Wednesday 30 January 2019

विभागीय परीक्षण प्रयोगशाळा


 प्रयोगशाळेमुळे नाशिक विकासाचे केंद्र होईल -आर.के.सिंग


          नाशिक दि.30: नाशिक येथे उभारण्यात येणाऱ्या विभागीय परीक्षण प्रयोगशाळेमुळे नाशिक विभागाच्या विकासाला वेग येऊन नाशिक विकासाचे केंद्र होईल, असा विश्वास केंद्रीय ऊर्जा  राज्यमंत्री आर.के.सिंग यांनी  व्यक्त केले.
शिलापूर येथे केंद्रीय विद्युत संशोधन  संस्थेतर्फे उभारण्यात येणाऱ्या विभागीय परीक्षण प्रयोगशाळेच्या भूमीपुजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जि..अध्यक्षा शितल सांगळे, खासदार हेमंत गोडसे, आमदार राजाभाऊ वाजे, देवयानी फरांदे, योगेश घोलप, ऊर्जा मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार राज पाल,  सीपीआरआयचे महासंचालक व्ही.एस.नंदकुमार , माजी मंत्री बबनराव घोलप, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार जयवंतराव जाधव आदी उपस्थित होते.

श्री.सिंग म्हणाले, प्रयोगशाळेमुळे परिसरातील विद्युत उपकरण उद्योगांना मान्यता घेण्यासाठी सुविधा होईल. त्यामुळे असे उद्योग नाशिकमध्ये येऊन रोजगार निर्मितीलादेखील गती मिळेल. केंद्र सरकारने विद्युत क्षेत्रात अनेक चांगले परिवर्तन केले आहे. गेल्या पाच वर्षात एक लाख मेगावॅट जास्‍त निर्मिती करण्यात आली आहे. गरजेपेक्षा जास्त विद्युत निर्मिती होत असल्याने शेजारच्या देशांना वीज निर्यात करण्यात येत आहे.

देशातील 1 लाख 80 हजार किलोमीटरची वाहिनी एका ग्रीडमध्ये जोडण्यात आली आहे. येत्या 3 फेब्रुवारीला लडाख, लेह, कारगिल, द्रास या अधिक उंचीच्या क्षेत्रांना देशाच्या ग्रीडने जोडण्यात येणार आहे. पंतप्रधान महोदयांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे एक हजार दिवसात देशातील प्रत्येक गावात वीज पोहोचविण्यात आली आहे.

राज्याला प्रत्येक गावात वीज जोडणी देण्यासाठी दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेव्यतिरक्त 800 कोटी रुपये देण्यात आले आहे. राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी मागणी केल्याप्रमाणे ग्रीड स्वतंत्र करण्यासाठी आणखी 2 हजार कोटी देण्यात येतील, तसेच येत्या 31 मार्च पर्यंत संपूर्ण देश भारनियमन मुक्ती करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

खासदार गोडसे म्हणाले, पश्चिम भारतातील अशा प्रकारची ही एकमेव प्रयोगशाळा असणार आहे. महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश येथील विद्युत उपकरण बनविणाऱ्या कंपन्यांना या प्रयोगशाळेचा लाभ घेता येईल. त्यामुळे लहान विद्युत उपकरणे बनविणारे विद्युत उद्योग नाशिकमध्ये येतील.  नाशिकची ओळख 'इलेक्ट्रिक हब' म्हणून होईल व स्थानिक स्तरावर रोजगार निर्मिती होईल, असे त्यांनी सांगितले.

 प्रास्ताविकात राज पाल म्हणाले, सीपीआरआय विद्युत क्षेत्रात राष्ट्रीय प्रशिक्षण प्रमाणिकरण प्राधिकरणाच्या रुपात कार्यरत आहे. बाराव्या पंचवार्षिक योजनेत सीपीआरआयला मंजूर करण्यात आलेल्या 1390 कोटीच्या निधीपैकी 115 कोटी खर्च करुन पश्चिम भारतासाठी नाशिक येथे ही प्रयोगशाळा उभारण्यात येत आहे. नाशिक परिसरात विद्युत उद्योग मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना चांगली सुविधा होईल. येत्या 18 महिन्यात या प्रयोगशाळेचे काम पूर्ण करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
येत्या पाच वर्षात 47 लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज- चंद्रशेखर बावनकुळे

       मुख्यमंत्री सौर वाहिनी प्रकल्पांतर्गत साडेसहा लाख शेतकऱ्यांना यावर्षी वीज जोडणी देण्यात आली असून येत्या पाच वर्षात 47 लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज देणे शक्य होईल, असे प्रतिपादन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
          श्री. बावनकुळे म्हणाले, गावात शेतकऱ्यांच्या गरजेनुसार लहान सौर प्रकल्प उभारुन परिसरातील शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या वीजेच्या निर्मितीवर केवल 2 रुपये 60 पैसे प्रती युनिट एवढा खर्च येत असल्याने शेतकऱ्यांना कमी दरात वीज देता येईल.
       शासनातर्फे तीन लाखाचा सौर कृषीपंप केवळ 30 हजार रुपये घेऊन शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. अनुसूचित जाती आणि जमातीतील शेतकऱ्यांना केवळ 15 हजार रुपयात हा पंप देण्यात येईल. एकुण एक लाख सौर कृषीपंपाचे वितरण करण्यात येणार असुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
          एकलहरे प्रकल्पाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली असून हा प्रकल्प आवश्यक क्षमतेनुसार चालविण्यात येईल. प्रकल्पातील जुने संच बदलुन 660 मेगावॅटचे नवीन संच बसविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
 श्री.बावनकुळे म्हणाले, सौभाग्य योजनेच्या माध्यमातून 12 लाख 58 हजार कुटुंबांना वीज जोडणी देण्यात आली असुन 7 लाख 58 हजार शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला वीज देण्यात येणार आहे. ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने शेतकऱ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी 'एक शेतकरी एक ट्रान्सफार्मर' अशी योजना सुरु करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
00000

No comments:

Post a Comment