Sunday 20 May 2018

स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुक


विधान परिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

          नाशिक, दि.20 :- विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी  सोमवार 21 मे रोजी मतदान होणार असून त्यासाठी प्रशासनाने तयारी पुर्ण केली आहे. रविवारी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत श्री.राधाकृष्णन यांनी मतदान केंद्र अधिकारी आणि सूक्ष्म निरीक्षक यांना आवश्यक सुचना दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, मालेगाव मनपा आयुक्त संगीता धायगुडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपजिल्हाधिकारी प्रज्ञा बढे आदी उपस्थित होते.

निवडणूक आयोगाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होईल याकडे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लक्ष द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी दिले. त्यांनी मतदानाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला आणि मतदान प्रक्रीयेविषयी अधिकाऱ्यांना माहिती दिली.
नाशिक तालुका व शहरातील सदस्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील उपजिल्हाधिकारी रोहयो यांचे दालन येथे मतदान केंद्र असणार आहेत.  प्रत्येक तालुक्यातील नगर पंचायतीचे सर्व सदस्य, नगर परिषदेचे सर्व सदस्य, तालुक्यातील जिल्हा परिषद गटांचे सदस्य, पंचायत समितीचे सभापती आणि महानगर पालिकातील सर्व सदस्य हे संबधित तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या तहसील कार्यालय येथे मतदान करतील.

मतदानासाठी एकूण 105 अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  मतदान केंद्रात पेन, मोबाईल, कॅमेरा किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक्स वस्तु नेता येणार नाही. उमेदवारांना मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात बूथ उभारता येणार नाही. मतदानासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून प्रत्येक केंद्रावर एक अधिकारी आणि तीन कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत.
 प्रत्येक मतदान केंद्रावर भारत सरकारच्या सेवेतील अधिकाऱ्याची सूक्ष्म निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सदर सूक्ष्म निरीक्षक निवडणूक प्रक्रीयेवर लक्ष देणार असून निवडणूक निरीक्षकांना आपला अहवाल सादर करतील. संपूर्ण मतदान प्रक्रीयेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार असून वेबकास्टींगही करण्यात येणार आहे.                                              
000000

No comments:

Post a Comment