Thursday 17 January 2019

सीएम चषक स्पर्धा


पालकमंत्र्यांच्या हस्ते सीएम चषक स्पर्धेचे उद्घाटन

       नाशिक दि.17 : राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास तथा जिल्हयाचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या शुभहस्ते श्री छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे सीएम चषक जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.
       यावेळी महापौर रंजना भानसी,  आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, सीमा हिरे, उपमहापौर प्रथमेश गिते, दिनकर पाटील, लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते.
       यावेळी बोलताना श्री.महाजन म्हणाले, राज्यात देशातील सर्वात मोठा क्रीडा व कला महोत्सव  भरविण्यात आला आहे. प्रथमच मोठ्या प्रमाणात खेळाडूना अशा महोत्सवाच्या माध्यमातून क्रीडागुण दाखविण्याची संधी मिळते आहे. विशेषतः ग्रामीण भागातील खेळाडूंना महोत्सवाच्या माध्यमातून चांगले प्रोत्साहन मिळेल. क्रीडा महोत्सवाला चालना दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री महोदयांचे आभार व्यक्त केले. 

       ते म्हणाले, राज्यातील काना कोपऱ्यातून आतापर्यंत  46 लाख खेळाडूंनी महोत्सवात सहभाग नोंदविला आहे. जिल्ह्यात 2 लाख 30 हजार खेळाडूं सहभागी होत आहेत.  कॅरम, नृत्य, कबड्डी, खो खो, चित्रकला, नृत्य, क्रिकेट, ॲथलॅटिक आदी स्पर्धांच्या माध्यमातून युवकांच्या सुप्त गुणांना वाव मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मोबाईल आणि संगणकाकडे अधिक आकर्षित होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खेळ आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 
       तालुका, जिल्हा, राज्य व त्यानंतर दिल्लीला राष्ट्रीय पातळीवर जाण्याची संधी खेळाडूंना स्पर्धेच्या माध्यमातून मिळणार असून त्यातून  नामवंत खेळाडू तयार होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निशिकाने अनेक अंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू दिले असल्याचेही श्री. महाजन म्हणाले. तत्पूर्वी खेळाडूंना सामुदायिक शपथ देण्यात आली व विविध खेळांचे उदघाटन करण्यात आले. क्रीडा रॅलीचा शुभारंभदेखील पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आला.
0000

No comments:

Post a Comment