Thursday 3 January 2019

चारा साक्षरता अभियान


 चारा साक्षरता अभियान रथाचे जिल्हाधिकारी यांचे हस्ते उद्घाटन


            नाशिक, दि.3 चारा टंचाईवर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत चारा साक्षरता अभियान राबविण्यात येत असून चारा साक्षरता रथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी.यांच्या हस्ते करण्यात आला.
          जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला  निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस.पी. शिंदे,  जिल्हा पुशसंवर्धन अधिकारी  डॉ. व्ही.पी.दर्जे, आत्मा प्रकल्पाचे उपसंचालक कैलास शिरसाठ, डॉ.शहाजी देशमुख, सागर खैरनार आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात यावर्षी अल्प प्रमाणात पर्जन्यवृष्टी झालेली आहे. त्यामुळे चारा टंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकरी बहुतांशी दुग्धव्यवसाय व पशुपालनावर अवलंबून आहे.त्यासाठी चारा उपलब्धता हा महत्वाचा भाग असल्याने रब्बी व उन्हाळी हंगामात चाऱ्याची कमतरता भासू नये म्हणून जिल्ह्यात चारा साक्षरता अभियान राबविण्यात येत आहे. चारा रथाच्या माध्यमातून अधिकाधिक जनजागृती झाल्यास चारा नियोजन करता येईल व दुष्काळी परिस्थितीवर मात करता येईल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
 चारा साक्षरता अभियान 1 ते 10 जानेवारी या कालवधीत राबविण्यात येणार असून यामध्ये मुरघास तंत्रज्ञान, चारा प्रक्रिया आणि आधुनिक चारा (अझोला, हायड्रोपोनिक) या विषयांवर रथाद्वारे जिल्ह्यात जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी  दिली. प्रत्येक तालुक्यात होणाऱ्या शिबिरांच्या माध्यमातून  चारा उपलब्धतेद्वारे दुष्काळी परिस्थितीवर मात करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
0000
.


No comments:

Post a Comment