Friday 25 January 2019

राष्ट्रीय मतदार दिन

जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा


          नाशिक दि.25: राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सहाय्यक जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद आणि निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी  लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्यात आली.
कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे, निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रज्ञा बढे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सोपान कासार, उजिल्हाधिकारी दीपमाला चौरे, स्वाती थवील, तहसीलदार शरद घोरपडे, सपना पवार, अभिलाषा देवगुणे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री.खेडकर म्हणाले, भारतीय लोकशाही जगातील उत्तम लोकशाही व्यवस्था आहे. आपली लोकशाही मूल्ये जगासाठी आदर्श आहेत. ही व्यवस्था वृद्धींगत करण्याचे श्रेय मतदार नोंदणीसाठी उत्तम काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आहे. नागरिकांनी लोकशाही बळकट करण्यासाठी आणि योग्य लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी लोकसभा निवडणूकीत मतदान करावे, तसेच पात्र मतदारांनी मतदार नोंदणी केली नसल्यास त्वरीत करावी, असे आवाहन त्यांनी केले.

निवडणूक प्रक्रीया शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे श्री.आशिर्वाद यांनी सांगितले.
नवमतदार नोंदणीत जिल्ह्याने चांगली कामगिरी केली असून केंद्र अधिकाऱ्यांनी चांगले काम केल्याचे श्रीमती बढे यांनी प्रास्ताविकात सांगितले. लोकशाही बळकट करण्यासाठी हे योगदान महत्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते मतदार नोंदणीत उत्तम कामगिरी करणाऱ्या नायब तहसीलदार आणि बीएलओंचा सत्कार करण्यात आला. मतदार दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिकाचे वितरण करण्यात आले.तसेच नवमतदारांना प्रातिनिधीक स्वरुपात मतदान ओळखपत्राचे वाटप करण्यात आले.

तत्पूर्वी मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शासकीय अध्यापक विद्यालयाच्या विद्यार्थीनींनी  मतदार नोंदणीचे आवाहन करणारे पथनाट्य सादर केले.
0000

No comments:

Post a Comment