसीपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉरपोरेशन लि. व नाशिक महानरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने  शहरात सार्वजनिक सायकल सुविधेचा शुभारंभ महापौर रंजना भानसी आणि महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल, उपमहापौर प्रथमेश गिते, नगरसेवक अजय बोरस्ते, दिनकर पाटील, गुरूमित बग्गा आदी उपस्थित होते.

  श्रीमती भानसी म्हणाल्या, आरोग्याच्या दृष्टीकोनातून तसेच पर्यावरण पुरक वाहतूक करण्यासाठी नाशिक शहरात स्मार्ट सिटी  प्रकल्पांतर्गत ‘बायसिकल शेअरिंग’ प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. शहरामध्ये प्रत्येक जॉगिंग ट्रक जवळ डॉकिंग स्टेशन उभारण्यात येतील. त्यामुळे तरुणांपासून ते वृद्धापर्यंत या प्रकल्पाचा लाभ घेता येईल, असे त्यांनी सांगितले.

आयुक्त मुंढे म्हणाले, पब्लिक बायसिकल शेअरिंग प्रकल्पाअंतर्गत एक हजार सायकल आणि 100 डॉकिंग स्टेशन टप्याटप्याने स्थापन करण्यात येणार आहे. सुरुवातीला हा प्रकल्प दहा ठिकाणी सुरू होणार असून त्यासाठी दोनशे सायकल पुरविण्यात येणार आहे. नागरिकांना भाडेतत्वावर सायकलचा वापर करता येणार आहे.

सुरुवातीच्या 30 मिनीटाकरीता सायकल मोफत दिली जाईल व त्यापुढील प्रतितास 5 रुपये प्रमाणे भाडे आकारण्यात येईल. तसेच दिवसभर सायकलचा उपयोग करायचा असेल तर 23 रुपयांचा पास मिळेल तर महिन्याचा पास हा 175 रुपयांचा असेल. यामध्ये अद्यावत जीपीएस प्रणालीचा वापर करुन कंट्रोल रुम मधुन निरीक्षण करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
00000

No comments:

Post a Comment