Thursday 24 January 2019

राज्यस्तरीय बैठक


उपयुक्त नाविन्यपूर्ण योजना राज्यात पोहोचवा- सुधीर मुनगंटीवार


          नाशिक दि.24: जिल्ह्यात यशस्वी ठरणाऱ्या नाविन्यपूर्ण योजनांचा राज्यातील इतर भागांना लाभ व्हावा यादृष्टीने अशा योजनांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी इतर जिल्ह्यात पोहोचवावी, असे प्रतिपादन वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
विभागीय आयुक्त कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित नाशिक विभाग सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना 2019-20 राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते. यावेळी जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे, रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल, विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्षा शालीनीताई विखे पाटील, नाशिक जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे, विभागीय आयुक्त राजाराम माने, नियोजन विभागाचे उपसचिव विजेसिंग वसावे आदी उपस्थित होते.

श्री मुनगंटीवार म्हणाले, जिल्ह्यांसाठी निर्धारित नियतव्ययापेक्षा अधिक निधी देण्यात आल्यानंतर त्याचा उपयोग प्राधान्याने रोजगार, आरोग्य संस्था आणि अंगणवाडी बांधकामासाठी करण्यात यावा. अंगणवाडी इमारतीची रचना स्थानिक वातावरणाला पुरक आणि कल्पक असावी. त्यासाठी जे जे स्कुल ऑफ आर्ट्सची मदत घेण्यात यावी.  विकास आराखडा तयार करतांना अभ्यासपूर्ण नियोजन करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. पूर्वी मंजुर असलेल्या अंगणवाड्यांना चालू वर्षाप्रमाणे वाढीव साडेआठ लाखाचा निधी मान्य करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
नाशिक जिल्ह्यात ब्रह्मगिरी येथील इकोटुरिझम आणि कुशावर्त येथील सुशोभिकरणाचे काम लवकर सुरु करण्यात यावे. असे निर्देश श्री.मुनगंटीवार यांनी दिले. वाढीव निधीपैकी अधिकचा निधी शाळा इमारतींच्या बळकटीकरणासाठी आणि अंगणवाडी बांधकामासाठी उपयोग आणावा, असे त्यांनी सांगितले. स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने सीबीएस परिसर सुशोभीकरणाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

 श्री. मुनगंटीवार म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक वस्तु संग्रहासाठी आवश्यक निधी देण्यात येईल. ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी असे संग्रहालय टिकले पाहिजे.
धुळे जिल्ह्यातील 906 पैकी 500 अंगणवाडी बांधकामासाठी यावर्षी 40 कोटी आणि उर्वरित इमारतींसाठी पुढील वर्षी मानवविकास अंतर्गत निधी देण्यात येईल.  तसेच मिशनच्या माध्यमातून दुग्धविकासासाठी व वनविभागाच्या माध्यमातून कुरण विकासासाठी निधी देण्यात येईल.

नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी आवश्यक तेवढा निधी देण्यात येईल. नर्मदा नदी किनाऱ्यालगत इकोटुरीझम विकसीत करण्यासाठी नियमांच्या अधिन राहुन प्रस्ताव आल्यास निधी देण्यात येईल. अशा स्थळांचा विकास उत्तमरितीने व गुणवत्तापूर्वक करावा. जिल्ह्यातील शाळा खोल्या आणि अंगणवाडी बांधकामासाठी मानवविकास अंतर्गत निधी देण्यात येईल. जिल्ह्यातील किमान 25 आदिवासी तीन वर्षात स्वत:चा उद्योग विकसित करतील अशारितीने त्यांना सक्षम करण्यात यावे. त्यांच्या कौशल्य विकासासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असेही श्री.मुनगंटीवार म्हणाले.

अहमदनगर जिल्ह्यात विकासाची कामे वेगाने होत असून त्याला अधिक गती देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक निधी देण्यात यावा, असे प्रा. शिंदे यांनी सांगितले.
श्री.रावळ म्हणाले, नंदुरबारसारख्या आदिवासी जिल्ह्यात रोजगारासाठी स्थलांतर मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. मत्स्य व्यवसाय, रुग्णालयासाठी आवश्यक यंत्रसामुग्री आणि आदिवासी संशोधन अकादमीला विशेष निधी देण्याची मागणी त्यांनी केली.
अहमदनगर जिल्ह्यात सीसीटीव्ही आणि पोलिस निवासस्थान दुरुस्तीसाठी तरतूद करण्याच्या सुचना श्री.केसरकर यांनी दिल्या. नाविन्यपूर्ण योजनांची माहिती त्यांनी घेतली.
बैठकीत नाशिक, अहमदनगर, धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सादरीकरणाद्वारे प्रारुप आराखड्याची माहिती दिली. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत वाढीव मागणी असलेला नाशिक जिल्ह्याचा 574.97 कोटी, धुळे 252.46, अहमदनगर 975.02 आणि नंदुरबार जिल्ह्याकडून 121.78 कोटींचा प्रारुप आराखडा सादर करण्यात आला. आवश्यक बाबींसाठी वाढीव तरतूद देण्यात येईल, असे श्री.मुनगंटीवार यांनी सांगितले.

बैठकी प्रारंभी अहमदनगरच्या वनविभागाने विविध योजनांची माहिती देण्यासाठी तयार केलेल्या घडीपत्रिकेचे विमोचन करण्यात आले. सदर बैठकीसाठी विभागातील चारही जिल्ह्यांचे लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह इतर विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
0000

No comments:

Post a Comment