Wednesday 23 January 2019

चितेगाव विकासकामांचे भुमीपूजन

          महाजनपुरला उपसा सिंचनाद्वारे पाणी देणार - विजय शिवतारे

           
       नाशिक, दि.23 -  कालव्याद्वारे सिंचनासाठी पाणी देतांना कालव्याच्या एकूण लाभक्षेत्राच्या दहा टक्के क्षेत्रावर उपसा सिंचनाद्वारे पाणी देणे शक्य असल्याने महाजनपुरसाठी पाणी उपलब्ध करुन देण्यात येईल. शेतकऱ्यांनी पाणी वाटप संस्थांची नोंदणी केल्यास सीएसआर अंतर्गत साधनसामुग्री उपलब्ध होऊ शकेल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले.
          निफाड तालुक्यातील चितेगाव येथे विविध विकास कामांच्या भुमीपूजन आणि लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमास जि.प.अध्यक्षा शितल सांगळे, आमदार अनिल कदम, पंचायत समिती सभापती राजेश पाटील, सुधीर कराड, सरपंच सुभाष गाडे आदी उपस्थित होते.

          श्री शिवतारे म्हणाले की, सिंचनाद्वारे शेती करतांना पीक पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. ठिबक सिंचनाच्या सहाय्याने आधुनिक तंत्राचा वापर करुन शेती करण्याचे मार्गदर्शन युवकांना करण्याची आवश्यकता आहे. फळ पिकाच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळू शकते असे त्यांनी सांगितले.     
          आमदार कदम म्हणाले, निफाड तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 47 किमी रस्त्यांची कामे करण्यात आली असून आणखी 40 किमी लांबीच्या रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. त्यापैकी एक चितेगांव फाटा- चितेगांव- खेरवाडी या 5.5. किमी. लांबीच्या रस्त्याचे भूमीपुजन होत आहे.
          श्री. शिवतारे यांच्या हस्ते खेरवाडी - चांदोरी - सायखेडा रस्ता, चितेगाव फाटा- चितेगाव- खेरवाडी रस्ता, चितेगाव स्मशानभूमी सभामंडप, जिल्हा क्रीडा योजनेअंतर्गत चितेगाव येथे व्यायामशाळी बांधणी आदी  कामांचे भुमीपूजन करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते चितेगांव स्मशानभूमीलगत करण्यात आलेल्या आसनव्यवस्थेचे लोकार्पण करण्यात आले.
          याप्रसंगी श्रीमती.सांगळे यांनीदेखी आपले मनोगत व्यक्त केले.
00000

No comments:

Post a Comment