Monday 31 December 2018

गोवर रुबेला लसीकरण


 प्रत्येक मुल गोवर रुबेलापासून संरक्षित व्हावे- डॉ.दीपक सावंत

          नाशिक, दि.31 : मालेगाव शहरातील प्रत्येक मुल गोवर रुबेलापासून संरक्षित होणे गरजेचे असून त्यादृष्टीने जनप्रबोधन करण्यासाठी सामाजिक आणि धार्मिक संस्थांनी सहकार्य करावे , असे आवाहन सार्वजनिक आरोग्य कुटुंब व कल्याणमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी केले.
          मालेगाव येथे मौलवी यांचेसोबत जतेतुर उल्माच्या कार्यालयात आयोजित गोवर रुबेला लसीकरणाबाबत चर्चेदरम्यान ते बोलत होते. यावेळी आरोग्य संचालक डॉ.संजीव कांबळे, उपसंचालक डॉ.रत्ना रावखंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे, आरोग्य अधिकारी डॉ.किशोर डांगे, अब्दुल हमीद जमाली, आदी उपस्थित होते.

          डॉ.सावंत म्हणाले, पोलिओप्रमाणे गोवर रुबेलाचे उच्चाटन करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. मुस्लीम समाजातील नागरिकांच्या प्रत्येक शंकेचे निरसन करून मोहिम पुर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी जनजागृतीवर विशेष भर देण्यात येईल.
गोवर रुबेला लसीकरण मुस्लीम देशांसह जगातील 149 देशात झाले असून ते पुर्णत: सुरक्षित आहे. लसीकरणाबाबत  नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये. शंका असल्यास आरोग्य विभागाकडून माहिती घेऊन आपल्या 9 महिने ते 15 वर्षाच्या मुलांना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
          मालेगाव शहरातील वैद्यकीय सुविधांची गरज लक्षात घेता आणखी एक रुग्णालय देण्याबाबत विचार करण्यात येईल, असेही डॉ.सावंत म्हणाले. त्यांनी मुस्लीम समाजाच्या प्रतिनिधींशी आणि मौलवी यांचेशी लसीसकरणाबाबत चर्चा केली.
                                                  000000

No comments:

Post a Comment