Friday 5 October 2018

शहर विकास आढावा


शहर पाणी पुरवठ्यासाठी अमृत योजनेतून मान्यता- मुख्यमंत्री

       नाशिक दि.5-शहरातील गावठाणासह इतरही भागात जलवितरण प्रणाली विकसीत करण्यासाठी अमृत योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करावा, त्यास शासनाकडून मान्यता देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात शहर विकासा संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पालकमंत्री गिरीष महाजन, नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे,सिमा हिरे, डॉ.राहुल आहेर, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव पी. वेलरासू, महापौर रंजना भानसी, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आदी उपस्थित होते.

          ते म्हणाले, गोदा प्रकल्पासाठी केंद्र शासन आणि इतर वित्तीय संस्थांचे सहकार्य घेण्याबाबत विचार करावा. शहर बससेवेसाठी नियोजित 200 डिझेल बसेस ऐवजी सीएनजी बसेसचा विचार केल्यास प्रदुषण कमी होण्यास मदत होईल.
ग्रीन फिल्ड डेव्हलपमेंट बाबत नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या टीमने अहमदाबादला जाऊन अभ्यास करावा. महापालिकेच्या विकास प्रकल्पाबाबत शासनाकडून सर्व सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. मेट्रोच्या फिजीबीलीटीबाबत सिडकोला सूचना करण्यात आल्याचेही ते म्हणाले.
          शहराच्या विकासासाठी जनतेशी संवाद साधावा आणि विकासकामात लोकसहभाग वाढविण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.
          श्री.मुंढे यांनी शहर विकासाबाबत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इलेक्ट्रीक क्रीमेटोरीअम आणि महानगरपालिकेच्या 55 ऑनलाईन सेवांचे लोकार्पण करण्यात आले.
-----

No comments:

Post a Comment