Friday 5 October 2018

कायदा व सुव्यवस्था बैठक


अवैध धंद्याविरोधात कडक कारवाई करा-मुख्यमंत्री
                  

          नाशिक दि.5- अवैध धंद्याविरोधात कडक धोरणाचा अवलंब करीत शहरात ड्रग्ज आणि ग्रामीण भागात अवैध दारु विक्रीच्या विरोधात मोहिम राबवून कडक कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
          विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्ह्याचा कायदा व सुव्यवस्थेबाबत आयोजित बैठकीत  ते बोलत होते. बैठकीला पालकमंत्री गिरीष महाजन, राज्याचे गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील, राज्याचे  मुख्य सचिव डी. के. जैन, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, खासदार हरिश्चंद्र चव्हाण,आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सिमा हिरे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. आदी उपस्थित होते.
          श्री. फडणवीस म्हणाले, सामान्य माणसाचा पोलीस दलावरील विश्वास वाढण्याच्या दृष्टीने पोलीसांनी प्रयत्न करावे. किरकोळ गुन्ह्यांकडे दुर्लक्ष न करता त्याचा तपास त्वरीत लागेल याकडे लक्ष द्यावे.  गुणवत्ता आधारीत पोलीसींगचा विचार करणे आवश्यक आहे. जनतेला सुरक्षितेचा अनुभव यावा यासाठी आवश्यक कार्यप्रणाली राबवावी .

          अधिकाऱ्यांनी  पोलीसांशी  संवाद साधावा त्यामुळे गुणवत्तेवर चांगला परिणाम होईल. गुन्ह्यांचा तपास करतांना तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा. पोलीसांना मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन देण्यात आले असून गुन्ह्याच्या तपासासाठी  त्यांचा अधिकाअधिक उपयोग करावा. जनतेप्रती असलेली  जबाबदारी  लक्षात घेऊन काम केल्यास चांगली कामगिरी होईल, असे त्यांनी सांगितले.

पोलीसांना घरे देण्यासाठी योजनाबद्ध कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे. घरासाठी शासनाकडून मिळत असलेल्या सवलतीमुळे घराची किमंत कमी होईल. ज्यांना घराची आवश्यकता आहे त्यांची यादी तयार करुन त्यांना शासनाच्या योजनेची माहिती द्यावी, असे त्यांनी सांगितले. पोलीसांच्या कल्याण कार्यक्रमाकडे विशेष लक्ष देण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या.
          जिल्ह्यात पोलीसदलातर्फे कायदा व सुरक्षा व्यवस्थेसाठी चांगले प्रयत्न करण्यात येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तत्पूर्वी पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल आणि पोलीस अधिक्षक संजय दराडे यांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत पोलीसांतर्फे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची सादरीकरणाद्वारे माहिती  दिली.
----

No comments:

Post a Comment