Monday 28 May 2018

मान्सून पूर्व आढावा


आपत्ती निवारणासाठी नागरीकांचा सहभाग महत्वाचा
                                                          -रामदास खेडकर

नाशिक, दि.28:- आपत्ती निवारणाचे कार्य प्रभावीपणे होण्याच्यादृष्टीने प्रशासकीय यंत्रणांनी सामाजिक संस्था, परिसरातील संघटना आणि नागरीकांचा सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी केले.
          जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने आयोजित मान्सून पूर्व आढावा बैठक प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सैन्य दलाच्या 216 मध्य रेजिमेंटचे मेजर राजेश सेनवाल, मालेगावचे अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निफाडचे उपविभागीय अधिकारी महेश पाटील, तहसिलदार राजश्री अहिरराव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे, जलसंपदाचे अधिक्षक अभियंता आर. एस. शिंदे उपस्थित होते.     

          श्री. खेडकर म्हणाले, पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीत जिवीत हानी होऊ नये यासाठी प्रयत्न केले जावे. पावसाळ्यात धरणांमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होतो. अशावेळी पूर परिस्थिती उद्भवल्यास नदी व लगतच्या परिसरातील नागरीकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात यावे. यासाठी प्रशासनातर्फे सहकार्य करण्यात येईल.
          ते म्हणाले, जिवीत हानी होऊ नये यादृष्टीने महानगरपालिका, तालुका प्रशासन, पोलिस आदींनी दरम्यानच्या काळात उपाययोजना कराव्यात. आपत्तीला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी साधन सामुग्रीची सज्जता करणे गरजेचे आहे. लाइफ जॅकेट, बोटी, फ्लड लाइट आदी साहित्याच्या उपलब्धतेकडे लक्ष द्यावे. जिल्हा प्रशासनाशी समन्वय राखणे आणि आपत्कालीन स्थितीची माहिती देण्यासाठी विविध विभागांनी, तसेच तालुका प्रशासनाने आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावेत, असे त्यांनी सांगितले.

          मेजर सेनवाल म्हणाले, पूरग्रस्तांसाठी प्रशासनाच्या समन्वयाने सैन्यदल मदत कार्यासाठी पूरप्रवण भागाची पाहाणी करुन पूर्वतयारी करेल. त्यासाठी आवश्यक कक्ष लष्कराच्या देवळाली छावणी येथे सुरु करण्यात येत आहे.
          याप्रसंगी श्री. खेडकर यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने तपशिलवार सादरीकरण केले. पावसाळ्यामध्ये पूर स्थिती, वीज पडून होणाऱ्या दूर्घटना, दरड कोसळण्याच्या घटना  आदी माहिती त्यांनी दिली.
          बैठकीस सार्वजनिक बांधकाम, महानगरपालिका, आरोग्य, जलसंपदा महसूल, जिल्हा परिषद, पोलिस, अग्निशमन, बीएसएनएल, सेनादल, नागरी संरक्षण दलासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
                                                                    0000 

No comments:

Post a Comment