Sunday 14 October 2018

वसतिगृह उद्घाटन


मराठा समाजाला सहकारी बँकेतूनही कर्ज सुविधा देणार- चंद्रकांत पाटील

      नाशिक दि. 14- अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना उद्योगासाठी 10 लाखापर्यंतचे कर्ज राष्ट्रीयकृत बँकेतून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून 75 टक्के कर्जाची थकहमी घेण्याचा निर्णय शासनाने नुकताच घेतला आहे. येत्या काळात सहकारी बँकेतूनही कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व्यवस्था करण्यात येईल, असे प्रतिपादन महसूल, सार्वजनिक बांधकाम, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

          मेरी परिसरात सुरू करण्यात येणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला  पालकमंत्री गिरीष महाजन,शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार देवयानी फरांदे, डॉ.राहुल आहेर, बाळासाहेब सानप, सीमा हिरे, अनिल कदम, महापौर रंजना भानसी, विभागीय आयुक्त राजाराम माने, अधीक्षक अभियंता रणजीत हांडे, तंत्रशिक्षण सहसंचालक ज्ञानदेव नाठे आदी उपस्थित होते.

          श्री. पाटील म्हणाले, महामंडळाच्या माध्यमातून दरवर्षी 10 हजार युवकांना उद्योगासाठी 10 लाखापर्यंत कर्ज देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. कर्जाची मुळ रक्कम पाच वर्षात परत करायची आहे. आतापर्यंत 600 तरुण-तरुणींना कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. कर्ज मिळणे अधिक सुलभ व्हावे यासाठी मराठा समाजाने युवकांसाठी प्रकल्प अहवाल तयार करून देण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून द्यावी, असे त्यांनी सांगितले.
          ते म्हणाले, मराठा समाजातील युवकांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. आठ लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्कापैकी 50 टक्के रक्कम शासन भरते. गतवर्षी 2 लाख 54 हजार विद्यार्थ्यांचे 654 कोटीचे शैक्षणिक शुल्क शासनाने परत केले आहे. यावर्षापासून प्रवेश घेतानाच विद्यार्थ्यांकडून 50 टक्के रक्कम घेण्याच्या सुचना शैक्षणिक संस्थांना देण्यात आल्या आहेत. उर्वरीत रक्कम शासनातर्फे संस्थांना अदा करण्यात येईल.

          विद्यार्थ्यांना शहरात शिक्षण घेणे सोईचे व्हावे यासाठी वसतिगृह उभारण्यात येत आहेत. जागेचा प्रश्न असल्याने शासनाच्या पडून असलेल्या इमारतींचा उपयोग करण्याच्या सुचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. मोठ्या शहरात प्रति विद्यार्थी 10 हजार तर लहान शहरात 8 हजार रुपये वसतिगृह चालविणाऱ्या संस्थेला शासनातर्फे देण्यात येते. आतापर्यंत सहा जिल्ह्यात वसतिगृह सुरू करण्यात आले असून नाशिकमधील वसतिगृह उत्तम आणि सर्व सुविधांनी युक्त आहे, असे त्यांनी सांगितले.

          सारथी संस्थेला शासनाने 5 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला असून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी या संस्थेमार्फत पुणे येथे मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या संस्थेमार्फत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
           मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शासनाचा निर्धार असून मागासआयोगाचा अहवाल 15 नोव्हेंबरपर्यंत प्राप्त झाल्यानंतर विधीमंडळात कायदा करण्यात येईल, असेही श्री.पाटील म्हणाले. शासनाने आयोगाच्या माहिती विश्लेषणासाठी आवश्यक कर्मचारी उपलब्ध करून दिले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

          यावेळी श्री. महाजन म्हणाले, शासनाने मराठा समाजातील युवकांसाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून रोजगारासाठी योजना सुरू केली आहे. या समाजातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षण आणि कौशल्य विकासासाठीदेखील विविध योजना आहेत. या माध्यमातून मराठा समाजाला न्याय देण्याची  शासनाची भूमीकाआहे.
          नाशिक येथे 130 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा उपलब्ध झाली असून आणखी 120 विद्यार्थ्यांसाठी लवकरच सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. त्याचप्रमाणे 100 विद्यार्थिनींसाठी  स्वतंत्र इमारतीची व्यवस्था करण्यात येईल.  प्रवेशासाठी संस्था नेमण्यात आली असून लवकरच विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिला जाईल. या सुविधेचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती करावी, असे आवाहन त्यांनी केले.

          वसतिगृहात सर्व प्रकारच्या अद्ययावत सुविधा असून राज्यातले उत्तम वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. वसतिगृह नियोजित वेळेत पुर्ण केल्याबद्दल त्यांनी प्रशासन, सा.बां.विभाग आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
          यावेळी आमदार मेटे यांनी शिवस्मारकाचे काम लवकरच सुरू होणार असून येत्या तीन वर्षात ते पुर्ण करण्यात येईल, असे सांगितले. प्रास्ताविकात करण गायकर यांनी  कमी वेळेत वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल शासनाला धन्यवाद दिले.
          तत्पूर्वी श्री. पाटील आणि श्री. महाजन यांनी वसतिगृह इमारतीची पाहणी केली. कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
लोकराज्य यशकथा विशेषांकाचे प्रकाशन

         यावेळी पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते लोकराज्य मासिकाच्या यशकथा विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. या अंकात शासनाच्या विविध योजनांवर आधारीत यशकथा आहेत. मुखपृष्ट कथेसह नाशिक जिल्ह्याच्या पाच यशकथा या अंकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
----

No comments:

Post a Comment