Tuesday 29 January 2019

जिल्हास्तरीय प्रदर्शन


गावाला समृद्ध करण्यासाठी ग्रामोद्योगाला प्रोत्साहन-डॉ.निलिमा केरकट्टा


          नाशिक दि.29: गावपातळीवरील छोट्या उद्योजकांना मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देत गाव समृद्ध करण्यासाठी ग्रामोद्योग प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम निलिमा केरकट्टा यांनी केले.

          गोल्फ क्लब मैदान येथे महाराष्ट्र राज्य खादी  व ग्रामोद्योग मंडळातर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित  पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.  कार्यक्रमाला मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप आणि जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सिताराम वळवी उपस्थित होते.


         श्रीमती केरकट्टा म्हणाल्या,  महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात ग्रामीण उद्योजकांना प्रदर्शनाच्या माध्यमातून बाजारपेठ मिळवून देण्याचे प्रयत्न होत आहेत. 2021 पर्यंत असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शासनातर्फे ग्रामीण भागातील लहान उद्योजकांना कौशल्य विकास प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य देण्यात येते. नागरिकांनी ग्रामीण उद्योजकांच्या श्रम आणि प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी तयार केलेल्या वस्तू खरेदी कराव्यात,असे आवाहन त्यांनी केले.

        फास्टफूडच्या युगात बदलत्या जीवनशैलीमुळे कॅन्सरसारखे आजार वाढत असून त्यापासून दूर रहाण्यासाठी निसर्गाकडे वळावे लागेल. खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या माध्यमातून अशा नैसर्गिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यात येते, असेही त्या म्हणाल्या.
     प्रदर्शन 31 मार्च पर्यंत सुरू रहाणार असून त्यात सेंद्रीय गुळ, रेडीमेड कपडे, पैठणी, हर्बल उत्पादने, बेकरी उत्पादने आदी विविध उत्पादनांची दालने आहेत.  
----

No comments:

Post a Comment